मंगल परिणय: हळदिचा कार्यक्रम आणि धम्माचा अवमान !

– चंद्रहास तांबे, खारघर, नवी मुंबई
(मो. ९८६९८६९७९२,   ९९२०८६९७९२)

 

भाग-१

 

माणसाच्या जिवनात येणा-या अनेक पवित्र घटनांपैकी मंगल परीणय अर्थात लग्न विवाह सोहळा हा एक अतिशय पवित्र असा कार्यक्रम होय.  या कार्यक्रमाची शुद्धता, पवित्रता आणि मंगलमय वातावरणाची निर्मिती राखण्यासाठी श्रद्धासंपन्न सुजन बौद्ध बांधवांनी काही खालील गोष्टींचा गांभिर्याने विचार करणे आवश्यक आहे.

 

लग्न सोहळ्याच्या पुर्व संधेला जो हळदीचा कार्यक्रम केला जातो त्या कार्यक्रमातुन कुशलपेक्षा अकुशलच कर्मे आपल्या हातुन अधिक होत असतात आणि अज्ञानी व परंपरावादी लोकांच्या दबावाला व अनिष्ट रुढीच्या आहारी जाऊन आपण पापाचे भागीदार होत असतो. हळदिच्या नावाने जी मटण व दारुची मेजवाणी केली जाते, कानठळ्या बसवणार, ह्र्द्य विकाराला कारण ठरणारा डी.जे. लावुन, नशेत अचकट-विचकट अंग-विक्षिप्त डान्स करुन, ध्वनी प्रदुषणाचा त्रास सर्वांना देऊन या सर्व विकृतींना जसेकाही आपल्या बौद्ध धम्मात नुसती मान्यताच नाही तर जणुकाही फार महत्व असल्यासारखे लोक कशाचीही पर्वा न करता खुले-आम धिंगाना घालत असतात.  या धम्मविरोधी कृत्यात आपल्या धार्मीक संस्थांचे पदाधिकारी, संस्कार समितीचे पदाधिकारी, बौद्धाचारीसुद्धा सहभागी असतात.  सध्या कार्यरत असलेल्या आपल्या धार्मिक संस्था या गोष्टीकडे डोळेझाक का करतात?  आपण सर्वजण या घाणीच्या दलदलीत बरबटलो आहोत का? कुणालाही यात काही गैर का वाटत नाही?  आमच्या मातृ- पितृ संस्थांची या धिंगाण्याला मान्यता आहे का?  ज्या बाबासाहेंबांनी या संस्था स्थाप्न केल्या त्या बाबासाहेबांना अशाप्रकारच्या धम्माला बदनाम करणारे, माणसाला अधोगतीकडे नेणारे कार्यक्रम अपेक्षित होते काय?  कधी कधी अशी शंका येते की, जे लोक अशा पार्टीचा बेधुंद, बेशुद्ध होईपर्यंत उपभोग घेतात व बुद्ध- बाबासाहेबांच्या आदर्श विचारांच्या विरोधात आचरण करतात फक्त तेच लोक आमच्या शाखांचे पदाधिकारी राहण्यास योग्य असतात असा अलिखीत नियम कोणी केला आहे काय?  बौधांचे प्रतीनिधित्व करण्यासाठी कोणीच शिलाचरण करणारा व्यक्ती आमच्या संस्थांनी तयार केला नाही का?

 

बौद्धांची आचारसंहीता सांगण्यात भगवान बुद्ध किंवा बाबासाहेब कोठेच कमी पडले नाहीत, फक्त आमच्याकडून आचारसंहिता राबवून घेणा-यांमध्ये नक्कीच कमतरता आहे किंवा धम्मात असलेले शिलाचरणाचे महत्व आमच्या संस्था चालकांना निटपणे समजलेले नसावे किंवा त्यांचे या लोकांपुढे काही चालत नसावे?  यापैकी नक्की काय?

 

 हळदिच्या कार्यक्रमातुन दिल्या जाणा-या मटण व दारुमुळे माणूस चिडखोर बनतो, तामसी बनतो.  आपल्या मनावर संयम राहत नाही, ताबा राहत नाही.  आपल्या शरीरात गेलेले मटण व दारु यांचा असर ३६ तास मनावर व शरीरावर होत असतो आणि अवघ्या १० ते १५ तासांवर मंगलमय असा पवित्र कार्यक्रम होणारा असतो. मग याचा सर्व परिणाम दुस-या दिवशी होणा-या लग्नाच्या कार्यक्रमावर दिसतो.  हळदिच्या नावाने जे मटण व दारु लोकांच्या शरीरात गेलेली असते त्यामुळे तेथील वातावरण पवित्र राहत नाही,  वातावरणातील प्रसन्नता, शुद्धता या हळदिच्या कार्यक्रमामुळे नष्ट होते आणि ती अशुद्धता पुढिल ४-५ दिवस सतत वातावरण दुशित करीत असते.  मग मंगलसोहळा मंगलमय वातावरणात कसा पार पडेल?  ज्या सोहळ्याला मंगल परिणय नाव आहे तो सोहळा मंगलमय वातावरणातच झाला पाहिजे. हळदिमुळे जर वातावरण दुषित होत असेल तर हळदिचा कार्यक्रमच का करावा ?

 

हळदीच्या कार्यक्रमाला बौद्ध धम्मात काहीही स्थान नाही, जे जे वाईट आहे ते महार लोक लवकर स्विकारतात त्याप्रमाणेच दुस-यांचा हळदिचा कार्यक्रम महार लोकांनी अज्ञानात मागिल ३० वर्षात करायला सुरुवात केली.  आणि आता आमच्या काही धार्मिक?? संस्थांनी त्याला मान्यताच दिल्याप्रमाणे खुलेआम जाहिरपणे ते केले जातात.  जो बौद्धांचा नाहीच तो हळदिसारखा मंगलमय वातावरण दुशित करणारा कार्यक्रम राबवुन पुढील आठ दहा दिवसाचा काळ जो प्रसन्न धार्मिक वातावरणाचा असायला हवा तो अधार्मिक करुन त्या सोबत येणारे इतर सर्व कार्यक्रम अशुद्ध वातावरणात उरकुन घेतले जातात त्यामुळे सर्व लोकांत तानतनाव, चिडचिडेपणा, रुसवे-फुगवे, मानापमान, एकमेकांवर खेकसणे-ओरडणे, वेळेवर तयारी न होणे इत्यादी वाईट प्रकारांना तोंड द्यावे लागते.

 

हे सर्व टाळण्यासाठी हळदिला पर्याय म्हणुन बौद्ध धम्माला साजेशे असे धम्मप्रवचण, सुत्त पठण, संघदान अशाप्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करावे जेणेकरुन दुस-या दिवशी होणा-या विवाह सोहळ्यासाठी एक दिवस आधीच एकप्रकारे मंगलमय व प्रसन्न वातावरण निर्माण होईल.  परंतु काही केल्या पंचशीलांना बाधक ठरणारा प्राणी हिंसा व मध्यपानाला अजिबात थारा देऊ नये.  जो बौद्धाचारी लग्नविधी करणार असेल त्याने हळदिचा कार्यक्रम होणार नाही याची दक्षता घेऊनच लग्नविधीचा कार्यक्रम स्विकारावा अन्यथा लग्न लावू नये. परंतु असे होत नाही कारण आमच्या संस्था धम्माशी निष्टावान आणि काटेकोरपणे शिलाचरण करणारे बौद्धाचारी निर्माण करीत नाही. आमच्या संस्था बुद्ध-बाबासाहेबांच्या विचारांना कलंकीत करणा-या अशा कार्यक्रमांकडे कोळेझाक का करतात? केवळ लग्न लावुन काही पैसे मिळवणे येवढाच हेतु आहे का? दरेकाने दरेकाला धम्म देण्याचे काम कोण करणार? आमच्या बौद्धाचा-याला सुद्धा मटणावर ताव मारायचा असतो त्यामुळे तो “पानाती पाता वेरमनी” हे शील सांगत नाही.  उलट तो हळदी, डीजे, मटन-दारू याला तो मुक संमती देत असतो.

 

हा लेख माझ्या मालवण तालुक्यांतील सर्व बौद्ध बांधावंसाठी मी लिहिला आहे.  सर्व बौद्धांनी आचरणशील बौद्ध व्हावे  यासाठी हा माझा प्रयत्न आहे. सध्या हे विचार लोकांना पचायला कठिण जातील मला माहीत आहे. परंतु आम्ही ५८ वर्षाचे बौद्ध झालो, आमचा बौद्ध म्हणुन १४ आक्टोबर १९५६ जन्म झाला म्हणजे जवळ जवळ ५८ वर्षाचे म्हातरे झालो, अजुनही धम्माप्रमाणे आचरण करायची भिती का वाटते? बाबासाहेबांच्या एका आदेशांने लोकांनी पिढ्यानपीढ्या जोपासलेले दगडाचे देव सोडुन दिले. आम्ही मात्र अनिष्ट हिंदु परंपरा अजुनही का जोपासत बासावी.?

 

सर्वांचे मंगल होवो
जे जे धम्म मार्गावर चालण्यासाठी निघालेले आहेत ते सर्व त्यांच्या प्रयत्नांत यशस्वी होवोत !  सर्वांना सुखाचा, दु:ख मुक्तिचा, निर्वाणाचा मार्ग मिळो !!
सर्वांचं मंगल होवो!!
सर्वांचं कल्याण होवो!!

 

* * * * *
भाग-२

 

हळदिला औषधी वनस्पतीमध्ये व आयुर्वेदामध्ये तसेच सौंदर्य प्रसाधनामध्ये फार महत्वाचे स्थान आहे.  त्यामुळे ती नेहमी वापरात असावी.  त्याशिवाय आजच्या युगात सौंदर्य वाढविण्यासाठी कितिजन नियमीत हळदिचा वापर करतात? कितीजन लग्न सोहळ्यात ब्युटीशीयनला मेकअपसाठी निमंत्रीत करतात?  ब्युटीशीयन नवरा नवरीला हळद लावतो का?  फक्त लग्नाच्या एक दिवस आधी एकदाच हळद अंगाला लावून माणसाला सौंदर्य प्राप्त होत नाही.  उलट दुस-या दिवशी लग्नाचे किमती कपडे तसेच शुभ्र वस्त्रे वापरायची असतात ती मात्र अंगावरील हळदीमुळे पिवळी होतात.  त्यामुळे हळद बंद करण्याऐवजी सफेद कपडेच वापरायला लोक घाबरतात.  डॉ. बाबासाहेबांनी आपल्या समाजास सफेद कपडे वापरण्याचा उपदेश देताना सांगतात की जरी ठिगळं लागलेले असले तरी ते कपडे स्वच्छ व शुभ्र असावेत.

 

हळदिच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या पाहुण्यांसाठी खास मटणाच्या जेवणाची व्यवस्था केलेली असते.  का?  त्या दिवशी आम्हाला शाकाहारी जेवन पचत नाही का?  हळदिच्या दिवशी त्रीसरण पीचशील घेऊन हळदिचा कार्यक्रम केला जातो,  पंचशील ग्रहण करतांना “पाणातिपाता वेरमणी” म्हणतो, “सुरामेरयमज्ज पमादट्ठाना वेरमनी’’ म्हणतो आणि करतो काय, तर पाहुण्यांसाठी कोंबडं, बकरं कापतो किंवा दुसर्‍याला कापायला भाग पाडतो. किती ही बेइमानी बुद्ध आणि बोधीसत्व बाबासाहेबांशी?  की या महामानवांनी आपणास सदाचरणाची शीले देऊन काही चुक केली का?  बुद्ध व बाबासाहेबांना साक्षी ठेऊन मी प्राणी हिंसा करणार नाही कींवा दुसर्‍याला हिंसा करण्यास कारणीभूत होणार नाही,  मी नशापान करणार नाही किंवा इतरांना करण्यास कारणीभूत होणार नाही या अर्थाची शीले ग्रहण करुन काहीवेळातच ती शीले भंग करुन आपण बुद्धंचा आणि बोधिसत्वांचा अवमान करण्याचं पातक करीत नाही का?  या पापकर्माचे विपाक (परीनाम) त्या भावी वधु-वरांस तसेच त्यांच्या नातेवाईकांस भविष्यात धम्माच्या नियमाप्रमाणे भोगावेच लागतात.  बुद्धांनी व बोधिसत्वांनी आम्हाला शील व सदाचरणाचा आग्रह का केला तर कोणत्याही जीवास आपल्याकडून अनावश्यक दु:ख पोहोचू नये. एका उपद्रव न करणार्‍या प्राण्याचा जीव घेण्याचा आम्हाला काय अधिकार आहे? त्या प्राण्याला होणारे दु:ख जर मला झाले तर असा आपण विचार का करीत नाही?

 

बुद्धांनी सांगीतलेल्या आर्य सत्यांमध्ये ’दु:खाचे अस्तित्व’ या आर्य सत्याला प्रथम स्थान दिले आहे त्याचे कारण या आर्य सत्यामध्ये इतर तीन आर्यसत्ये सामावलेली आहेत.  दु;ख आहे, पण माणूस तो शोधत नाही.  जो पर्यंत माणूस दु:ख पाहायला शिकत नाही. तोपर्यंत तो धम्माच्या मार्गावर चालू शकत नाही.  स्वत:चे व दुसर्‍याचे दु:ख पाहण्यासाठी जेव्हा बकरा किंवा कोंबडीची मान कापली जात असते तेव्हा तीच्या डोळ्यांत पहा, तीला होणारं दु:ख पहा. ती सर्व शक्ती वापरून स्वत:चा जीव वाचवीण्यासाठी, जगण्यासाठी सर्व शक्ती पनाला लावून धडपड करीत असते. तरीसुद्धा तीची क्रृरपणे हत्या केली जात असते. बक‍र्‍याला कापून झाल्यावर हुकाला लटकवलेले त्याचे धडसुद्धा जगण्यासाठी धडधडत असते.  हे जे दु:ख त्या प्राण्याला झालेले असते त्या दु:खाला कारणीभुत आपण झालेलो असतो.

 

एक क्षण असा विचार करा की, मी आता ही हत्या करण्याचे पाप करीत आहे त्याचे विपाक मला भविष्यात जर भोगावे लागले आणि त्या बकरीच्या ठिकाणी जर मी किंवा माझे कुटुंबीय असतील तर त्यांची अवस्था काय असेल याचा विचार तरी आम्हाला सहन होतो का?

 

धम्मपदांतील दण्ड्वग्गातील खालील गाथांचे महत्व आपण लक्षात घेतले पाहिजे.
सब्बे तसन्ति दण्डस्स, सब्बे भायन्ति मच्‍चुनो।
अत्तानं उपमं कत्वा, न हनेय्य न घातये॥
सब्बे तसन्ति दण्डस्स, सब्बेसं जीवितं पियं।
अत्तानं उपमं कत्वा, न हनेय्य न घातये॥
शिक्षेला सर्वच घाबारतात, मृत्यूला सारेच भितात, सर्वांना ।
स्वत:सारखेच समजावे, मारू नये, वध करू नये ॥
शिक्षेला सर्वच घाबारतात, सार्‍यांना जीव प्रिय असतो, सर्वांना ।
स्वत:सारखेच समजावे, मारू नये, वध करू नये ॥
कार्यकारणभावाप्रमाणे विवाह, नामकरण, गृहप्रवेश अशा सर्व मंगल कार्यक्रमाच्याप्रसंगी प्राणी हत्या करुन दिलेल्या मांसाहरी भोजणातून कर्त्यास मृत प्राण्यांचे प्राणांतीक शाप प्रखरतेने लागत असतात.  या कुकर्माची फळे त्यांना भोगावीच लागतात.  म्हणून जे लोक वेगवेगळ्या मंगल कार्यक्रमात प्राणी हत्या करून मटण दारु पाहुण्यांना देतात त्यांनी स्वत:स बौद्ध म्हणवुन घीऊ नये.  मंगलप्रसंगी आणि त्यानंतर सार्वजनिक कार्याच्या वेळी अमंगल कृत्यए सर्वता टाळावीत.  सर्व प्राण्यांचा जीव हा सारखाच असतो.  मग माणसाने इतर प्राण्यांप्रती आशी क्रृरता का करावी?  बुद्धांनी दिलेली पंचशीले आणि बोधिसत्वांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांमधील १३ ते १७ पर्यंतच्या प्रतिज्ञा जशाच्या तशा आहेत.

 

आपण बुद्धांचे उपासक व बाबासाहेबांचे अनुयायी ?? म्हणवुन घेणारे हळदी आणि गोत्रजेवण/ गोतांबीळ या कार्यक्रमांतुन जे प्राणी हिंसा व नशापान सारखे अकुशल कर्म करतो त्यांतुन बुद्ध व बाबासाहेबांच्या विचारांची आपण विटंबना करत नाही का?  जगातील बौद्ध लोक आम्हा भारतीय बौद्धांना आमच्या आचरणावर हसतात.  आम्हाला बौद्धच समजत नाहीत,  कारण आम्ही शीलाचरणाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करीत नाही.  का?  आमच्यासाठी शीलाचरण इतके कठीण आहे का?  आपण ईश्वरप्रधान धर्मातून बाहेर पडून बुद्धांच्या धम्माची दिक्षा घेऊन बौद्ध झालो, त्यामुळे आमचं आचारण बौद्धांसारखं असलं पाहिजे.  ईश्वरप्रधान धर्मातील देव सुरा म्हणजे दारू प्यायचे.  यज्ञात प्राण्यांची आहुती द्यायचे आणि त्यांचे मांस खायचे.  ज्यांचे देवच दारु पित होते त्यांच्या भक्तांनी दारु पिण्यात काय गैर?  आपण आशा देवाचे भक्त आहोत का?  नाही ना, मग बुद्धांनी जे जे त्याज्य ठरविले त्याप्रमाणे उपासकांनी तसे करु नये.

 

माणूस हा निसर्गताच शाकाहारी प्राणी आहे, त्याच्या सर्व शारीराची रचना तसेच त्याचे अवयव शाकाहारी प्राण्यासारखे आहेत.  त्याला लांडगा, कुत्रा, मांजर, कोल्हा या प्राण्यांसारखे शिकार करण्यासाठी  सुळे, तिक्ष्ण नखे, धावण्यामध्ये चपळता इत्यादी गोष्टी माणसात नसतात जे शिकार करण्यासाठी आवश्यक असतात.  तरी सुद्धा मांसाहार आपले अन्न नसतांनाही माणुस मांसाहार करीत असतो. त्यातुन त्याला इतर अन्नापेक्षा अधिक पौष्टीक असे काहीही मिळत नसते.  जगात अस्तित्वात असलेल्या प्राण्यांमध्ये बलवान समजला जाणारा हत्ती हा शाकाहारीच आहे.  त्यामुळे मांसाहार करणारा ताकदवान असतो ही चुकीची समज आहे.   उलटपक्षी मांसाहार करणारा प्राणी हा तामसी,  क्रृर, रागीट, रानटी व हिंस्र प्रवृत्तीचा असतो.  आपण जर शाकहारी माणसांचा समुह व मांसाहर करणा‍र्‍यांचा समूह समोर ठेवला तर त्यापैकी मांसाहारी कोण व शाकाहारी कोण हे त्यांच्या स्वभाच व रुपावरुन लगेच ओळखता येते.  शाकाहारी माणुस शांत स्वभावाचा, बुद्धीवान व संयमी असतो.  सर्व जगात सुखी माणुस कोण यावर संशोधन करण्यासाठी वेगवेगळ्या समुहातील माणसांच्या मेंदुची चाचणी करण्यात आली.  त्या संशोधनात बौद्ध भिक्षु सार्वात जास्त सुखि व बुद्धीवान असल्याचे आढ्ळुन आले.  याचे कारण बौद्ध भिक्षु कधिही हिंसा करीत नाहीत किंवा मांसाहार करीत नाहित,  बुद्धांच्या उपदेशाप्रमाणे सर्व शीलांचे काटेकोरपणे पालन करीत आसतो.  अशाप्रकारे आचरणशील बौद्ध व्यक्ती सर्व जगात सुखी असतो हे विज्ञानाने सिद्ध करुन दाखविले आहे.  हे सत्य असतांनासुद्धा आपण स्वत:ला बौद्ध म्हणवुन घेतो विषेशकरुन नवबौद्ध शिलपालानामध्ये एवढे मागे का?  बाबासाहेबानी आम्हाला धाम्माची दिक्षा का दिली?  या समाजास अनेक पिढ्यांच्या दु:ख, दारिद्र्य, अज्ञान व अंधश्रद्धेच्या दलदलीतुन बाहेर काढुन या समाजास सुखी करण्यासाठी बाबासाहेबांनी आम्हास बुद्धाच्या धम्माची दिक्षा दिली.  परंतु आम्ही भगवान बुद्धानी व बाबासाहेबांनी उपदेशीलेल्याप्रमाणे आमचं आचरण ठेवतो का?  आम्ही पंचशीलांचं पालन करतो का?  जर करीत नसू तर आपण बौद्ध आहोत हे आपल्या नातेवाईकांना, मित्रांना दाखविण्यासाठी पंचशील म्हणत असतो का?  पंचशील हे एखाद्या मंत्राप्रमाणे काल्पणिक देवांना खुश करण्यासाठी, प्रसन्न करण्यासाठी तोंडाने म्हणावयाचे नसते, तर ते आपल्या नेहमीच्या व्यवहारात आचरणात आणायचे असते.  पंचशील हे कोणी आमच्यावर लादलेले नसून तो आपण स्वत: ग्रहण करीत आसतो, म्हणजेच त्यात कोणतीही जोर जबरदस्ती नसते.

 

’सिक्खापदं समादियाम” याचा अर्थ असा की, मी या शिकवणुकीच्या पदाचा स्वत:हुन मनापासुन स्विकार करून  त्याप्रमाणे मझे आचरण ठेवण्याची प्रतिज्ञा मी ग्रहण करतो.  केवळ बुद्ध पुजा केली म्हणजे बौद्ध धम्माचा अनुयायी झालो असे नाही, तर धम्माचे आचरण करणे म्हणते बौद्ध धम्माचे अनुयायी होणे होय.  काया, वाचा, मनाने कोणतेच पाप न करणे म्हणजेच धम्माचे अनुसरण करणे होय.  तसे केले तर आपणसुद्धा सुखी हूऊ शकतो, फक्त आपले आचरण धम्माप्रमाणे असायला हवे.
चंद्रहास तांबे
खारघर
—————————–

आंबेडकरी चळवळीच्या अधिक माहिती विषयी आमच्या फेसबुक पेजला Like करा. – https://www.facebook.com/brambedkar.in/

आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. – https://www.youtube.com/channel/UCNTHN78Rhh–1gZYJ1dwt4A

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?