रोहित वेमुला,
आज नऊ वर्ष झाली तुला जाऊन.
तथाकथित जातीच्या उतरंडीत
मी तुझ्यापेक्षा किंचित वर असलो तरी
तुलाही माहिती आहे
वर्चस्ववाद्यांच्या दृष्टीनं ‘इतर सगळे’ शुद्रच असतात..
त्यामुळं तुझ्याइतकी नाही
पण तुझ्या एक सहस्त्रांश का होईना
काळजावर असह्य घाव घालणारी वेदना
मी ही अनुभवली आहे… आजही अनुभवतोय..
या बलाढ्य यंत्रणेशी लढताना हतबल होऊन
तीन वर्षांपुर्वी मी ही तयारी केली होती तुझ्या वाटेनं यायची
…तुझ्यासारखंच मी ही पत्र लिहिलं होतं, शेवटचं !
पत्राच्या शेवटी ‘जय शिवराय जय भीम’ लिहीताना हात थरथरला !
ते दोन महामानव माझ्याकडं रोखून बघतायत असं जाणवलं…
शहारलो…
काहीतरी जाणवलं…
मनाशी पक्की गाठ मारली…
अचानक आरशात बघितलं आणि अंगावर काटा आला
माझ्या प्रतिबिंबाऐवजी तू दिसत होतास
तू मला म्हणालास…
हे बघ… मी हार मानली पण तू ती चूक करू नकोस
आता पुन्हा कुणाचा रोहित वेमुला झाला,
तर एकही तरूण व्यवस्थेला भिडणार नाही.
तुला या वर्चस्ववादी व्यवस्थेविरूद्ध आवाज उठवत रहायचंय !
तू कलावंत असून त्यांचा अंकित होत नाहीस
याची त्यांना चीड आहे…
तुझ्या विचारांना मिळणारी लोकप्रियता पाहून
त्यांचं पित्त खवळतं…
वैचारिक वादात तुझ्यापुढे टिकू शकत नाहीत म्हणून
त्यांचा तिळपापड होतो…
मग ते चारित्र्यावर शिंतोडे उडवायचं हुकमी कारस्थान खेळणारच…
तू का खचतोस?
त्यांच्या रक्तातच हा कुटीलपणा आहे.
छत्रपती संभाजीराजेंपासुन राजर्षी शाहूंपर्यन्त…
सगळ्यांसोबत हेच डाव खेळलेत त्यांच्या बापजाद्यांनी
पण आज ते दोन्ही महामानव शुभ्र, लखलखणार्या अढळ तार्यांसारखे
अवघ्या महाराष्ट्राच्या नजरेत अभिमानानं झळकताहेत…
त्यांना आदर्श मानतोस ना?
मग उभा रहा शत्रूच्या नजरेला नजर भिडवून.
ते मारहाणीच्या, खुनाच्या धमक्या देतील…
महात्मा फुलेंवर तर मारेकरी पाठवले होते
बाबासाहेबांवरही दगड भिरकावले होते
मागे हटले का ते?
ते तुझं काम हिरावून घेतील…
तुझ्या बोलीभाषेला, तुझ्या पेहरावाला, तुझ्या अन्नालाही कमी लेखतील…
तुझ्या कलेलाही कमअस्सल ठरवुन दाबायचा प्रयत्न करतील…
तुकारामाची तर गाथा बुडवली होती.
तरली ना?
हक्क असूनही तुला पुरस्कारांपासून वंचित ठेवतील
शिवरायांच्या तर राज्याभिषेकाला यांच्या पूर्वजांनी नकार दिलावता
आज त्यांचीच पिलावळ सतत उठता-बसता त्यांना
‘छत्रपती’ हे बिरुद लावायचा लबाड आणि शातीर हट्ट करते,
हे विसरू नकोस.
ते अजूनही लै काय काय करतील
तुला ‘वादग्रस्त व्यक्तीमत्त्व’ म्हणून हिणवतील,
प्रसिद्धीसाठी करतोय म्हणतील,
उच्चवर्णीयांची ठासतोस म्हणून तुलाच ‘जातीयवादी’ ठरवत उलट्या बोंबा मारतील…
अर्वाच्य शब्दांत ट्रोल करतील…
पुनःपुन्हा पोटावर पाय आणतील…
पण तू नड… तू भिड.. तू लढ
भीमरायानं दिलेलं संविधान हातात घे..
आणि अन्याय दिसेल तिथे चढ.
मी केलेली चूक तू करू नकोस…
अन्याय करणारा कितीही बलाढ्य असूदे…
क्रूर असुदे… हिंस्त्र असूदे…
मागं हटायचं नाही…
तुझा लाडका तुकोबाराया जसा न डरता त्या खूँखार व्हिलनला भिडत होता…
‘विठ्ठल’नामाचिया बळावर अवघीयांचें तोंड काळें करत होता…
तसा तुला शंभर हत्तींचं बळ देणारा एक खतरनाक मंत्र आहे
‘जय शिवराय जय भीम !’
मी पूर्णपणे सावरलो… भानावर आलो.
आरशात आता मीच दिसत होतो…
आत्मविश्वासानं भारलेला…
डोळ्यांत चमक, रक्तात रग
आणि काळजात विद्रोहाची आग असलेला
रोहित, मित्रा तेव्हापासून हसतमुखानं संघर्ष करतोय…
‘फ़ैज़’ ने सांगीतल्याप्रमाणे
माझी ‘राह’ हीच आता माझी ‘मंज़िल’ आहे..
ज्यामुळे मी आता फक्त आणि फक्त जिंकतोय…
शत्रू रोज नामोहरम होतोय… नेस्तनाबूत होतोय…
शिवशाहुफुलेआंबेडकरांना मानणारा खरा बहुजन सह्याद्रीएवढं भरभरून प्रेम देतोय…
एवढंच नाही तर जगभरात जिथं-जिथं मराठी माणूस आहे, तिथं मला काळजात जपलं जातंय.
आता एकच ध्येय आहे…
आत्ताचा आणि यापुढचा प्रत्येक विजय हा असंख्य बहुजन पोरापोरींना ताकद देणारा ठरला पाहिजे.
आता पुन्हा रोहित वेमुला हार मानणार नाही…
आता… पुन्हा रोहित वेमुला हार मानणार नाही !
– किरण माने.