भगवान बुद्धांचे अमर्यादित सद्गुण आहेत, पण त्यापैकी थोडे म्हणजे नऊ सद्गुण येथे दिले आहेत. आपण दररोज तसेच वेळोवेळी पाली भाषेमध्ये असलेल्या या नऊ गुणांचे पठण करीत असतो पण त्यांचा अर्थ समजावुन घेण्याचा प्रयत्न करीत नाही, कष्ट करीत नाही. म्हणुनच येथे मराठीमध्ये अर्थ देण्याचा प्रयत्न करीत आहे.
१) अरहं
अरहं म्हणजे भगवान बुद्धांनी आपल्या सर्व दुर्गुणांचे समुळ उच्चाटन केले आहे. साध्या भाषेत दुर्गुण म्हणजे वाईट विचार, वाईट प्रतिक्रिया जसे की क्रोध, चंचलता, द्वेष, निराशा, तणाव, औदासिन्य, अज्ञान, मत्सर, अफवा, आवड, दुराग्रहता आणि इतर.भगवान बुद्धांनी या सर्व दुर्गुणांचा नाश केला व म्हणुनच आपल्याला देखिल या दुर्गुणांचा नाश करण्यासाठी प्रेरित करतात. अरहं या शब्दाचा वारंवार उच्चार करतेवेळी आपण या सद्गुणांचे चिंतन केले पाहिजे, या साठी जापमाळ आपल्याला लक्ष केन्द्रित करण्यासाठी उपयोगी होते. अरहंत व अरहत हे दोन्ही शब्द एकाच व्युत्पत्ती शास्त्रावर आधारीत आहेत व दोन्हींचा अर्थ अरहं असाच होतो.
२) सम्मा सम्बुद्ध
सम्मा सम्बुद्ध या शब्दाचा अर्थ चार आर्यसत्य कुणाही गुरु अथवा शिक्षकाची मदत न घेता सर्वस्वी स्वत:हुन शोधले व त्यांचे संपुर्ण आकलन करुन घेतले. चार आर्यसत्ये जी आपण वाचली आहेत ऐकली आहेत व ज्यांच्याबद्दल विचार केला आहे पण अजुनही या चार आर्यसत्यांना समजवुन घेणे आपल्यासाठी अवघड आहे.
३) विज्जा चरण संपन्नो
विज्जा चरण संपन्नो म्हणजे ज्ञान आणि आचरण किंवा सिद्धांत आणि अभ्यास या दोन्ही क्षेत्रामध्ये पारंगत असणे. भगवान बुद्ध ज्या प्रमाणे बोलायचे त्याप्रमाणे वागायचे व जसे वागायचे तसे बोलायचे. जेव्हा आपण असे करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की विज्जा चरण संपन्नो हा अतिशय मौल्यवान सद्गुण आहे. काही लोकांना सिद्धांत माहित असतात पण त्याप्रमाणे त्यांचा अभ्यास किंवा सराव करीत नाहीत.
४) सुगतो
सुगतो म्हणजे महान वक्ता, योग्य वेळी योग्य शब्द वापरणे व त्यामुळे ऐकणारा एकदम लाभ प्राप्त करु शकतो. भगवान बुद्ध या पारंगत सद् गुणामध्ये होते. सुगतो याशब्दाचा आणखी एक अर्थ म्हणजे दु:खमुक्तीच्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी अतिशय उपयुक्त अशा मार्गावर त्यांनी मार्गक्रमण केले. भगवान बुद्ध जेव्हा साधना करीत तेव्हा वेदना उत्पन्न झाल्यावर या वेदनांचे निरिक्षण दु:ख वाढु न देता ते करीत. पण इतर लोक या वेदनांबद्दल गैरसमज निर्माण करुन घेतात की त्या त्यांच्या आहेत आणि त्यांचा सबंध आसक्ती आणि गर्व याच्यांशी करतात. भगवान बुद्ध या सर्व गोष्टी योग्य पद्धतीने समजुन दु:ख मुक्त झाले. भगवान बुद्धांनी मुक्तीपथावर चालुन स्वत:ला दु:ख मुक्त केले म्हणजे सुगतो.
५) लोकविदु
लोकविदु म्हणजे सर्व लोक जाणणारा. लोक म्हणजे जग, जे सहा असतात. आपण बघतो ते जग, आपण ऐकतो ते जग, आपण गंधाने जाणतो ते जग, आपण चवीने जाणतो ते जग, आपण स्पर्शाने जाणतो ते जग,तसेच विचारांनी जाणतो ते जग. या सहा जगाशिवाय इतर कोठलेही जग नाही. भगवान बुद्ध जाणतात या जगात संघर्ष व सुसंवाद कसे होतात, यात लोक कसे फसतात व या मधुन लोक कसे बाहेर पडु शकतात. म्हणुनच भगवान बुद्धांना लोकविदु म्हटले जाते. तुम्ही या जगाशी सुसंवाद तेव्हा प्रस्थापित करु शकता जेव्हा तुम्ही या जगाला जाणता व त्याला आहे तसे स्विकारता.
६) अनुत्तरो पुरिस धम्म् सारथी
अनुत्तरो पुरिस धम्म् सारथी म्हणजे दुराग्रही, हट्टी व चुकीच्या मार्गावर असलेले यांना योग्य मार्गावर आणणारे गुरु किंवा शिक्षक. भगवान बुद्ध आपल्या एका ओळीच्या प्रवचनाने किंवा प्रवचनांच्या शृंखलेने लोकांना मार्गदर्शन करीत जसे त्यांनी आपले पहिले प्रवचन पाच भिक्षुंना दिले जे पाच दिवस चालले. आपल्याला जेव्हा शिकवण्यात समस्या निर्माण झाल्यावर या सद्गगुणाचे चिंतन केले पाहिजे की भगवान बुद्ध या गुणात कसे सक्षम होते.
७) सत्था देव मनुस्सानं
सत्था देव मनुस्सानं म्हणजे देव व मनुष्यांचे गुरु व नेता. भगवान बुद्धांनी सांगितलेले आपल्याला माहित आहे, खुप महान भिख्खु आपल्याला ते समजवुन देण्याचा प्रयत्न करतात, तरी पण त्यातील यत्किंचित समजवुन घेण्यासही आपल्याला बरेच कष्ट घ्यावे लागतात. भगवान बुद्ध सत्था देव मनुस्सानं होते म्हणुन खुप जण त्यांचे अनुयायी झाले व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर इतक्या वर्षांनी देखिल त्यांना महान गुरु व नेता मानतात.
८) बुद्धो
बुद्धो म्हणजे जो व्यक्ती चार आर्यसत्ये जाणतो. याचा अर्थ सम्मा सम्बुद्धो प्रमाणेच होतो. भगवान बुद्धांनी कुणाचीही मदत न घेता स्वतः चार आर्यसत्ये शोधुन काढली व ती भगवान बुद्धांना स्पष्टपणे माहित आहेत या गोष्टीला येथे अधोरेखित केले जाते.
९) भगवा
भगवा म्हणजे विशेष सामर्थ्याने युक्त अशी व्यक्ती. भगवान बुद्धांनी इतर सर्वांपेक्षाही अधिक पारमी पुण्य संपादित केले होते म्हणुनच त्यांना भगवा असे म्हटले जाते. पारमी पुण्य म्हणजे दानशीलता, नैतिकता, संयम, गृहत्याग, प्रज्ञा, मेहनत, सत्यवाद, अधिष्ठान, मैत्री- करुणा आणि समता. हे सर्व गुण अतिशय कठीण परिस्थितामध्ये देखील अत्युच्च पातळीवर त्यांनी राखले. पु्र्वजन्मामध्ये त्यांनी भौतिक वस्तुच नव्हे आपले शरीर अवयव देखील दान केलेले आहेत.