महाराष्ट्रातील वैचारिक विद्यापीठ हरवले!! सुप्रसिद्ध लेखक, ख्यातनाम विचारवंत, उत्तम प्रशासक: डॉ. जनार्दन वाघमारे!!!

लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील कवठा या अडवळणाच्या गावी स्वातंत्र्याच्या पूर्वी म्हणजे 11 नोव्हेंबर 1934 साली शैक्षणिक सामाजिक व साहित्यिक क्षेत्राला आगळे वेगळे प्रभावशाली वळण लावणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व जन्माला आले त्या वैचारिक विद्यापीठाचे नाव म्हणजे डॉ. जनार्दन वाघमारे होय. 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी आठ वाजता त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सर्वदूर सर्वक्षेत्रात शोककळा पसरली. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असला तरीही वर्षनोवर्ष, पिढ्यानपिढ्या, शतकानु शतके त्यांच्या कार्याचा सुवास दरवळत राहील.

लातूरच्या पूर्वेला  साधारण सात-आठ किलोमीटरवर औसा तालुक्यातील कवठा पाटी आहे. तिथून डावीकडे वळले म्हणजे अर्ध्या एक किलोमीटरवर कवठा हे गाव आहे. अणवाणी पायाने कधी गावातल्या, कधी जवळपासच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या वैचारिक जडण घडणीला सुरुवात झाली ती हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठात. त्यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण तिथे घेऊन पुढे पुणे  येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तर छत्रपती संभाजी नगरच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सरांनी एल.एल.बी., एल.एल.एम. व पी.एच.डी पूर्ण केली. सरांचा इंग्रजी हा विषय अध्यापनाचा असला तरी त्यांनी सर्व भाषेत लेखन केले व अमेरिकन निग्रो साहित्यावर त्यांनी पीएचडी केली. पंजाब मध्ये पतियाला येथील पंजाब विद्यापीठाची सरांना डि.लीट ही सन्मानपूर्वक पदव मिळाली . सरांनी अनेक विद्यार्थी घडवले असले तरी स्वतः मात्र सर आयुष्यभर विद्यार्थी राहिले, एवढे ते लेखन ,वाचन, मनन व चिंतन करत होते.

आयुष्यभर दीन पददलित जनसामान्यांच्या आयुष्यासाठी व तत्वाच्या साहित्यासाठी कधी आंदोलनाच्या, कधी लेखनाच्या माध्यमातून सर वकिली करतच राहिले. त्यांनी तत्त्वांशी ,विचारांशी कधी तडजोड केली नाही. ते अंधश्रद्धेच्या विरोधात  लिहीत राहिले ,भाषण देत राहिले व चळवळीत कामे करत राहिले.

शिक्षणातला लातूर पॅटर्न हा शब्द ज्यांनी देशभर रूढ केला त्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचे सर 24 वर्ष प्राचार्य होते. त्यांच्या कार्यावर संस्थेचा अफाट विश्वास होता व तसे संस्थेचे त्यांना स्वातंत्र्यही होते त्यामुळेच संस्थेचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या सहकार्याने ते काम दिवसरात्र करतच राहिले. एक काळ असा होता की या महाविद्यालयात विद्यार्थी मिळत नव्हते ,तेव्हा आज जे वैभव दिसते ते शून्यातून निर्माण झालेले आहे व या शिखरमय वैभवाचा पाया हा डॉ. जनार्दन वाघमारे आहेत.मला आठवतं की १९७८ साली माझी मॅट्रिक झाली तेव्हा आम्हा विद्यार्थ्यांना या शाहू महाविद्यालयात  प्रवेश घ्यावा म्हणून एजडी या मोटरसायकलवर सर गातेगावला आले होते. हळूहळू प्रयत्नाने या महाविद्यालयाने परिश्रम जिद्द व सुसंस्कारातून आपले वलय निर्माण केले. प्राचार्य असतानाही सरांना वेळेवर वर्गात शिकवताना आम्ही पाहिले असे अनुभव फार आयुष्यात कमी भेटले. आयुष्यभर सरांनी जर कुठला मंत्र आचारात व विचारात जपला असेल तर तो म्हणजे निधर्मीपणा होय. जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणसातल्या माणुसकीचे ते चहाते होते.

सरांनी या महाविद्यालयाचा जो नावलौकिक केला त्याबद्दल मी एके ठिकाणी म्हटले आहे की–
काडीचा नव्हता भाव
त्या जागेचे केले सोने
शिवारांच्या वाटा साऱ्या
गाती शिक्षणाचे  गाणे….

सरांच्या मधला हा सामाजिकतेचा वैचारिकतेचा पारदर्शक आरसा पाहून सरांची 1994 ते 99 असे पाच वर्षे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदी निवड झाली. विद्यापीठाची शिस्त आणि नियोजन त्यांनी जे आखले ते पुढे उपयोगी पडले.  सांगण्यासारखी अनेक उदाहरण आहेत पण एका उदाहरणाचा आवर्जून दाखला देता येईल ते म्हणजे विद्यापीठाच्या राष्ट्रीय ग्राम योजनेतून औसा तालुक्यातील चलबुर्गा या गावाची जी त्यांनी नवीन वसाहत निर्माण केली ,ती परंपरेने चालत आलेल्या संकुचित चौकटीला मोडून व जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व जाती धर्मांची घरं हातात हात घालून एकत्र वसवली हा देशातला पहिला पायंडा म्हणावा लागेल. सरांनी किल्लारी येथे भूकंपग्रस्त अभ्यास संशोधन केंद्र व किनवट येथे आदिवासी अभ्यास केंद्र स्थापन करून एक आगळीवेगळी दिशा दिली.

म्हणून सरांच्याबद्दल साने गुरुजींच्या ओळी आठवतात त्या अशा-

जात कोणती पुसू नका
धर्म कोणता पुसू नका
उद्यानातील फुलास त्याच्या
रंग कोणता पुसू नका…..

सर लोकप्रिय होते, सर विद्यार्थी प्रिय होते म्हणूनच ते जनतेतून थेट निवडून आलेले पाच वर्षे लातूर नगरीचे नगराध्यक्ष राहिले. फिरता दवाखाना, एक खिडकी योजना ,नाना नानी पार्क ,साई पर्यटन ,कचऱ्यापासून खत निर्मिती ,नगरपालिकांच्या शाळेची गुणवत्ता वाढवणे, ग्रंथालयासाठी भरघोस उपाययोजना करणे असे कितीतरी उदाहरणे देता येतील. सरांनी लातूरसह बीड ,धाराशिव आदी जिल्ह्याच्या नियोजन समिती वरती सदस्य म्हणून काम केले. साहित्य संस्कृती मंडळावरती वेगवेगळ्या अभ्यास मंडळावरती सर कार्यरत राहिले.

विधान परिषदेवर काय किंवा राज्यसभेवर काय पण सहसा राजकारणी माणसं सोडून कला, साहित्य, क्रीडा क्षेत्रातील महान व्यक्तींची फार कमी वेळा निवड होते. मात्र फुले ,शाहू ,आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार जपणारे डॉ .जनार्दन वाघमारे यांची राज्यसभेवर निवड झाली. या काळात सरांनी अनेक किमान डझनभर तरी संसदीय समितीवरती काम करून आपला ठसा उमटवला. सरांनी अमेरिका इंग्लंड कॅनडा श्रीलंका आदी परदेशाचा दौरा करून तेथील सर्व संस्कृती जाणून घेऊन त्यावरती ही आपले विचार मांडून लेखन केले आहेत.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पासून ते वेगवेगळ्या सामाजिक साहित्य संस्थेवरती सरांनी काम केले.

केवळ संख्येच्या दृष्टीने नाही तर गुणात्मक दृष्टीने सरांचे 75 पुस्तके प्रसिद्ध आहेत. मुठभर माती, एका नगराध्यक्षाचे चिंतन, हाक आणि आक्रोश,  चिंतन एका कुलगुरूचे, सामाजिक परिवर्तनाच्या दिशा, बदलते शिक्षण, विचारमुद्रा ,मंथन ,सहजीवन, विमर्श ,यमुनेचे पाणी ,नव्या दिशांचा शोध, राष्ट्राच्या शोधात भारत, स्वातंत्र्यलढा ,साहित्य वेध ,सत्ता समाज आणि संस्कृती, तत्त्वज्ञ महाराजा सयाजीराव गायकवाड, उषःकाल होता होता ,ध्यास परिवर्तनाचा आदी पुस्तके वाचक विसरणार नाहीत एवढी ती  वाचनीय आहेतच  शिवाय साहित्याच्या त्यांनी केलेल्या समीक्षा या साहित्यिकांना प्रेरणादायी आहेत.साहित्याच्या वेगवेगळ्या प्रकारात सरांनी लेखन केला आहे. वेगवेगळ्या भाषेत सरांनी लेखन केले आहे. या शैक्षणिक सामाजिक व साहित्य क्षेत्रातील त्यांच्या अफाट कार्याबद्दल केंद्र राज्य शासनासह वेगवेगळ्या सामाजिक संस्थेचे सरांना किमान 66 पुरस्कार लाभले आहेत. सरांना राज्यभरातील अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद लाभले.मराठवाडा साहित्य परिषदेचे सर अध्यक्ष होते. मराठवाडा साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष राहिले परंतु साहित्य क्षेत्राच्या दुर्दैवाने सरांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होऊ शकली नाही याच्या खोलात जाऊन चर्चा करण्याची ही वेळ नाही परंतु आगाध उंचीचा हा माणूस अखिल भारतीय संमेलनासाठी निवड झाली असती तर त्या साहित्य संमेलनाची उंची वाढली असती व साहित्य संमेलनाला एक आगळीवेगळी वैचारिक दिशा लाभली असती असे मला वाटते व सरांच्या निवडीने जात-पात गट तट याच्यापलीकडे साहित्य परिषदेची वाटचाल राहिली असती. सर हल्लींच्या साहित्य परिषदेतील संकुचित चौकटीत कधी बसले नाहीत.रोखठोक व परखडपणा हा सरांच्या स्वभावाचा स्थायीभाव नव्या पिढीला घेण्यासारखा आदर्श आहे.

1986 साली ‘जगणं माणसाचं’ या माझ्या पहिल्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाला सर उपस्थित होते. त्यांच्या काही पुस्तकात माझ्या वात्रटिकेंचा उल्लेखही आहे. सरांनी हजारो व्याख्याने दिली व शेकडो साहित्यिकांच्या पुस्तकांना अगदी सहज प्रस्तावना देत राहिले यासाठी त्यांनी कधी आढेवेढे घेतले नाहीत व कधी वेळही लावला नाही. त्यानंतर माझी संख्येच्या दृष्टीने 60 पुस्तके झाली तेव्हा या दीड वर्षात ज्या ‘जागरण’ला अडीच डझन पेक्षा जास्त पुरस्कार लाभले आहेत त्या जागरणवरती समीक्षा ग्रंथ निघावा असे सरांनी बोलून दाखवले व ते काम मी हाती घेऊन भारतपर्व हा 720 पानांचा समीक्षा ग्रंथ निघाला. या विषयाचा यासाठी उल्लेख केला की अगदी पाच सहा महिन्यापूर्वी सरांनी जागरण वरती या वयातही चौदा पानांची समीक्षा लिहून दिली व ती भारतपर्व मध्ये छापून आली, एवढेच नाही तर या ग्रंथाची पाठराखणही सरांनी लिहून दिली. तेव्हा काही मित्रासह अगदी तीन आठवड्यापूर्वी हा ग्रंथ त्यांना दिला तेव्हा सर खूप वेळ आमच्याशी गप्पा मारत होते.. सध्याच्या अनेक शैक्षणिक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विसंगतीच्या परिस्थितीबद्दल सर  फार तळमळीने बोलत होते. तोच विचार ,तोच आवाज आजही विसरता येत नाही. सर म्हणजे एक वैचारिक विद्यापीठ होते. सर म्हणजे अंधारात चाचपणणाऱ्या लेखणीसाठी पहाट होते.


सर म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व होते. राऊत यांनी केलेला सरांच्या मूठभर माती या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद या दोन दिवसात प्रकाशक देणार होते व त्यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन होणार होते ,तसेच क्रिएटिव्ह प्रकाशनाने सरांची प्रकाशित केलेली नवयान व गंथव्य ही पुस्तकेही या आठवड्यात सरांना बघावयास मिळणार होती. निर्झर प्रवाहासारखे सरांचे लिहिते हात कधीच थांबले नाहीत. त्यांची प्रत्येक लेखन डोळे उघडे ठेवून व डोळे उघडावेत एवढे वैचारिक लेखन आहे..सरांचे शब्द म्हणजे आम्हा साहित्यिकांच्या पाठीवरले प्रेरणेचे मायाळू हात होते…

एवढे खरे की महाराष्ट्रातले वैचारिक विद्यापीठ हरवले आहे. हे निसर्गचक्र ,हा काळ कोणासाठी थांबत नाही ह खरे असले तरी सरांचे साहित्य वाटाड्या म्हणून आमच्यासाठी थांबले आहे. विद्यार्थी प्रिय प्राचार्य, ख्यातनाम विचारवंत ,उत्तम प्रशासक देहाने हरवला असला तरी ध्येयाने आपल्यातच असणार आहे ,जो विसरता विसरणार नाही!!!

– भारत सातपुते
लातूर
(80 87 69 5000)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *