गावात आंबेडकर जयंती काढली, म्हणून जातीयवादी लोकांना ते पटलं नाही त्याच विषयावरून त्यांनी अक्षय ला संपवून टाकलं.
याबद्दल सविस्तर माहिती, मृतक अक्षय भालेरावच्या भावाचा जवाब!
मी समक्ष पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे हजर राहून विचारल्या वरून जबाब देतो की, मी परिवारासह वरील ठिकाणी राहत आहे.मी माझा मयत झालेला भाऊ अक्षय तसेच अन्य भाऊ गौतम आणि अजय, आई वंदना व वडील श्रावण यांचेसह राहतो. सर्व जण मोल मजुरी करून जगतात. आज आमचे गावातील मराठा समाजातील नारायण विश्वनाथ तिडके याचे लग्न बामणी येथे झाल्यावर त्याने बोंढार हवेली गावात वऱ्हाडासह येऊन सायंकाळी वरात काढली होती.
त्यात त्याने डी. जे. लावून डान्स करत करत मुख्य रस्त्याने हातात तलवार, खंजर, लाठ्या-काठ्या घेऊन ओरडत ओरडत चाललेले होते. त्या दरम्यान विठ्ठल तिडके याचे घरासमोरील कामाजी तिडके यांच्या दुकानावर मी व माझा भाऊ अक्षय श्रावण भालेराव आम्ही किराणा सामान आणण्यासाठी गेलो होतो. तेथे लाईटचा लख्ख उजेड होता. सायंकाळी अंदाजे साडे सात वाजण्याची वेळ असावी. आम्हास तेथे बघून संतोष संजय तिडके हा मोठ मोठयाने ओरडून आम्हाला जातीवरुन शिव्या देवून, यांना तर जीव मारलं पाहिजे.. गावात भीम जयंती काढता का? असे मोठ्याने म्हणत होता.
त्यानंतर कृष्णा गोविंद तिडके, निळकंठ रमेश तिडके, नारायण विश्वनाथ तिडके, शिवाजी दिगंबर तिडके या सर्वांनी लाठ्या-काठ्यांनी व लाथाबुक्यांनी माझ्या भावास मारहाण केली. त्यानंतर वरील सर्वांनी माझ्या भावाचे हात व पाय धरून ठेवले आणि त्यातील संतोष म्हणाला- दत्ता खतम करुन टाक याला…
तेव्हा संतोष व दत्ता यांनी त्यांच्या हातात असणाऱ्या खंजरने माझ्या भावाच्या पोटात सपासप वार केले. तेव्हा माझा भाऊ मेलो-मेलो वाचवा वाचवा… असे म्हणत होता. तेव्हा मी माझ्या भावाला वाचविण्यासाठी मध्ये पडलो असता तेथे असलेले महादू गोविंद तिडके, बाबुराव सोनाजी तिडके व बालाजी मुंगल या सगळ्यांनी ‘खतम करुन टाका’, असे म्हणत मलाही लाथा बुक्यांनी मारहाण केली. तेव्हा दत्ता विश्वनाथ तिडके याने त्याचे हातात असलेल्या खंजीरने माझ्या डाव्या दंडावर वार केला. त्यात मी जखमी होऊन माझे रक्त वाहू लागले. त्यानंतर वरील सर्वांनी एकत्र येऊन आमचे बौद्ध वस्तीवर जोरदार दगडफेक केली.
माझी आई वंदनाने माझ्या लेकरांना सोडा असं म्हणत विनवणी केली. पण अशाही परिस्थितीत महादु गोविंद तिडके, बाबुराव सोनाजी तिडके यांनी लाठ्या-काठ्या व दगडाने माझ्या आईस मारहाण केली. मी यातील सर्व लोकांना प्रत्यक्ष माझे भावावर, आईवर व माझेवर खंजर, लाठ्या-काठ्या व दगडाने हल्ला करुन खून करताना पाहिले आहे. मी वरील सर्वांना ओळखतो. मी वरील सर्वांना माझे भावाला मारु नका, त्याला सोडा अशी अनेकदा विनंती केली. तेव्हा या महाराला आता सोडून उपयोग नाही, असे म्हणून वरील सर्वांनी सामूहिकपणे जोरदार प्राणघातक हल्ला करुन माझ्या भावाचा निर्घृण खून केला असून मलाही खंजरचा वार करून जखमी केलेले आहे. यावेळी आम्हास वाचवण्यासाठी आमचे मदतीला निलेश सुरेश भालेराव, संदेश सुरेश भालेराव, धम्मानंद चांगोजी भालेराव आले व त्यांनी सोडवा सोडव केली. वरील सर्वांविरोधात माझी कायदेशीर तक्रार आहे.
– आकाश श्रावण भालेराव (वय २९ वर्षे)
व्यवसाय-टेन्ट हाऊस मजूर
रा. बोंडार हवेली ता. जि. नांदेड.