पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा अमृत महोत्सव – प्रा. हरी नरके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७४ वर्षांपुर्वी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. [ १३ सप्टेंबर १९४५] हे संस्थेचे अमृत महोत्सवी वर्ष. या संस्थेने आजवर अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले. अनेक मान्यवरांना संस्थेकडून खूप काही मिळाले.

विशेषत: औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयातून दलित [आंबेडकरी] साहित्याचे शिल्पकार म्हणता येतील अशा दिग्गजांची जडणघडण झाली. संस्थेच्या नव्या शाखा निघाल्या. संस्थेचे आकारमान वाढले. विद्यार्थी तसे प्राध्यापकांची संख्या वाढली. उपक्रम वाढले. इमारती वाढल्या.

डॉ. बाबासाहेबांनी ते एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिकत असतानाच आपण शिक्षण संस्था काढायची, तिचे महाविद्यालय गुणवंत-नामवंत असेल अशी उभारणी करायची असे मनाशी ठरवले होते. बी.ए.च्या परिक्षेत त्यांच्या वर्गात पहिल्या आलेल्या गजेंद्रगडकरांनाच त्यांनी पुढे आपल्या महाविद्यालयात पहिले प्राचार्य म्हणून नियुक्त केले. समाजातील खूप नामवंत आणि गुणवंत असलेल्या व्यक्तींना आपल्या संस्थेत आवर्जून बोलावून घेतले. प्राचार्य म.भि.चिटणीस, प्राचार्य म.ना.वानखडे, मधू दंडवते, भालचंद्र फडके, रा.ग.जाधव, वा.ल.कुलकर्णी, मे.पु.रेगे, शां.शं.रेगे, स.गं.मालशे आदींची निवड करताना त्यांनी निवडलेली माणसं किती भली होती याची खात्री पटते.

२० जुलै १९४२ रोजी डॉ. बाबासाहेब व्हॉईसरायच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले. त्यांच्याकडे दहा मोठया खात्यांचा कार्यभार होता. त्यांनी अनुसुचित जातींसाठी केंद्रीय नोकर्‍यांमध्ये ८.३३ टक्के आरक्षणाची तरतूद करून घेतली. मात्र लवकरच त्यांच्या लक्षात आले की, शिक्षणाअभावी अनुसुचित जातींमधून पात्र उमेदवार मिळायला अडचण येते. त्यांनी तातडीने शिक्षण संस्था उभारणीला सुरूवात केली. मंत्रालयासमोरच्या शासकीय बराकींमध्ये संस्थेचे वर्ग भरत असत. मुंबईत तेव्हा नोकरी करून शिकणार्‍या गरिब, होतकरू मुलांमुलींसाठी सकाळचे एकही महाविद्यालय नव्हते. ती उणीव बाबासाहेबांनी भरून काढली.

फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि विनोदी लेखक बाळ गाडगीळ हे गरिब ब्राह्मण कुटुबांतले. गाडगीळ नोकरी करून शिकले ते बाबासाहेबांच्या या महाविद्यालयामुळे. यांनी आपले आत्मचरित्र बाबासाहेबांना अर्पण केलेले आहे.

अशा असंख्य ज्ञात अज्ञातांच्या वाटचालीत पीपल्स एज्युकेशनने शिक्षणाची सावली दिली.
बाबासाहेबांनी आपला अफाट ग्रंथसंग्रह पीपल्सच्या ग्रंथालयांना दिला. पालीभाषा, बौद्ध संस्कृती, आधुनिक ज्ञानविज्ञान या बाबतीत ही संस्था अग्रेसर राहावी असे त्यांचे स्वप्न होते. ” शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा” हा मूलमंत्र बाबासाहेबांनी या संस्थेला दिला. पहिल्या दोनांवर जेव्हढा भर दिला गेला तितके लक्ष तिसर्‍याकडे दिले गेले काय?

संस्थेचे आजवरचे योगदान मोठेच आहे, तथापि बाबासाहेबांना जे अभिप्रेत होते ते संशोधन आणि ज्ञाननिर्मितीचे कार्य इथे घडले काय? अपेक्षित उंची, गुणवत्ता संस्था निर्माण करु शकली काय? याचेही आत्मपरीक्षण यानिमित्ताने व्हायला हवे.

इतर संस्थांच्या तुलनेत पीपल्स एज्युकेशन सोसायटी नेमकी कुठे कमी पडली? मुंबई, पुणे, औरंगाबाद, महाड, नांदेड, कोल्हापूर, दापोली, पंढरपूर, बंगलोर आणि बुद्धगया यापलिकडे संस्थेच्या शाखा किती निघाल्या?

संस्था उभारणे, त्या सुरळीतपणे चालवणे, त्यांचा विकास करणे आणि संस्थेचा नावलौकिक-गुणवत्ता यात सातत्याने वाढ करणे यात बहुजन का कमी पडतात, ज्ञानी माणसं जोडणं, माणसं सांभाळणं हे आम्हाला का जमत नाही? यावरही प्रकाश टाकला जायला हवा.

  • प्रा. हरी नरके, ११ सप्टेंबर २०१९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?