भारताची राज्यघटना तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी महत्वाची कामगिरी केली, त्याबद्दल त्यांना सन्माननीय पदवी देऊन त्यांचा सत्कार करण्याची योजना अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी ने १९५० साली आखली. युनिव्हर्सिटी ने तसे त्यांना कळविले. ज्या युनिव्हर्सिटी तुन आपण M.A. PH.D. या पदव्या १९१५ व १९१७ सालात घेतल्या ती युनिव्हर्सिटी आपल्या कर्तृत्वाने प्रभावित होऊन आपला सन्मान करण्यासाठी आपणाला आणखी एक पदवी डॉक्टर ऑफ लॉज (L.L.D.) देऊन आपला सन्मान करीत आहे हे पाहून बाबासाहेबाना फार आनंद झाला. आपल्या आयुष्यातील मनात बाळगलेल्या सर्व महत्वकांक्षा आपण जिवापाड परिश्रम करून सफल केल्या, याचे त्यांना समाधान वाटले. परंतु यावेळी भारताच्या मंत्रीमंडळापुढे मोठे मोठे प्रश्न उपस्थित झालेले होते आणि ते घटनात्मक पद्धतीने हाताळून सोडविणे इष्ट होते. या महत्वाच्या कामाला बाजूला सारून कोलंबिया युनिव्हर्सिटी ची पदवी घेण्याकरिता न्यूयॉर्कला जाणे बाबासाहेबांना प्रशस्त वाटले नाही. म्हणून त्यांनी युनिव्हर्सिटी ला कळविले की सध्या मला अमेरिकेला येण्यास सवड नाही. युनिव्हर्सिटी चे त्यावेळेचे अध्यक्ष जनरल एसेन हॉवर हे होते. हेच पुढे अमेरिकेचे अध्यक्ष झाले. बाबासाहेब त्यावेळी गेले असते तर एसेनहोवेर च्या हस्ते पदवीदान समारंभ झाला असता. कोलंबिया युनिव्हर्सिटी बाबासाहेबांच्या गैरहजेरीत पदवी देण्यास तयार होती. पण बाबासाहेबाना ते नको होते. आपल्या विद्वत्तेला कारणीभूत झालेल्या युनिव्हर्सिटीत स्वतः जाऊन पदवी स्वीकारण्याची त्यांची इच्छा होती. म्हणून एक दोन वर्षात आपण पदवी स्वीकारण्यास येऊ असे त्यांनी युनिव्हर्सिटी ला कळवले. शेवटी १९५२ च्या एप्रिलमध्ये, सर्व प्रमुख कामाच्या व्यापातून मोकळे झाल्यावर त्यांनी युनिव्हर्सिटी शी पत्रव्यवहार केला. युनिव्हर्सिटी ने पदवीदान समारंभ ५-६-१९५२ ला करण्याचे जाहीर केले. ज्या पंडितांना मानाच्या उच्च पदव्या द्यावयाचे ठरविले होते त्यांची यादी युनिव्हर्सिटी ने मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात जाहीर केली. तीत बाबासाहेबांचे नाव होते. ते वाचून त्यांच्या हजारो चाहत्यांनी त्यांना अभिनंदनपर तारा व पत्रे पाठविली. त्या चाहत्यांपैकी भारताचे भारत सरकारचे उप राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक होते._*
*_कोलंबिया युनिव्हर्सिटी चा पदवीदान समारंभ तारीख ६ जून, न्यूयॉर्क, येथे झाला. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना एल एल डी(L L D) पदवी बहाल करण्यात आली.