आंबडवे मंडणगड रत्नागिरी

बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव कोकणातील आंबडवे व मूळ आडनाव सकपाळ होते. कोकणामधील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी कर शब्द जोडण्याचा प्रघात असे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ असतांना त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांनी सातारा येथील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल) मध्ये ‘आंबडवेकर’ असे आडनाव ७ नोव्हेंबर १९०० रोजी नोंदवले.

बाबासाहेबांना आंबेडकर हे आडनाव सुद्धा याच शाळेत मिळाले. प्रेमाने स्वतःच्या शिदोरीतील घास देणारे कृष्णाजी केशव आंबेडकर सारखे शिक्षकही येथेच त्यांना भेटले. त्यांचे आडनावही त्यांच्या आंबेड या गावावरून तयार झाले होते. ते आडनाव सुटसुटीत वाटल्याने त्यांनी बाबासाहेबांना पण सुचवले. तो पर्याय योग्य वाटल्याने शाळेतील दाखल खारीज रजिस्टर मध्ये १९१४ क्रमांकावर तसे नोंदवण्यात आले. शाळेत येण्यापूर्वी त्यांच्या वडिलांनी त्यांचे काही शिक्षण घरीच घेतले होते. त्यामुळे बाबासाहेब शाळेच्या त्या रजिस्टरमध्ये मोडी लिपीमधील स्वाक्षरी करू शकले. लहानपणी त्यांचे नाव भीमा/भिवा असे होते. “भिवा रामजी आंबेडकर” अशी स्वाक्षरी असलेले ते रजिस्टर शाळेने प्राणपणाने जपून व लॅमिनेशन करुन ठेवले आहे. अभ्यागतांसाठी झेरॉक्स केलेल्या स्वरूपातील प्रत तयार केलेली आहे. आंबेडकर गुरुजी मंगळवार पेठेतील व्यंकटपुरात राहत. बाबासाहेब मजूर मंत्री झाले, तेव्हा गुरुजींना भेटण्यासाठी साताऱ्याला व्यंकटपुरातील घरी गेले होते.

कृष्णाजी आंबेडकर गुरुजींची तिसरी पिढी आज कार्यरत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना मदत करून आपल्या पणजोबाचा सामाजिक वसा आंबेडकर कुटुंब आजही पुढं नेत आहे. त्याबरोबरच गुरू-शिष्याच्या साताऱ्यातील ‘त्या’ ऐतिहासिक आठवणींचा अनमोल ठेवाही या कुटुंबाने मौखिक पद्धतीने दर पिढीगणिक अभिमानाने जपला आहे.

कृष्णाजी गुरुजींची आज तिसरी पिढी पुणे, सातारा आणि मुंबईत विखुरली आहे. त्यातील थोरली पाती मुंबईत आहेत. राजीव आंबेडकर आयडीबीआयमधून निवृत्त झाले. अॅड. संजय आणि अॅड. विनायक यांची मुंबईत ‘आंबेडकर असोसिएट्स’ ही लाॅ फर्म आहे. मुंबईतील आंबेडकर कुटुंब दरवर्षी काही आदिवासी मुलांना शिक्षणासाठी मदत करतात. महालक्ष्मी ट्रस्टवर अॅड. विनायक आंबेडकर काम करतात. गरजूंना वैद्यकीय मदत निधीसाठी त्यांचा हात नेहमीच पुढे असतो. मुंबई लघुवाद न्यायालयाच्या बार रूममध्ये बाबासाहेबांचे १२ फुटी तैलचित्र अॅड. विनायक आंबेडकरांनी लावले आहे.

कृष्णाजी गुरुजी ८५ वर्षे जगले. हयात आंबेडकर कुटुंबातील कुणीही गुरुजींना पाहिलेले नाही; पण त्यांच्या आठवणी मौखिक परंपरेने या कुटुंबानं कायम जिंवत ठेवल्या आहेत. आंबेडकर कुटुंबाकडे कृष्णाजी गुरुजींचा छायाचित्रं आणि पत्रांचा जो ऐतिहासिक ठेवा होता, तो त्यांनी पुण्यातील सिम्बाॅयसिस वस्तुसंग्रहास दान करून टाकला.

कृष्णाजी केशव आंबेडकर गुरुजी मूळचे रत्नागिरी जवळील ‘वांद्री’ गावचे. त्यांना पेशव्यांनी ‘आंबेड’ गावाचे वतन दिल्याने त्यांना ‘आंबेडकर’ आडनाव पडले. आंबेडकर कुटुंब देवरुखे ब्राह्मण. मिशनरीबरोबर कृष्णाजी गुरुजी काम करत. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन विशाल होता.चांगदेव खैरमोडे आणि धनंजय कीर लिखित बाबासाहेबांची चरित्रं प्रमाण मानली जातात. पण या ग्रंथांत बाबासाहेबांच्या मूळ गावाचे नाव ‘आंबावडे’ असे छापले आहे. ती माहिती चूक आहे. बाबासाहेबांच्या गावाचे नाव ‘आंबडवे’ होते. त्या वेळच्या रीतीने बाबासाहेबांचे आडनाव ‘आंबडवेकर’ असे झाले असते. म्हणूनच कृष्णाजी गुरुजींनी ते बदलवले.

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?