डॉ. हर्षदीप कांबळे यांचे कार्य; शेतमजुराच्या मुलाला IIT चे शिक्षण देऊन USA ला पाठवले…

डॉ.बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिने आयएएस अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांचे कार्य; शेतमजुराच्या मुलाला IIT चे शिक्षण देऊन USA ला पाठवले…
सामाजिक दृष्टिकोनातून माणसं मोठी व्हावीत याकरिता सातत्याने प्रयत्नांची पराकाष्टा करणारे
डॉ.हर्षदीप कांबळे व्यक्तिमत्व यवतमाळ जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला परिचित आहे. ते यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना शेतमजूरी करून आपली रोज गुजार करणाऱ्या देवानंद डांगे परिवारातील सुरजची परिस्थिती जेमतेम होती. २००७ मध्ये कांबळे साहेबांना घेतलेल्या समतापर्वच्या वतीने वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या सुरज डांगेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर एक प्रभावी भाषण दिलं, शब्दांमधील जादू आणि त्याचा धीटपणा जिल्हाधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांना आवडला..या वकतृत्व स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक घेतल्यानंतर सूरज आणि राळेगाव येथील कु. चंदनखेड़े यांना यवतमाळ येथे जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यावर रीतसर स्नेहभोजनाचे आमंत्रण देण्यात आल.अठराविश्व दारिद्र्य असणाऱ्या दोन्ही मुलांच्या आई-वडिलांना पंचपक्वान्नाचे भोजनदान देवून त्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम घेऊन शिक्षण घेतले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपणही आपल्या आयुष्याचं सार्थक करा आणि समाजाचा विकास करा असा मूलमंत्र त्यावेळी डॉ. कांबळे यांनी दिला. लाजऱ्या ,बुजऱ्या चेहऱ्याने स्नेह भोजनाचा लाभ घेत असताना सुरज, डॉ. हर्षदीप कांबळे सर यांच्या जवळ आला आणि म्हणाला, सर मला खूप शिकून मोठा व्हायचे आहे…. त्यावेळेस मी तुझ्या सोबत आहे असे सरांनी आश्वासन दिले. आणि मला बोलाऊन सुरज च्या शिक्षणासाठी काय लागेल ते देऊ, त्याच्यावर लक्ष ठेव असे म्हणाले. आणि सुरजचा प्रवास सुरु झाला, लगेच घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथे सुरजची जवाहर नवोदय विद्यालयसाठी वर्ग ६ मध्ये निवड झाली.

अभ्यासात हुशार असणाऱ्या सुरजने एकदा नवोदय विद्यालयाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवल्यानंतर परत तो कधी मागे सरला नाही. लहान वयापासूनच अभ्यासाची गोडी आणि व्यासंग असणाऱ्या सूरजला फक्त कमतरता होती ती आर्थिक मदतीची. अधून मधून तो बोबड्या बोलात डॉ. हर्षदीप कांबळे सर यांच्याशी बोलायचा सर मी पहिल्या क्रमांकाने पास झालो, त्यावेळी जिल्हाधिकारी कांबळे सरांचे वाक्य असायचं “

अभिनंदन

बेटा” तुला मोठं व्हायचं आहे, आणि अशातच हळूहळू दहावीची परीक्षा गुणवत्ता यादीमध्ये परीक्षा केल्यानंतर नारायणा ज्यु.कॉलेज हैदराबाद येथे त्याला आयआयटी जेईईच्या करिता पाठविन्यात डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आर्थिक मदत केली. येथूनच सुरु झाला सुरजच्या जीवनाचा अविरत संघर्ष.

घरातील अठराविश्व दारिद्र्याला सोडून थेट सुरजने आकाशात भरारी घेतली. जेव्हा ,जेव्हा सूरजला मदत लागेल त्या त्या वेळी त्याला मदतीचा हात समोर करून त्याला उभं करण्याचं काम एका आयएएस अधिकाऱ्यांना करावं हे एक उत्तम उदाहरण आहे. मी स्वतः सरांसोबत कधी कधी जात असे.. आदिवासी पोळावर असणाऱ्या माणसाचे आयुष्य बदलवित त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी थेट प्रयास करीत आर्णी तालुक्यात नाथजोगी समाजासाठी निवासी वसाहत आणि शाळा काढून त्यांनी समाजमन दाखवून दिले.
एवढेच नाही तर रानावनात भटकंती करणाऱ्या व समाजाने गुह्नेगार म्हणून हिनवलेल्या फाँसेपारधी समाजाच्या उन्नतीसाठी स्वत:पारधी बेड्यावर जाऊन तेथील समाज बांधव व विद्यार्थी यांच्याशी संवाद करीत या बेड्यावरील अजूबा भोसले (पोलिस पाटील), तेजू पवार (बस चालक), शारदा पवार (परिचारिका), अंजुता भोसले (चालक) ही मुले आज नोकरीवर लागलीत.ही किमया साहेबांच्या मदतीची आहे.
सुरजने खूप अभ्यास करून IIT जी परीक्षा पास होऊन दाखवली आणि IIT चेन्नई येथे ऐरोस्पेस इंजिनेअरिंगला ऍडमिशन घेतले. कधी त्याला गरज लागली तर सर नेहमीच हाथ पुढे करायचे. चेन्नई येथील आयआयटीचे शिक्षण घेतल्यानंतर सुरजची झेप मात्र काही वेगळी होती, त्याने प्रयत्नही सोडले नाही. यश संपादन केल्यानंतर थेट डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी आपली मनीषा त्यांच्याजवळ व्यक्त केली की, मला” एमएस” करायला “अमेरिकेला “जायचं आहे आणि तिथून सुरू झाला आकाशामध्ये झेप घेण्याचा प्रवास.
कुठल्याही प्रकारची आर्थिक चिंता न करता सातत्याने दानाच्या भूमिकेत असणाऱ्या या प्रशासकीय अधिकाऱ्याने कधीही मागेपुढे न पाहता सूरजला थेट मुंबई येथे बोलावून घेतले आणि अमेरिकेला World famous परड्यू विद्यापीठ येथे एमएस (एरोस्पेस इंजीनियरिंग) करण्यासाठी जो खर्च येईल तो करण्याची हमी देत, प्रशासकीय पातळीवर आणि स्वतः त्याला जाण्याची परवानगी, पासपोर्ट, विमानाचे तिकीट तसेच इतर सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्यात. येत्या ९ ऑगस्ट २०१९ ला सुरज अमेरिकेला रवाना होणार आहे.
समतापर्वच्या वतीने पहिला लहानसा मुलगा दत्तक घेऊन त्याचा पूर्ण शिक्षणाचा खर्च करीत त्याला थेट अमेरिकेला शिक्षणासाठी पाठविले. आज तो आपली प्रतिक्रिया देताना म्हणाला की, सामाजिक दृष्टिकोनातून डॉ. हर्षदीप कांबळे सर यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांमध्ये असणारी प्रशासनातील खुर्ची कशी असावी याचे उत्तम उदाहरण आमचे सर आहेत .त्यांचे आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या मिळालेले सहकार्य मी कदापिही विसरू शकणार नाही.
समाजातील एक एक मुलगा आपल्या पायावर उभा व्हावा हा उदात्त दृष्टिकोन डॉ. हर्षदीप कांबळे सर यांचा मोलाचा वाटा आहे. खरंच यांच्या कार्याला तोड नाही. सुरजच्या अंधाऱ्या आयुष्यामध्ये हर्षाचा दीप तेवत ठेवणारे हे व्यक्तिमत्व समाजासाठी नक्कीच आदर्श आहे. त्यामुळेच समाजातील तळागाळामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक घटकाला विकासाच्या आणि उन्नतीच्या प्रवाहात आणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिने डॉ. हर्षदीप कांबळे साहेब यांच्या कार्याला आमचा सलामच आहे…
जय भीम…जय बुध्द…जय भारत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?