बाबासाहेबांनी माजलेल्या कार्यकर्त्यांना दिलेली उपमा आज ही लागू पडते?

१९५४ साली बाबासाहेब मुंबईतील मरीन लाइनच्याजवळ असलेल्या मेरा बेला हॉटेलमध्ये राहून सुमारे दोन महिने उपचार घेत होते.तेव्हा देवळाली येथे भाऊराव गायकवाड यांनी एक सभा घेतली होती.सभेमध्ये गायकवाडांच्या कार्यकर्त्यांनी आर.आर.भोळे यांच्यावर टीका केली.यावर नाराज होऊन भोळे यांच्या समर्थकांनी मारामारी करून सभा उधळून लावली.ही बातमी जेव्हा बाबासाहेबांना पी.टी.मधाळेकडून समजली तेव्हा ते अतिशय संतापले आणि संतापाच्या भरात त्यांनी कार्यकर्त्यांना ‘माजलेल्या रेड्याची उपमा दिली…
बळवंतराव वराळेनी तो प्रसंग लिहिला आहे.तो प्रसंग असा श्री.मधाळे यांच्याकडून देवळालीची सर्व हकिकत ऐकल्यानंतर बाबासाहेब मला म्हणाले, “तुम्ही लोक जर माझ्या हयातीतच असे भांडणतंटे करू लागलात तर आपल्या समाजाचा भविष्यकाळ मला काही बरोबर दिसत नाही. खऱ्या समाजसेवकाने मोठेपणाच्या आहारी न जाता केवळ सेवाधर्म म्हणून समाजसेवा करण्याच्या दृष्टीने तत्पर राहिले पाहिजे.तरच कार्यकर्त्याला हाती घेतलेल्या कार्यात यश येईल व त्यामुळे समाज सुदृढ व संघटित होईल.
आपले कार्यकर्ते आपआपसांतील भेदभावामुळे जर एकमेकांशी झुंज करू लागले तर त्याचा परिणाम फारच वाईट होणार आहे.आताच्या कार्यकर्त्यांना स्वत:च्या मोठेपणाची अहंभावना वाटत असेल तर ते अत्यंत घातक आहे.मनात उत्पन्न झालेला तो एक प्रकारचा माजच आहे. अशा कार्यकर्त्यांना मरीआईच्या जत्रेसाठी वळू म्हणून सोडलेल्या रेड्याचीच उपमा देणे योग्य होईल.खेडेगावात सोडलेले हे रेडे एकदोन वर्षांत फार माजतात.कारण कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध त्यांना नसतो.शिवारात अगर इतरत्र ते अगदी मुक्तपणे वावरत असतात.त्याचप्रमाणे माजलेल्या कार्यकर्त्यांना वाटत असते.आपण काहीही केले तरी समाज खपवून घेईल असे त्यांना वाटत असते .
मरी आईला सोडलेला वळू माजल्यानंतर उकिरड्यात किंवा घाणीच्या ठिकाणी आपली शिंगे खुपसून आपल्याच शिंगांनी आपल्याच अंगावर घाण उडवून घेत असतो.त्याचप्रमाणे माजलेले हे कार्यकर्तेदेखील माजलेल्या रेड्याचेच अनुकरण करीत आहेत आणि त्याप्रमाणे आपल्या अंगावर घाण उडवून घेत आहेत. माजलेल्या रेड्याचेच अनुकरण करीत आहेत. मोकळ्या हवेत माजलेल्या रेड्याला भविष्यकाळात आपले काय होणार आहे याची कल्पना नसते.काही दिवसांनी मरीआईच्या जत्रेत आपली कत्तल होणार आहे हे त्यांच्या ध्यानी-मनीही नसते.पण त्यांच्या दुर्दैवाने पुढे त्यांची कत्तल केली जाते.त्याचप्रमाणे कार्यकर्ते कितीही शेफारले किंवा मन मानेल तसे वागू लागले तर पुढे त्यांचीदेखील काही धडगत होणार नाही.
जनता त्यांचे हे बेबंदशाहीचे व समाजाच्या अनहिताचे कृत्य बिलकुल सहन करणार नाही. मला विश्वास आहे की जनता अशा कार्यकर्त्यांचा एके दिवशी बळी घेतल्याशिवाय राहणार नाही. “बाबासाहेब हृदय पिळवटून समाजाबद्दलच्या असीम कळवळयाने पोटतिडकीने असे सारखे बोलत होते.त्यांना त्रास होत होता.पण त्याकडे त्यांचे लक्ष नव्हते. बाबासाहेबांनी माजलेल्या कार्यकर्त्यांना दिलेली रेड्याची उपमा अगदी सार्थ होती.
संदर्भ : डॉ बाबासाहेब आंबेडकरांची सांगाती, पृ.१९०-१९१
साभार पोस्ट: राजदिप पुणेकर.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?