दामोदर प्रकल्प आणि डॉ. #बाबासाहेब_आंबेडकर

एकेकाळी दामोदर नदी बिहार राज्यावरील मोठे संकट होते. दर दोन-चार वर्षांनी नदीला महापूर येई आणि लाखो लोकांचे जीवन आणि वित्त नष्ट होत असे. सन १८५९ पासून या नदीला आलेल्या मोठ्या पुरांच्या बारा नोंदी करण्यात आल्या होत्या. बरोबर ७७ वर्षापूर्वी १७ जुलै १९४३ मध्ये या नदीला असाच मोठा पूर आला आणि त्यावेळेला त्याने सर्व रेकॉर्ड मोडले. अपरिमित हानी झाली. ११ हजार घरे वाहून गेली. लाखो लोक बेघर झाले. बंगालमध्ये अन्नधान्य पोहोचणे कठीण झाले. त्यातच दुसऱ्या महायुद्धाची धुमश्चक्री चालू असल्याने कलकत्त्यापर्यंत बॉम्बवर्षाव होत होते. पुन्हा बंगालमध्ये दुष्काळाने कहर केला. पंचवीस हजार लोक मरण पावले आणि म्हणून इंग्रज सरकारने दामोदर नदीला कायमचा अटकाव घालणारी योजना राबविण्याचा विचार सुरू केला.
दामोदर प्रकल्प पूर्ण करण्याचे काम कोणावर सोपवावे याचा ब्रिटिशांना प्रश्न पडला. पण शेवटी व्हाइसरॉय कौन्सिलचे सभासद असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वत्ता, हुशारी व कामाचा उरक पाहून त्यांच्यावरच या प्रकल्पाची जबाबदारी सोपविण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी कोळसा खाणी, मुद्रण व लेखन सामग्री, लष्कर व मुलकी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे, लष्कर भरती, गृहबांधणी व सार्वजनिक बांधकाम अशी अनेक खाती सांभाळीत होते. डॉ. आंबेडकर यांना सुद्धा दामोदर खोरे योजना हा कल्याणकारी प्रकल्प पूर्णत्वास जावा असे वाटू लागले. त्यांनी अमेरिकेतील टेनेसी नदीचा अभ्यास केला. टेनेसी खोऱ्याच्या योजनेचे अनेक अहवाल मागवून घेतले व स्वतः अभ्यास केला. नोकरशहांवर अवलंबून राहिले नाहीत. त्याचप्रमाणे भारतातील म्हैसूर येथील तुंगभद्रा व पंजाब मधील छोट्या मोठ्या धरणांचा सुद्धा अभ्यास केला.
त्याचवेळी मजूर खात्याच्या अंतर्गत सेंट्रल पॉवर बोर्ड नावाचे एक मंडळ स्थापन करण्यात आले. स्वतः आंबेडकर हे त्याचे अध्यक्ष होते. नद्या, धरणे अणि विद्युत प्रकल्प हे सर्व या खात्याकडे सोपविण्यात आले. सुमारे तीस महिने दामोदर नदीच्या धरण प्रकल्पावर राजकीय विचार मंथन करण्यात आले. शेवटी आंबेडकरांच्या खंबीर धोरणामुळे राजकीय निर्णय घेण्यात येऊन दामोदर प्रकल्प डॉ. आंबेडकरांनी कार्यान्वित केला. सदर योजना राबविण्याकरिता अनुभवी आणि हुशार तंत्रज्ञ हवा होता. त्यासाठी हे काम इजिप्तमधील आस्वान धरणावर काम करणाऱ्या प्रमुख ब्रिटिश इंजिनीयरला द्यावे असे इंग्रज सरकारचे मत होते. परंतु आंबेडकरांनी इंग्लंडमध्ये भारतासारख्या विस्तीर्ण अशा नद्या नाहीत
आणि तेथील इंजिनीअरनां अशा मोठ्या नद्यांवर धरणे बांधण्याचा अनुभव नाही असे ठणकावून सांगितले. त्यापेक्षा अमेरिकन तंत्रज्ञ उपयुक्त आहेत असे आपले म्हणणे त्यांनी ब्रिटिश सरकारला मान्य करण्यास भाग पाडले. यावरून तांत्रिकदृष्टया सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सक्षम असल्याचे ब्रिटिशांना कळून चुकले.
अमेरिकन तंत्रज्ञांचे काम संपल्यानंतर सेंट्रल वॉटर इरिगेशन नेव्हिगेशन कमिशनचे काम बघण्याकरिता लायक भारतीय तंत्रज्ञ नेमणे आवश्यक होते. आणि आंबेडकरांना यासाठी केवळ भारतीय माणूसच हवा होता. त्यावेळी पंजाबमध्ये मुख्य अभियंता पदावर ए.एन.खोसला होते. त्यांच्या नावाची शिफारस झाली. परंतू त्यांचे डॉ.आंबेडकरांबद्दल मत कलुषित होते. त्यांनी डॉ.आंबेडकरांच्या हाताखाली काम करण्यास प्रथम नकार दिला. परंतु डॉ.आंबेडकरांनी त्यांना भेटीस बोलावून स्पष्ट सांगितले की एखादा इंग्रजी किंवा अमेरिकन इंजिनिअर नेमणे मला कठीण नाही. परंतु मला भारतीय तंत्रज्ञ हवा आहे. आंबेडकरांचे हे खडे बोल ऐकून मुख्य अभियंता खोसला यांचे डोळे उघडले आणि त्यांनी ते पद तात्काळ स्वीकारले.
दामोदर व्हॅली योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रंदिवस मेहनत करून कार्यान्वित केली. त्याच बरोबर भाक्रा नानगल धरण, सोन रिव्हर व्हॅली प्रोजेक्ट, हिराकुड धरण यांची मुहूर्तमेढ रोवली. पुढे स्वातंत्र्यानंतर व देशाचे विभाजन झाल्यानंतर काकासाहेब गाडगीळ यांच्या कारकिर्दीत दामोदर प्रकल्प पूर्ण झाला. अमेरिकेत अनेक प्रादेशिक योजनांचा पाया जॉर्ज डब्ल्यू नॉरीस यांनी १९२२ पूर्वी घातला, तेव्हा तेथील जनतेने त्यांच्या स्मरणार्थ एका धरणाला त्यांचे नाव दिले. मात्र दामोदर योजना राबविण्यासाठी डॉ.आंबेडकरांनी ज्या खस्ता खाल्ल्या, तांत्रिक अभ्यास केला, जीवाचे रान करून बिहार, ओरिसा व बंगाल प्रांताला नवजीवन दिले त्याची आठवण म्हणून त्या प्रकल्पास त्यांचे नाव देखील दिले गेले नाही. DVC च्या वेब साईटवर त्यांच्याबद्दल साधी कृतज्ञता सुद्धा दिसून येत नाही, म्हणूनच याबद्दल तीव्र खंत वाटते आणि खेद ही वाटतो.
15)
— #संजय_सावंत ( नवी मुंबई )
( संदर्भ :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लेखक – वसंत मून )

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?