

सध्या आपला भारत देश अतिशय भयानक परिस्थितीतून वाटचाल करीत आहे. येणारा काळ हा नवीन पिढीसाठी अतिशय कठीण असून त्यांच्यासमोर जातीधर्माचे व्देषयुक्त वातावरण तयार करुन आपण काय मांडून ठेवत आहोत याचे भान नसलेल्या लोकांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. कारण मेंदू काढून टाकलेल्या एका नव्या जमातीने सध्या आपला देश पूर्णपणे ताब्यात घेतला आहे. ज्या लोकांनी हा मेंदू गायब करण्याचा कार्यक्रम मागील काही वर्षापासून अतिशय नियोजनपूर्वक राबविला आहे ते लोक आपल्या कुटील खेळीत संपूर्णपणे यशस्वी झाले असून बहुसंख्य लोकांच्या मेंदूवर त्यांनी कब्जा मिळविला आहे.
मेंदू हा मानवी शरीराचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. मानवी मेंदू हा खरे-खोटे, चांगले-वाईट यांची पडताळणी करीत असतो. चिकीत्सा, तपासणी, संशोधन करुन विचारपूर्वक मत व्यक्त करतो.
परंतु सध्या आपल्या देशात स्वतःच्या मेंदूने विचार करण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबविण्यात आली असून दुस-यांच्या मेंदूने विचार करणा-यांची एक मोठी जमात तयार झाली आहे.
ही जमात म्हणजे एक खतरनाक झुंड असून तटस्थपणे व स्वतंत्र विचार करणा-या लोकांना या झुंडीने त्रस्त करुन टाकले आहे. ही एक अतिशय विकृतांची मोठी टोळी असून सरकारच्या धोरणाला संवैधानिक पध्दतीने विरोध करणा-यांना शिवीगाळ करणे, धमक्या देणे, त्यांच्या कुटुंबियांचे चारित्र्यहनन करणे व अतिशय खालच्या पातळीवर जाऊन मानसिक त्रास देणे हे या मेंदू काढलेल्या टोळीने सुरु केले आहे. भारतीय संविधानाचे सर्व फायदे घेणारी ही धर्मांध झुंड संविधानाचे नियम व कायदे मानणा-यांना मात्र टार्गेट करत आहे.
जे लेखक, पत्रकार, विचारवंत, कलाकार एखाद्या समाजविघातक कृत्यावर आपले मत स्पष्टपणे व्यक्त करतात, त्यांना सरळ देशद्रोही किंवा पाकिस्तान समर्थक ठरवून डायरेक्ट पाकिस्तानात चले जाव ची धमकी ही मेंदूहीन जमात देत असते.
ज्या लोकांचा इतिहास इंग्रजांना माफी मागण्याचा, स्वातंञ्य संग्राम सैनिकांचे पत्ते इंग्रजांना देण्याचा आहे व ज्यांच्या माफीनाम्यावर भारताच्या संसदेत जाहीरपणे चर्चा झाली आहे, तेच लोक देशभक्तीचा खोटा आव आणून इतरांना देशप्रेमाचे सर्टिफिकेट वाटत आहेत.
संविधानाच्या कायद्याने निवडून आलेले लोक त्यांच्याच कार्यालयाजवळ खुलेआम भारताचे संविधान जाळूनही चूप राहतात. यावरुन खरे देशद्रोही कोण हे आपण ठरवू शकतो.
बरं ही मेंदू काढून टाकलेली जमात शैक्षणिकदृष्ट्या अशिक्षित नाही, ती फार उच्चविद्याविभूषीत आहे. मोठमोठया पदव्या व पदे भूषविणारी आहेत. परंतु ती स्वतःच्या डोक्याने विचार न करता दुस-यांच्या डोक्याने विचार करते. जातीयवाद्यांच्या कंपूमधे मधे तयार झालेले अर्धवट, अपूर्ण, धर्मांधवादी, कट्टरतावादी व देशविघातक मॕसेजेस अजिबातही विचार न करता जसेच्या तसे फाॕरवर्ड करणारी ही विकृत टोळी आहे.
हे उच्चविद्याविभूषीत असूनही स्वतःची काहीच नवनिर्मिती करत नाही. चार ओळी लिहू शकत नाही, दोन शब्द बोलू शकत नाही, स्वतंत्रपणे आपले मत मांडू शकत नाही. फक्त खोटे फोटो व मॕसेजेस फाॕरवर्ड करुन देशातील वातावरण दुषित करतात.
जातीय-धार्मिक दंगली पेटवून स्वतः आपल्या मुलाबाळांना घेवून घरात सुरक्षितपणे लपून बसतात. गोरगरीबांची मुले मात्र विनाकारण यांच्या व्देषाची शिकार होवून दंगलीत मरण पावतात. यांची मुले डाॕक्टर, इंजिनियर बनून लोकांना देशप्रेमाचे डोज पाजतात. त्यांची देशप्रेमाची व्याख्याही फार वेगळी आहे.
मुस्लिमांचा व आपल्याच धर्मातील तथाकथित खालच्या जातींचा व्देष करणे म्हणजेच देशप्रेम अशी त्यांची देशप्रेमाची संकुचित व्याख्या आहे.
या तथाकथित देशप्रेमी लोकांपेक्षा कमी शिकलेले किंवा अशिक्षित लोक खूप चांगले आहेत. ते विचार करुन बोलतात. शांतपणे प्रतिक्रीया देतात.
वेगवेगळ्या जातीधर्माचे सामान्य लोक एकत्रितपणे एक दुस-यांच्या कार्यक्रमात सहभागी होतात. शेतात, दुकानात एकत्रितपणे काम करतात, एकमेकांच्या डब्यात जेवण करतात. याच साध्याभोळ्या लोकांच्या भरवशावर हा देश टिकून आहे. ही माणसे आपल्या देशप्रेमाचा कधीही गाजावाजा करीत नाही. हे सामान्य लोक पैशाने गरीब आहेत. परंतु विचारांनी खूप श्रीमंत आहेत. परंतु देशाला खरा धोका स्वतःला सुशिक्षित समजणा-या काही लोकांकडूनच जास्त आहे.
सीमेवर देशाचे रक्षण करणा-या जवानांच्या पत्नींच्या चारित्र्यावर संशय घेणारे लोक आपल्या देशात आमदार आहेत व स्वतःला देशप्रेमी म्हणवून घेत आहेत. देशासाठी शहीद झालेल्या वीराच्या पत्नीने शांततेने हा प्रश्न सोडवा असे आपले मत व्यक्त करताच, त्या वीरपत्नीला देशद्रोही ठरवून गलिच्छ शिवीगाळ करणारी व ट्रोल करणारी मानसिक विकृतांची जमात हेच या देशाचे खरे शत्रू आहेत.
शहीदांच्या टाळूवरील लोणी खाणारे व शहीदांच्या बलिदानाचा फायदा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी घेणारे हे विकृत लोक आहेत. त्यांना जर युध्दाची एवढीच खुमखुमी असेल तर आधी यांना सीमेवर पाठवा आणि दाखवू द्या देशप्रेम ! त्यांच्या घरातील एखादा व्यक्ती शहीद होवू द्या. मग पहा म्हणा घरातल्या माणसाच्या जाण्याचे काय दुःख असते तर ! यांनी आपले मेंदू मुठभर लोकांकडे गहाण टाकले आहेत. पूर्णपणे गुलाम बनून दुस-यांची चाटुगिरी करण्यातच हे धन्यता मानतात.
अशा लोकांपासून देशाला फार मोठा धोका निर्माण झाला असून देशाला अराजकतेकडे व तालिबानी बनविण्यासाठी यांचे प्रयत्न सुरु आहेत. घरात बसून सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील वातावरण खराब करणारे हेच खरे देशाचे शत्रू आहेत. विचारी, सुज्ञ, देशावर व संविधानावर प्रेम असणाऱ्या लोकांनी, मेंदू काढून टाकलेल्या अशा धर्मांध लोकांना जोरकसपणे विरोध केला पाहिजे. देशाच्या कल्याणासाठी व अखंडतेसाठी ते आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
( “अवेक इंडिया” या त्रैमासिकामधील लेख)