डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांचे खरे नाव यशवंत. त्यांचा जन्म १२ डिसेंबर १९१२ रोजी मुंबई येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना न्यूमॅनेटीक आणि पायाच्या पोलिओसारखे आजार होते, पण गावठी औषधांच्या उपचाराने ते बरे झाले. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. १९ एप्रिल रोजी त्यांचे विवाह मीराताई आंबेडकर यांच्याशी झाले.
स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहिलेले व्यक्तिमत्त्व
भय्यासाहेबांनी कधीही बाबासाहेबांच्या नावाचा फायदा घेतला नाही. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वतःच्या कष्टाने आणि प्रामाणिकपणाने घडविले.
-
त्यांनी स्वतःचा सिमेंटचा कारखाना उभारला.
-
नंतर मुंबई विमानतळ परिसरात बांधकाम व्यवसाय सुरू केला आणि त्यात त्यांनी कोणालाही भागीदार न घेता स्वतंत्रपणे यश मिळवले.
चळवळीत सक्रिय सहभाग
हळूहळू त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीत सक्रिय भूमिका घ्यायला सुरुवात केली. त्यांनी ‘भारतभूषण प्रिंटींग प्रेस’ सुरू केली, जी पुढे ‘बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस’ या नावाने ओळखली जाऊ लागली.
१९४४ पासून बाबासाहेबांच्या सर्व मुखपत्रांचे व्यवस्थापन तेच पाहत होते. जनता आणि प्रबुद्ध भारत यांचे ते मुख्य आधारस्तंभ होते.
महत्वाचे ग्रंथ छापण्याचा सन्मान
भय्यासाहेबांच्या प्रेसमध्ये बाबासाहेबांचे अनेक ऐतिहासिक ग्रंथ प्रथमच प्रकाशित झाले—
-
Thoughts on Pakistan
-
Federation vs Freedom
-
Thoughts on Linguistic States
-
वा. गो. आपटे लिखित बौद्धपर्व
त्यांची भाषा, शैली आणि लिखाण अत्यंत तर्कशुद्ध, प्रभावी आणि वाक्प्रचारांनी समृद्ध होती.
बाबासाहेबांची स्मारके उभारण्याची महान कामगिरी
भय्यासाहेबांनी बाबासाहेबांच्या स्मारकनिर्मितीत अतुलनीय योगदान दिले—
-
मुंबईतील डॉ. आंबेडकर सभागृहाचे भूमिपूजन २ एप्रिल १९५८ ला व उद्घाटन २२ जून १९५८ ला झाले.
-
कफ परेड येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण २६ जानेवारी १९६२ रोजीच व्हावे, यासाठी त्यांनी स्वतः आर्थिक मदत करून काम वेळेत पूर्ण केले.
-
मनुस्मृती दहन स्थळ – चवदार तळे येथे अशोकस्तंभाच्या धर्तीवर क्रांतीस्तंभ उभारण्याचा पुढाकार त्यांनीच घेतला.
-
चैत्यभूमीचा परिसर मिळवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. BMS कडून ४०x४० जागा मिळवताना त्यांनी मागणीपेक्षा एक इंचही कमी जागा स्वीकारली नाही.
भीमज्योतीची ऐतिहासिक यात्रा (1966)
डॉ. बाबासाहेबांच्या अमृत महोत्सवानिमित्त 1966 साली भय्यासाहेबांनी “भीम-ज्योत – महू ते मुंबई” ही भव्य यात्रा काढण्याचे ठरवले.
२७ मार्च १९६६ रोजी भारताचे मजूरमंत्री ना. जगजीवनराम यांच्या हस्ते भीमज्योत प्रज्वलित करण्यात आली.
ही ज्योत महू, इंदौर, भोपाळ, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे, महाड, पनवेल, ठाणे मार्गे चैत्यभूमीवर पोहोचली. या यात्रेत मिळालेल्या धम्मदानातून चैत्यभूमीचे स्मारक उभारले गेले.
धम्मप्रचारासाठी आयुष्य समर्पित
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर भय्यासाहेब भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले.
“भारत बौद्धमय करीन” हा बाबासाहेबांचा संकल्प त्यांनी हृदयाशी बाळगला.
-
त्यांनी देशभर धम्मदीक्षा, धम्मपरिषद, धम्ममेळावे आयोजित केले.
-
विधानपरिषदेत बुद्धिष्ठ समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी प्रखर आवाज उठवला.
-
मोरारजी देसाई यांना भेटून बुद्धिष्ठ समाजासाठी सवलतींची मागणी केली.
-
ते सिलोन्, थायलंड, ब्रम्हदेश, सारनाथ, दिल्ली येथील जागतिक बौद्ध परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करत.
१९६८ मध्ये मुंबईतील धम्मपरिषदेस दलाई लामा प्रमुख पाहुणे होते. या परिषदेत ‘‘बौद्ध जीवन संस्कार पाठ’’ हा महत्त्वपूर्ण ठराव पारित झाला.
भय्यासाहेब हे ‘बौद्धाचार्या’ या पदाचे जनक म्हणूनही ओळखले जातात.
महापंडित काश्यप – त्यांचे संन्यास जीवन
१९६७ मध्ये, धम्मचक्र प्रवर्तन दिनी त्यांनी श्रामणेर दीक्षा घेतली आणि त्यांना महापंडित काश्यप हे नाव प्राप्त झाले. ते काही काळ चैत्यभूमीवर राहत होते.
स्वाभिमानी व्यक्तिमत्त्व
एकदा ब्रिटनहून संघरक्षित यांनी “धार्मिक कार्य आम्हाला सोपवा, आम्ही त्याची योग्य किंमत देऊ” असे सांगितल्यावर भय्यासाहेबांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले—
“मी माझ्या बापाची संस्था विकणार नाही. काम करायचे असेल तर आमच्यात येऊन करा.”
गोरगरिबांसाठी झोकून दिलेले आयुष्य
भय्यासाहेबांनी आपले संपूर्ण जीवन गोरगरिबांच्या सेवेसाठी, धम्मप्रसारासाठी आणि बाबासाहेबांच्या स्मारकांच्या निर्मितीसाठी वाहून घेतले.
ते खरेच—
चैत्यभूमीचे शिल्पकार, महापंडित काश्यप, सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर!







विनम्र अभिवादन 🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼