*जातक कथा*
एके काळी अभ्यंकर नावाचा एक सद्वर्तनी धम्मीक तरुण वाराणसीचा राजा झाला. त्याचा संजय नावाचा एक हुशार माळी (उद्यानपाल) होता.एके
दिवशी अभ्यंकर त्याला म्हणाला, “संजय, तुझ्या उद्यानामध्ये एखादी आश्चर्यकारक गोष्ट दाखवू शकशील काय?”
“जर मला लागेल तेवढा मध देण्याचा हुकूम होईल तर मी महाराजांना थोडक्याच दिवसांत एक अपुर्व आश्चर्य दाखवीन.”
राजाने आपल्या कोठारातून संजयाला लागेल तेवढा मध देण्याची आज्ञा केली.
त्या उद्यानामध्ये रोज एक वातमृग येत असे;(असे म्हणतात की, वातमृग हा अतिशय दुर्मिळ आणि मानवाची चाहूल लागताच क्षणात पळून जाऊन दिसेनासा होणारा हा प्राणी)
संजयानें राजाच्या कोठारांतून मध आणून तो उद्यानातील गवताला सारवला. हळूहळू वातमृगाला त्या गवताची इतकी गोडी लागली की, तो संजयच्या जवळ जाऊन देखील ते गवत
खाऊ लागला. काही दिवस लोटल्यावर संजय राजाला म्हणाला, “महाराज, आज तुम्हाला मी उद्यानातील आश्चर्य दाखविणार आहे. दुपारी ते पाहण्यासाठी आपण राजवाडयातच राहावे.”
नंतर संजय उद्यानात गेला; आणि तो वातमृग तेथे आल्यावर त्याने त्याच्यासमोर मध लावलेले गवत टाकले. ते खाल्यावर राजवाड्याच्या बाजूला काही अंतरावर आणखी गवत टाकले. याप्रमाणे हळूहळू त्या मृगाला संजयने राजवाड्यात आणून बाहेरचा दरवाजा बंद केला व तो राजाला म्हणाला, “महाराज,
वातमृग मनुष्याच्या छायेलादेखील उभा राहात नाही, हे आपण जाणतच आहात. असे असता त्याला मी येथपर्यंत आणून सोडले हे अपूर्व आश्चर्य नव्हे काय?”
राजा म्हनाला, “वातमृग मनुष्याच्या वाऱ्याला उभा राहात नाही ही गोष्ट खरी आहे. परंतु *रसतृष्णा/लोभ* मोठा बळकट आहे. आपल्या जिभेला जर हा वातमृग वश झाला नसता तर तो तुझ्या ताब्यात कधीही आला
नसता. पण जिभेच्या मागे लागल्यामुळे तू नेशील तिकडे त्याला जाणे भाग पडले! जिभेचे बंधन बळकट खरें!!”