भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते
वाणीत भीम आहे करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते
गोळी खुशाल घाला, फाशी खुशाल द्यारे
खोटे इथे खऱ्याचे दुसरेच टोक असते
तत्त्वाची जाण असती बिनडोक लोक नसते
सारे चलन तयांचे ते रोखठोक असते
सद्भाव एकतेचे जर अन्तरात असते
तुटले कुणीच नसते सारेच एक असते
वामन, समान सारे स्वार्थाने अंध नसते
तुझिया नीतीप्रमाणे सारेच नेक असते
भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते
—लोकशाहीर वामनदादा कर्डक