महामनस्वी महामानवा-(२)
अगणित गुणगंभीरा
त्रिवार तुजला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा-(२)
अगणित गुणगंभीरा
त्रिवार तुजला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा-(२)
चवदार तळ्याचे पाणी, पेटून उठे चैतन्य
तुज पूढती निष्प्रभ झाले वावदूक पंडित मन्य
जयशाली दलित दलाचा तू सेनानायक धन्य
पददलिता आधार दिला तू-(२)
धीर दिला रणधीरा
त्रिवार तुजला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा-(२)
विष जहरी अन्यायाचे पचविलेस आत्मबलाने
दलितांच्या दुबळ्या माना केल्यास ताठ अभिमानें
निर्दयासी लाजविले तू, देऊन दयेची दाने
समतेसाठी झुंजलासी रे-(२)
अपराजित खंबीरा
त्रिवार तुजला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा-(२)
मन स्वतंत्र नाही ज्याचे तो मुक्त असूनही दास
मन स्वतंत्र नाही ज्याचे जीवन मृत समजा खास
हा मंत्र महामोलाचा तू दिलास या देशास
हे प्रति बुद्धा अभिनव बुद्धा-(२)
नवयुग घटनाकारा
त्रिवार तुजला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा-(२)
—वसंत बापट