लयास गेली युगायुगाची हीन दीन अवकळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा
रानमाळ असता भीमाने देह इथे झिजविला
शिंपडून रक्ताचं पाणी शिवार हा भिजविला
बहरली कणसं इमानी माणसं
नाचतो जोंधळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा
त्रिसरणाची झडप तयाला कुंपण पंचशीला
बुद्धं सरणं मार्ग एक हा जाण्यासाठी भला
फिटते भ्रांती मिळते शांती
फुलते जीवनकळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा
बोधिवृक्ष हे डुलती कैसे बांधाबांधावरी
गोड लागते साऊलीत या जीवनाची भाकरी
मळा हा राखू फळे हि चाखू
झरा बाजूला निळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा
कोल्हेकुई हि कुपाकुपानं चाले बाहेरून
दुहीचा कुंदा वरती डोके काढितो आतून
हरेन्द्रासंग धरूया दोघं
हाती एकीचा विळा
पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा