२४ सप्टेंबर १८७३ रोजी क्रांतिबा फुले यांनी सामाजिक समता व समताप्रधान समाजनिर्मितीसाठी १४० वर्षापूर्वी पुणे येथे ”सत्यशोधक समाजाची” स्थापना केली होती. क्रांतिबा फुले यांनी सत्यशोधक विवाहपध्दती या नावाची एक अभिनव सामाजिक व धार्मिक क्षेत्रात मूलभूत परिवर्तन करणारी क्रांतिकारी पध्दत अमलात आणली. स्वत: जोतिरावांनी ब्राह्मणांच्या गैरहजेरीत सत्यशोधक विवाहपध्दतीने लग्ने लावली. सत्यशोधक समाजाच्या वतीने शूद्रातिशूद्रांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यासाठी महामानव ज्योतिबा फुले यांनी अर्ज मागवून घेतले व दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली.
समाजाच्या आमूलाग मौलिक परिवर्तनाकरिता हिंदू समाजरचनेतील माणसांना उच्चनीच मानणारा, जातिभेद, कर्मकांड, मूर्तिपूजा, स्त्रीदास्य, अंधश्रद्घा यांचे निर्मूलन करुन वैचारिक क्रांती घडविण्याकरिता पुरोहितांकडून होणार्या अन्याय, अत्याचारापासून, गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. `निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’ हा विचार फुले यांनी मांडला. देवाविषयी किंवा निसर्गाविषयी निर्मिक हा शब्द वापरला. क्रांतिबा फुलेंनी ही जी सत्यशोधक चळवळ सुरु केली होती, ती अंधश्रध्दा निर्मुलनाचीच चळवळ होती. या चळवळीत फक्त सध्याचे ढोंगी बुवा-बापु, अम्मा- टम्मा, करणी-भानामती याचाच भांडाफोड नसून कल्पनेतील देव सुद्धा सामिल होते. हे करीत असतांना राष्ट्रपिता फुलेंनी लोकद्रोहाची भीती बाळगली नाही… राष्ट्रपिता फुलेच भारतीय अंधश्रध्दा निर्मूलनाचे खरे जनक आहेत.
महामानव जोतिबा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांची मांडणी केली आहे. धर्मभेद आणि राष्ट्रभेद यांच्याविरुद्घ महान सत्य कोणते? असा प्रश्न उपस्थित करुन फुल्यांनी म्हटले आहे, ‘‘स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यांच्या पायावर अवघ्या मनुष्यजातीचे एक कुटुंब निर्माण करणे, हेच मनुष्यतत्त्वाचे सर्वोच्च ध्येय होय. सर्व मानव, स्त्री किंवा पुरुष यांचे हक्क सारखे आहेत. मानव किंवा कोणताही मानवसमुदाय यांना दुसर्या मानवावर वा समुदायावर स्वामित्व गाजविण्याचा, जबरदस्ती करण्याचा सर्वाधिकार नाही. राजकीय व धार्मिक मतांमुळे कोणतीही व्यक्ती उच्च वा नीच मानून तिचा छळ करणे, म्हणजे सत्याचा द्रोह करणे होय. प्रत्येकाला स्वत:च्या मताचा प्रसार करण्याचा हक्क व अधिकार आहे. सर्वांना ऐहिक जीवन उपभोगण्याचा सारखाच अधिकार आहे. शेती, कलाकौशल्य, मजुरी आदी कामे माणसास हीनपणा आणीत नसून त्यांच्यायोगे त्यांचे मोठेपणच सिध्द होते. सृष्टीच्या कार्यकारणभावाचा अर्थ ध्यानी घेऊन त्या सृष्टीचा किंवा निसर्गशक्तीचा मनुष्याच्या गरजा भागविण्यासाठी उपयोग करणे, हा मनुष्याचा मूलभूत अधिकार व कर्तव्य होय. या विश्वात जगण्याकरिता आणि उपभोगाकरिता वस्तू उत्पन्न करणे किंवा मिळविणे, हे माणसाचे पहिले कर्तव्य आहे. त्याकरिता परस्परांना साहाय्य करणे, हा मानवाचा श्रेष्ठ धर्म आहे; एवढेच नव्हे, तर ही भगवंताची पूजा आहे. भजन, नामस्मरण, जपजाप्य, प्रार्थना, भक्ती या गोष्टींची ईश्वराला गरज नाही; त्याला माणसाच्या स्तुतीची, भक्तीची मुळीच गरज नाही. ज्योतिबा फुले यांनी विशद केलेले हे सत्य म्हणजे हजारो वर्षांच्या परिश्रमाने संपादन केलेल्या संस्कृतीचे आणि ज्ञानाचे सार आहे. त्यांनी सत्यज्ञानाचे साधन किंवा प्रमाण कोणते, यासंबंधी समग्र चर्चा केली आहे. शुद्घ सत्य हे धर्मग्रंथात किंवा ऋषी, गुरु, अवतार व ईश्वर, प्रेषित या कुणांमध्येही नाही; ते मनुष्याच्या सदसद्विवेकबुध्दीत वास करते. निसर्गातील सत्य व नैतिक सत्य ही दोन्ही प्राप्त करुन देणारी बुध्दी मनुष्यात स्वाभाविकपणे वसत असते. सृष्टिकर्त्यानेच मनुष्यजातीला दिलेली ती नैसर्गिक देणगी आहे. निर्मिकाने मानवाला एकदाच एकच एक ज्ञानाचा दिव्य ठेवा दिला आहे; तो म्हणजे बुद्घी होय’. क्रांतीबा फुले यांची सत्यशोधक समाजाविषयीची ही तात्त्विक बैठक पूर्णतः बुध्दीवादी आहे. त्यांना धर्मसंस्था मान्य नाही; मात्र ‘निर्मिका’ चे म्हणजे निसर्गाचे, सृष्टिनिर्मात्याचे अस्तित्व ते मान्य करतात.
सत्यशोधक समाजातील व्यक्तींनी पुढील काही तत्वे काटेकोरपणे पाळावीत, अशी भूमिका आहे…
(१) निर्मिक एक असून तो सर्वव्यापी, निर्गुण, निर्विकार व सत्यरुप आहे आणि सर्व माणसे त्याची लेकरे आहेत. या निर्मिकाशिवाय, निर्मात्याशिवाय मी इतर कशाचीही पूजा करणार नाही.
(२) निर्मिकाची भक्ती करण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येकाला आहे. त्यासाठी पुरोहित किंवा मध्यस्थाची आवश्यकता नाही.
(३) माणूस जातीने श्रेष्ठ ठरत नसून गुणांनी श्रेष्ठ ठरतो.
(४) निर्मिक सावयव रुपाने अवतरत नाही.
(५) पुनर्जन्म, परलोक, मोक्ष, कर्मकांड, जपतप या गोष्टी अज्ञानमूलक आहेत; त्यांचा अवलंब माझ्याकडून होणार नाही.
(६) जनावरांना मारण्यात मी सहभागी होणार नाही.
(७) दारुच्या व्यसनापासून अलिप्त राहण्याचा मी प्रयत्न करीन आणि…
(८) तसेच समाजाचा खर्च चालावा म्हणून मी माझ्या उत्पन्नातून काही वर्गणी देईन.
हे दुसरे तिसरे काही नसून ‘पंचशील’ आहे. त्यावेळी आतासारखे बौध्द साहित्य उपलध्द नव्हते तरी त्याकाळी क्रांतिबा फुले यांची सत्यशोधक चळवळ ही बुध्दांचीच धम्म विचार धारा आहे हे आपल्याला दिसून येइल. क्रांतिबा फुले बुध्दीवादी होते. त्यांचे गुरु भगवान बुध्द होते. त्यांनी आपल्या आयुष्यात भगवान बुध्दांपासून समतेचा विचार उचलल्याचे लिहून ठेवले आहे. याचाच अर्थ त्यांनी राबविलेला समतेचा विचार जिथून आला तो स्रोत म्हणजे भगवान बुध्द होते. अन म्हणूनच बाबासाहेबांनी आपल्या आदर्शानी जिथून समतेचा विचार उचलला त्या महामानवाच्या धम्माचा अभ्यास केला. बाबासाहेबांचं जीवन क्रम बघितल्यास आपल्याला हे स्पष्टपणे दिसेल की रामजी पिता कबीर पंथी होते. संत कबीर हे सुध्दा बुध्दीवादी होते. त्यांनी सर्व बुध्दांचे विचार वाराणसी, सारनाथ येथून प्रवचनाच्या माध्यमातुन ऐकले होते. जोतिबा फुले हे रामजी बाबांचे मित्र होते. रामजी सपकाळ आपल्या मुलांना आपले मित्र फुल्यांच्या समाज कार्याची माहिती देत. म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्यात बुध्दांपेक्षा आधी फुले व कबीर आले होते.
लेखं- श्रीराम पवार सर.