ज्या देशाला नीतिमत्ता नाही त्या देशाचे भवितव्य खडतर आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मुंबईच्या फेमस स्टुडिओमध्ये रविवार दिनांक 31 जानेवारी 1954 रोजी आचार्य अत्रे यांच्या *’महात्मा फुले’* या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त समारंभ मोठ्या थाटामाटाने साजरा करण्यात आला. समारंभाचे अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारले होते आणि कर्मवीर भाऊराव पाटील आशीर्वाद देण्यासाठी आचार्य अत्रे यांच्या निमंत्रणावरून उपस्थित झाले होते.
श्री. प्र. के. अत्रे उपस्थित पाहुण्यांचे आभार मानताना म्हणाले, “महात्मा फुले ह्यांचे क्रांतिकारक जीवन रूपेरी पडद्यावर आणण्याचे माझे अनेक वर्षांचे स्वप्न आज साकार होत आहे याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. पुणे शहराच्या ज्या विभागात फुले यांनी शंभर वर्षांपूर्वी काम केले त्याच क्षेत्रात माझी अनेक वर्षे गेली. त्यामुळे त्यांच्या कार्याचा आणि परंपरेचा माझ्या मनावर फार परिणाम झाला आहे. या चित्रपटाचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते होत आहे हा सर्वात मोठा सुयोग आहे. कारण महात्मा फुले ह्यांच्या तत्त्वज्ञानाचे सर्वात मोठे अनुयायी जर कोणी असतील तर ते डॉ. आंबेडकर हेच होत. राजकारणातील, धर्मकारणातील आणि समाजकारणातील डॉ. आंबेडकरांची भूमिका सर्वस्वी महात्मा फुले यांच्यासारखीच आहे. म्हणून महात्मा फुले यांच्याबद्दल त्या काळात जो गैरसमज झाला तोच डॉ. आंबेडकर यांच्या आजही वाट्याला येत आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील हे या चित्रपटाला आशीर्वाद द्यावयास येथे उपस्थित राहिले हाही दुसरा सुयोग आहे. कारण त्यांनी आपले सबंध आयुष्य महात्मा फुले यांच्या तत्त्वज्ञानाच्या प्रचारामध्ये खर्च केले.
इंग्रजी भाषेत फुले यांचे चरित्र लिहिण्याची डॉ. आंबेडकर यांची इच्छा आहे हे मला माहीत आहे. पण साधनांच्या अभावी ते तसेच पडून आहे. माझे काम झाल्यानंतर सर्व सामुग्री त्यांच्या हवाली करण्याची माझी इच्छा आहे. फुले यांच्या जीवनासंबंधी सर्वसामान्य समाजात अज्ञान पसरलेले आहे. या चित्रपटाद्वारे महात्मा फुले यांच्या जीवनाचे दर्शन घडविण्याचा मी प्रयत्न करीत आहे.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले, “हे काम हाती घेतल्याबद्दल मी श्री. अत्रे यांचे अभिनंदन करतो. कारण जोतीराव फुले हे आद्य समाजसुधारक होत. पूर्वी सामाजिक सुधारणा आधी की राजकीय सुधारणा आधी हा वाद चाले. आधी समाज सुधारणा झाल्या पाहिजेत असे रानडे, गोखले, आगरकर प्रतिपादन करीत; पण टिळकांचा भर राजकीय सुधारणांवर होता. टिळक आपल्या विरोधकांवर याबाबतीत विजय मिळवू शकले नाहीत. पण पुढे महात्मा गांधींनी मात्र समाजसुधारणावाद्यांवर विजय मिळविला. परंतु समाजसुधारणा होण्यापूर्वी देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळाले त्याचे परिणाम फारसे चांगले झालेले नाहीत. आज देशात चारित्र्यच उरलेले नाही. आणि ज्या देशाला नीतिमत्ता नाही त्या देशाचे भवितव्य अतिशय खडतर आहे. जवाहरलाल नेहरू, तुमचे मुख्यमंत्री असोत वा मोरारजी देसाई असोत, तुमच्या भविष्यात काळोखच भरला आहे. देशाचे मंत्री देशाचा उद्धार करीत नाहीत, तर धर्म ज्याला उत्तम रीतीने समजला आहे तोच देशाला तारू शकेल. महात्मा फुले अशा धर्मसुधारकांपैकी होते. त्या दृष्टीने ह्या थोर समाजसुधारकाच्या जीवनावर आधारलेला हा बोलपट उपयुक्त ठरेल.”
जनता: ६ फेब्रुवारी १९५४
**********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)
(18/2021)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?