साऊ पेटती मशाल | Sau Petati Mashal Song Lyrics

साऊ पेटती मशाल, साऊ आग ती जलाल
साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल

साद दिली पाखरांना, सारं रान धुंडाळून
फडफडले ते पंख, झेपावलं नवं गाणं
साऊ वाघीण अमुची, तिनं फोडली डरकाळी
थरथरल्या गं चाकोऱ्या, गढ ढासळले बाई     (१)

दूध ज्ञानाचे पाजिले, गर्भयातना सोसून
येल मांडवाला जाई, ज्ञानचांदणं पिऊन
हरणं चालली कळपात, कशी निर्भय तोऱ्यानं
स्वाभिमानाची गं ऊब, आत्मभान पांघरून     (२)

घुसमट काळजाची, माझ्या आजही पदरी
कधी ढिली कधी जाम, माझ्या येसणीची दोरी
जरी मोकळा गं श्वास, माझं मन जायबंदी
झळकते गं वरुन, अंधारलं आतमंदी
मुक्या मावलीची साद, साऊ घुंगराचा नाद
साऊ लावण्याचा साज, साऊ झाकलेली लाज    (३)

आता नको कोंडमारा, नको विषारी हा वारा
नको दासीपण आता, नको जुल्माचा पहारा
ज्योत लाविलीस साऊ, वणवा मी पेटवीन
तू जे शिल्प कोरलेस, ते मी बोलके करीन    (४)

ज्योती क्रांतीबा जणांचा, तशी क्रांतिज्योत साऊ
त्यांनी लावियले रोप, आम्ही नभाला भिडवू
साऊ क्रांतीची गं वेल, साऊ समतेची चाहूल
साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल   (५)

साऊ पेटती मशाल, साऊ आग ती जलाल
साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल



Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?