भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते

भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते, ह्यासंबंधी विद्यार्थ्यांनी सजग राहिले पाहिजे ~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

***********************************
एल्फिन्स्टन काॅलेज, १५ डिसेंबर १९५२
“उच्च विद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांची काॅलेजची चार वर्षे संपून जातात आणि विद्यापीठाच्या पदव्या घेऊन ते बाहेर पडतात. पण त्यांना प्लेटो, बेकन, नित्से, स्पिनोझा यासारख्या महाश्रेष्ठ तत्त्वज्ञान्यांच्या तत्त्वज्ञानासंबंधी अवाक्षरही माहिती नसते. ज्या तत्त्वज्ञानाने जगाची उभारणी केली, किंबहुना आजचा नव मानव आपल्या प्रत्येक दैनंदिन जीवनात ज्या तत्त्वज्ञानावर जगत आहे त्या थोर तत्त्वज्ञानाची उपेक्षा आजच्या पदवीधरांकडून व्हावी यापेक्षा अति लाजिरवाणी गोष्ट कोणती? याउलट आजची विद्यापीठे जेम्स आणि चार्ल्स यांचे तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांच्या माथी जबरीने लादत आहे. विद्यार्थ्यांनी या गोष्टी स्वतःच ओळखायला पाहिजेत आणि आपल्याला योग्य शिक्षण पाहिजे याची हाकाटी त्यांनी केली पाहिजे.”
“मानवी जीवनातील वैचारिक आणि नैतिक मुल्ये कधीच स्थिर राहिली नाहीत. ती कालमानाप्रमाणे प्रत्यही बदलत राहतात. नुसती बदलतातच नव्हे तर ती प्रगत होत जातात. भारतीय विद्यार्थ्यांनीही या नव्या नव्या निर्माण होणाऱ्या जीवनमुल्यांची दखल घेतली पाहिजे आणि आपणही ती आचरणात आणण्यास सिद्ध राहिले पाहिजे. हे नवे तत्त्वज्ञान आपल्या विद्यादायी संस्था आपल्या शिक्षणक्रमात घालतात की नाही याकडेही पाहिले पाहिजे.”
“पण खेदाची गोष्ट ही की, आधुनिक विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि वैचारिक पातळी रोडावत खाली चाललेली आहे. भूतकालातील मानवी प्रज्ञेशी तुलनाच होऊ शकत नाही. ही बौद्धिक पातळी का खाली घसरली याचा विद्यार्थ्यांनी विचार करणे आवश्यक आहे आणि या परागतीचे कारण अगदी स्पष्ट आहे. आजचा विद्यार्थीवर्ग भूतकालीन प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत यांच्या तत्त्वज्ञान व वाङ्मयकृतींचा अभ्यास मन लावून करीत नाही.”
~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
***********************************
जनता: २० डिसेंबर १९५२
***********************************