पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे देवालय होते हे मी सिद्ध करून देईन – डॉ बाबासाहेब आंबेडकर

दि. २५ डिसेंबर १९५४ रोजी देहू रोड येथील बुद्ध मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते भगवान बुद्धाच्या मूर्तीची विधीपूर्ण कृत्ये यानंतर प्रतिष्ठापना करण्यात आली.
ही मूर्ती सुमारे अडीच हजार रुपये किमतीची असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ती खास रंगूनहून आणली आहे . या समारंभाप्रसंगी सुमारे ४० हजारावर जनसमुदाय हजर होता…
अॅडव्होकेट शंकरराव खरात, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी, महाराष्ट्र प्रदेश शे. का. फे. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
आज या ठिकाणी या छोट्याशा मंदिरात भगवान बुद्धाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे एखादे मंदीर बांधण्यात आले तर त्यात भैरोबा , खंडोबा , मरीआई वगैरे नानाप्रकारच्या देवता ठेवल्या जातात. आपले लोक भाविक असल्यामुळे ते विष्णू , शिव अशा तऱ्हेच्या देवतांची स्थापना करतात. इथला प्रसंग नवीन आहे. इथल्या मंदिरात मरीआई खंडोबा, महादेव आणलेला नाही. येथे आज हा नवा देव आणून स्थापला आहे. हा प्रसंग सर्वांच्या दृष्टीने आमच्यामध्ये नवीन आहे. आपल्यापैकी काही जणांनी भगवान बुद्धाचे नाव देखील ऐकले नसेल, काही लोक म्हणतात की, हा नवीन देव कोठून आणला आहे ? हा देव कोठुन आला त्याची उत्पत्ती कशी झाली याची चिकित्सा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भगवंताचा हा धर्म या देशामध्ये अत्यंत जुना आणि प्राचीन आहे . हा धर्म प्राचीनकाळी या देशात उगम पावला आहे. चीन, जपान, सयाम, या बाहेरील देशातून हा धर्म येथे आणलेला नाही . हा वृक्ष येथेच उगवला आहे. या देवाला येथे कोणी आणले यादद्दल अनेक प्रश्न विचारले जातात. या देवाला येथे कोणी आणले याबद्दलचा पहिला खुलासा असा करता येईल की, या देशातील पुरातन देवता आपल्याला ठिकठिकाणी सापडतात. तो इथलाच आहे…
इतिहासाच्या काळामध्ये जी अनेक कारणे घडली त्यामुळे या धर्माचा लोप झाली. या धर्माचे शत्रू या देशात राहूच शकत नाहीत, आपण मराठीत शत्रुला बोलताना म्हणतो की, ‘ माझा देव जागती ज्योत आहे’. माझा देव काही कच्चा नाही. तुझ्यावर सोडीन तर तुझा सत्यानाश करील’. त्याच प्रमाणे या धर्माचे आहे. आज मी असे भाकीत करतो. हे पाहायला मी कदाचित जगणार नाही. मात्र ही गोष्ट होईल यात तिळमात्र शंका नाही. एक मनुष्य काही माणसांना काही काळ फसवू शकतो. एक मनुष्य सर्व लोकांना सर्व काळ फसवू शकत नाही.
बुद्ध धर्माला १९५६ साली अडीच हजार वर्ष पुरी होतील. हा धर्म साडेबारा वर्ष जिवंत असा होता, हे सिद्ध करण्यासाठी आज मी इतिहासातील पुरावा देणार आहे. पूर्वी या देशावर मुसलमानांच्या स्वाऱ्या झाल्या. मुसलमान मूर्तिपूजक नसतात. त्यांनी बुद्ध धर्माच्या लोकांवर हल्ला चढविल्यामुळे हा धर्म खालावला. अफगाणातील शंभर टक्के लोक बुद्ध धर्माचे होते. तेथे बद्ध धर्म होता. येथे बुद्ध धर्मात सात हजार भिक्षु होते . या मुसलमानांनी त्यांच्यादर स्वाऱ्या केल्या त्यावेळी त्या मुसलमानांपुढे दोनच प्रश्न होते. या देशातील लोकांनी मुसलमान धर्माचा स्वीकार करावा, हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न म्हणजे जो हा धर्म स्वीकारणार नाही त्यांची कत्तल करणे. त्यांनी या सात हजार भिक्षुची कत्तल केली…
हा धर्म जिवंत होता तेव्हा तो फार प्रभावी होता. या देशात नालंदा विश्वविद्यालय होते. ज्ञानप्राप्ती करून देणे हे या धर्माचे तत्त्व होते. एक आचार्य व त्यांचे १० पोरे एकत्र बसत आणि ब्राह्मण शास्त्र शिकवित. अशी या धर्माची स्थिती नव्हती. पहिले विश्वविद्यालय बौद्ध धर्मीय लोकांनी स्थापन केले. नालंदा विश्वविद्यालयात तेरा हजार विद्यार्थी व एक हजार अध्यापक होते. ब्राह्मण धर्म हा एकांगी होता. अन्य कारणांमुळे मुसलमानांच्या तडाख्यातून त्याचा बचाव झाला, बौद्ध धर्माविरूद्ध ब्राह्मणांची कारस्थाने चालू होती. यामुळे तो खाली पडला…
बुद्ध धर्मावर मी इंग्रजीतून पुस्तक लिहीत आहे. हे पुस्तक दोन महिन्यांनी प्रकाशित होईल. या पुस्तकाचे मराठीत भाषांतर करून ते छापण्यात येईल.
तुमचा बौद्ध धर्म एवढा चांगला होता तर त्याचा ऱ्हास का झाला? असे माझे मित्र मला प्रश्न विचारतात. तेव्हा मी त्यांना असे विचारतो की हा धर्म वाईट आहे म्हणून या धर्माचा ऱ्हास झाला असे म्हणावे तर चीन, जपान, कंबोडीया, सिलोन या देशांमध्ये या धर्माचा ऱ्हास का झाला नाही ? तेथे अजून तो का आहे ? या देशात हा धर्म नाहिसा झाला नाही तर त्याला निराळी वाळवी लागली असेल, कारस्थाने झाली असतील. सांगायचा मतलब असा की, त्याच्या निर्मितीपासून तो साडेबाराशे वर्षापर्यंत यच्चयावत चालला होता. हा इतिहास इतिहासकारांनी लपवून ठेवला आहे. यावेळी मी सबंध भारताविषयी बोलणार नाही. फक्त महाराष्ट्रासंबंधी सांगणार आहे. आपला महाराष्ट्र देशसुद्धा शंभर टक्के बौद्ध धर्मीय होता आणि त्याला पुरावा म्हणून महाराष्ट्रातील पुरातनकाळच्या कोरीव लेण्यांची उदाहरणे देता येतील. भारतातील दोन हजार लेण्यांपैकी दीड हजार लेण्या महाराष्ट्रात आहेत. ही लेणी म्हणजे बौद्ध भिक्षुची राहाण्याची ठिकाणे होती. हेच त्यांचे निवाऱ्याचे स्थान होते. महाराष्ट्रात जी काही लेणी आहेत ती पांडवांची आहेत, असे सांगण्यात येते. परंतु विराटनगरी कोठे व पांडवाचे राज्य कोठे ?
या विहारामध्ये २५ हजार भिक्षु राहात असतात. पंधरा हजार विहारातून सुमारे पस्तीस हजार भिक्खू राहात असत. जनतेकडून भिक्षा मागून ते आपली उपजीविका करीत. भिक्षा मागून त्यांचे कार्य चालत असे. एक हजार दोनशे पन्नास वर्षे ते या प्रातामध्ये होते. आपण मोडके घर पुन्हा बांधतो. त्याला नवीन पत्रा टाकतो. छप्पर नवीन बसवितो. म्हणजेच त्या घराचा जीर्णोद्धारकरतो. आपल्या वाडवडिलांपासून भगवंताची पूजा आपण करीत आलो आहो. तोच देव आपल्याला पुन्हा बसवावयाचा आहे. या देशात धर्म म्हणून काही राहिलेला नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. हिंदू लोकांची धर्माची व्याख्या फार निराळी आहे. देवळात जाणे, घंटा वाजविणे , पूजा करणे आणि भटाला दोन पैसे देणे एवढेच या धर्माचे कार्य ! जणू काही भटाच्या बापाचे ऋण फेडणे होय . परंतु आम्हाला काही हे जमले नाही. विष्णूची पूजा करून विष्णु पावला नाही, शिवाच्या देवळात जाऊन शिव पावला नाही आणि मरीआई म्हसोबा, खंडोबा तर पावलाच नाही. व्यक्तिच्या व समाजाच्या जीवनाला आवश्यक म्हणून धर्म हवा आहे. धर्माला नीतीचे बंधन हवे आहे. काही लोक मला विचारतात की, धर्म काय करावयाचा आहे, परंतु माझा त्यांना सवाल आहे की , आम्ही डल्ली खावंयाची सोडली आहे. केवळ पोटच भरावयाचे तर मग तुम्हीही डल्ली, सागोती का खात नाही ? धर्म हा दुराचरणावर नियंत्रण ठेवतो. आम्हाला सांगण्यासारखे पुष्कळ आहे तमच्या भाषेत मला काय सांगता येईल ? येथे उदाहरणादाखल मी एकच गोष्ट सांगतो बैलगाडीला दोन चाके, दोन बैल, गाड़ा तोच मनुष्य वगैरे सर्व असते. मी लहानपणी बैल हाकायचे काम केले आहे. गाडीला वंगण असते. चाकाला खीळ असेल तर बैल गाडा ओढतील, त्याचप्रमाणे मनुष्याच्या पापी, दुराचारी वर्तनाला बंधन म्हणजेच धर्म ! धर्माचे बंधन असल्याशिवाय कार्य टिकू शकत नाही.
कोणताही धर्म घेताना चोखाळून घेतला पाहिजे. आपण बाजारात जातो, सोने बावनकशी आहे किंवा नाही याची खात्री करून घेतो. त्याचप्रमाणे धर्म म्हणजे बाजारपेठ आहे. ते विष्णुचे, ते शिवाचे, रामाचे दुकान आहे, ते पुजारी धूप, कापूर जाळत बसले आहेत. कृष्ण, राम, शिव, विष्णू यांचा धर्म हवा असा धर्म आहे. धर्म मनुष्याचा उद्धार करतो. धर्म घात करण्याकरिता नसतो. आमची अवनती झाली असेल तर ती जातीभेदामुळे ! जातीभेदाने बरबटलेला आहे. ज्या धर्मात असमानता आहे तो धर्म आम्ही कसा घेऊ ? ज्या धर्मात समानता अधिष्ठित झाली आहे असा धर्म पाहिजे. बौद्ध धर्मात सर्वांना समान संधी व सर्वांना समान अधिकार दिलेला आहे. त्यात ऐक्यता आहे. भेदभाव नाही.
ह्या प्रसंगी आपणाला एका सुक्ताची आठवण करून द्यावीशी वाटते. ब्राह्मणाची पोरे होती, त्यांच्यामध्ये तत्त्वज्ञानाविषयी वाद चालू होता. ‘ ब्रह्म हे घर आहे व आत्मा ब्रह्माची छाया आहे. सूर्य आणि सूर्याचे प्रतिबिंब, घर आणि त्याची छाया याप्रमाणे ब्रह्म आणि आत्मा याचे आहे . ही सगळी पुराणातील वांगी आहेत. ही सगळी पुराणातील वांगी आहेत. ब्राह्मची जर छायाच आत्मा आहे तर अस्पृश्यांना शनिवार वाड्यातील हौदात पाणी का भरू देत नाही ? हा वाद मिटत नाही असे पाहून ती पोरे बुद्धाजवळ गेली. त्यांना ब्राह्मणांचे तत्त्वज्ञान पटलेले नव्हते. भगवंतानी त्यांना विचारले : हे ब्रह्म सत्य आहे काय ? तुम्ही ब्रह्म पाहिले आहे काय ? ते काही काळासाठी आहे की नित्य आहे ! त्याचं रंगरूप कसं काय आहे ? ते काहीं बोलते काय ? त्याला चव आहे का सुगंध आहे ? ते गुलाबाच्या फुलासारखे आहे की चाफ्याच्या ? ते गोड आहे, तिखट आहे की आंबट आहे ?
मनुष्यमात्राला सत्य कळण्याकरिता पाच इंद्रिये होत. डोळ्याने पाहाता येते , कानाने ऐकायला येते नाकाने सुगंधित आहे की दुर्गधित आहे असा वास कळतो. जिभने, खारट, तिखट, आंबट चव कळते.पाच इंद्रियांची साक्ष ज्याला मिळते तेच सत्य, ब्रह्म सत्य मानणे म्हणजे न पाहिलेल्या मुलीवर प्रेम करण्यासारखे आहे. बुद्ध भगवानाचा धर्म हा समानतेचा धर्म आहे. नुकताच माझ्याविषयी की लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी एक लेख लिहिला असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. माझ्याविषयी सहसा कोणी लिहीत नाही आणि लिहिलेच तर ते चांगले असेलच हे सांगता यायचं नाही. श्री. जोशी यांनी आपल्या लेखाच्या शेवटी डॉ .आंबेडकरांचे अवतारकार्य आता संपले असे लिहिले आहे. पण माझे अवतारकार्य संपले नसून त्याला सुरवात होणार आहे. लक्ष्मण शास्त्रीसारखा विद्वान मनुष्य असं लिहितो याला काय म्हणावे ? आम्ही महाडचा सत्याग्रह केला. तुम्ही हिन्दू लोक आम्हाला हिन्दू म्हणता ना ! मग हे लोक आपल्याला पाणी प्यायला देतात किंवा नाही हेच पाहाण्यासाठी हा सत्याग्रह केला होता. आपल्याला देवळात जाऊ देतात की नाही हे बघण्यासाठी मंदीर प्रवेशाची चळवळ केली . इतके दिवस नांगरट झाली, जमीन आता पेरायला उपयोगी झाली आहे. माझे आयुष्य आता थोडे राहिले आहे. दुर्दैवाने जी सामाजिक कार्ये माझ्या हाती होती ती माझ्याकडून पूर्ण झाली नाहीत. मी आता इतर सर्व कार्यातून निवृत्त होणार आहे. मला बौद्ध धर्माच्या प्रसाराचे कार्य करावयाचे आहे. आजचा हा आपला प्रसंग पाहून काही लोक आपला उपहास करतील. परंतु चांगले कार्य हे अवघड असते. महार जात धैर्यवान आहे . तिच्या डोक्यावर इतर जमाती आहेत. लंगोटी, कांबळी, काठी हाच त्याचा पोषाख. जैन साधु नग्न हिंडतात. त्याचप्रमाणे आम्ही नग्न हिंडू .
मला आपणाला दोन गोष्टी सांगावयाच्या आहेत. तुम्ही या धर्माचा स्वीकार कराल त्या दिवशी बऱ्याच गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत, एकादशीला पंढरपूरला जाणे , द्वादशीला इतर क्षेत्राला जाणे बंद करायला हवे. मला चांगली आठवण आहे. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबक येथे कुंड होते . या कुंडात फक्त पसाभर पाणी होते. यात्रेकरू लोक त्यात फडके भिजवून घेऊन अंगाला घोळील. अशा तऱ्हेची खिचड़ी मी बौद्ध धर्मात होऊ देणार नाही. स्वच्छ पाण्यात घाणेरडे पाणी ओतता कामा नये. भगवान बुद्धाचा धर्म तोच आमचा धर्म, असा आता आम्ही निश्चय केला आहे. तुम्ही पंढरपूरला जाता, पांडुरंगाचे अभंग म्हणता. पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळातील लोकांची पंढरीचा विठ्ठल कोण होता यावर हुज्जत चालू आहे. पण माझा त्यांना खडा सवाल आहे की विठ्ठलाची भानगड सोडून देऊन पंढरीचा पांडूरंग कोण ? याचे पहिल्यांदा उत्तर द्या? तो होता कुठे ? त्याला पळविलं कोणी ? कोणी डुबविलं ? पांड म्हणजे पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे देवालय होते हे मी त्यांना सिद्ध करून देईन . ( प्रचंड टाळ्या ) पुंडलीक या शब्दापासून पांडूरंग हा शब्द झाला. पुंडलीक याचा अर्थ कमळ, बौद्ध धर्मात मूर्तीपूजा नव्हती. अज्ञानी लोकांना तत्त्वज्ञान काय कळे ! कमळाला पाली भाषेत पांडूरंग असे म्हणतात. तुम्हाला भुलविण्यासाठी ब्राह्मणांनी बुद्धाच्या नावाचा लोप केला. मतलबी लोक महाराष्ट्रातील लेणी ही पांडव लेणी असल्याचे सांगतात. इकडे ‘ पांडव ‘ कशाला आले होते ? पांडव दिल्लीच्या बाहेर ८० मैलाच्या पलिकडे गेले नाहीत. त्यांनी अलवार स्टेटमध्ये पंधराशे लेणी खोदली कशी ? त्यांच्याजवळ टिकास नव्हती की पावडं नव्हतं . भगवान बुद्धाने सांगितले की ‘ ये आणि पाहा ! मी सांगतो म्हणून तुम्ही हा धर्म घ्यावा असे नाही . तुझी अविद्या नाहिशी झाली तरच तू या धर्माचा स्वीकार कर. आपणाला एक गोष्ट सांगायची बाकी राहिली आहे. हे जे देऊळ बांधण्यात आले आहे हे अत्यंत लहान आहे. ते जर आपण आहे ह्याच स्थितीत ठेवाल तर आपल्याला काळिमा लागेल. या देवळाला एक हॉल पाहिजे . प्रदक्षिणा करण्यासाठी जागा हवी आहे . तुम्ही सर्वांनी वर्गणी गोळा करून या मंदिराला भव्य स्वरूप देण्याचा प्रयत्न करावा. मात्र भगवंताच्या नावावर जमा केलेला पैसा खाऊ नका.
आजच्या प्रसंगाला अनुसरून जे काही सांगावयाचे होते ते मी सांगून टाकले. आजचा हा प्रसंग इतिहासामध्ये नोंदला जाईल. बाराशे वर्षानंतर भगवान बुद्धाच्या मूर्तीची स्थापना करण्याचा पहिला मान आपल्याला मिळाला आहे. याचे सारे श्रेय आपल्यालाच आहे. म्हणून आपण धन्यता मानली पाहिजे.
संदर्भ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
खंड १८ भाग ३
Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?