🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_धम्म-संस्कारांची आस !_*
*_विमलकित्ती गुणसिरी_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_*‘अविज्जा पच्चया संखारा’ म्हणजे अविद्येतून संस्कार घडतात. ‘संखारा पच्चया विञ्ञाण‘ म्हणजे त्या संस्कारातून विज्ञान घडते आणि ‘विञ्ञाण पच्चया नाम-रूप’ म्हणजे पुढे त्या विज्ञानातून शरीर आणि मन घडते. तथागत भगवान बुद्धांनी जाणलेली मनुष्य जीवनाची पूर्वपिठीका अशा प्रकारची आहे.*
_*विञ्ञाण म्हणजे चेतना शक्ती. त्याला आधुनिक विज्ञानाच्या इंग्लिश भाषेत ‘कॉन्शसनिस’ ‘Consciousness’ असे म्हणतात. ही चेतनाशक्ती पुन्हा पुन्हा निर्माण होणे आणि क्षय पावणे या प्रक्रियेत अडकलेली असते. त्यामुळे प्राण्यांचा जन्म आणि मृत्यू होत राहतो. ही चेतनाशक्ती परिवर्तनशील असल्याने तिला तथागत भगवान बुद्धांनी नित्य स्वरूपाचा व कधीही न बदलणारा असा आत्मा मानले नाही.*_
_*अविद्येच्या संस्कारातून या चेतनाशक्तीची जी काही प्रवृत्ती बनलेली असते, त्यानुसार ती चेतनाशक्ती माणसाच्या जीवनकाळात त्याचा स्वभाव बनते आणि त्या स्वभावनुसार प्रत्येक प्राणी वागत असतो. त्यामुळे मनुष्यप्राण्यात एक सारख्या स्वभावाची माणसे असत नाहीत. अविद्येच्या कमी-अधिक प्रभावामुळे त्यांचे स्वभाव विभिन्न बनलेले असतात. परंतु त्यांच्या एकंदरीत जीवनातील काही संस्कारात खूप साम्य असते. ते प्रामुख्याने चित्तमलाच्या स्वरूपात असते. त्यालाच लोभ, द्वेष आणि अज्ञान असे म्हटले जाते. या मूळ संस्कारामुळे मनुष्य आपल्या जीवनात आसक्ती ठेऊन अहंकारी, स्वार्थी, द्वेषी, मत्सरी आणि मूढ बनतो. त्यामुळे तो कायम दुःखात जगत राहतो आणि त्याला सर्वात मोठे दुःख मरणाचे वाटते. म्हणून माणूस मरणास सर्वात जास्त भीत असतो. मरणामुळे आपले सर्व काही गमावले जाते, ते त्याला नकोसे वाटते. परंतु मरण तर चुकत नाही.* म्हणून अनेक धर्मानी आत्मा अमर असल्याची कल्पना करून माणसाला काही दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्याला मेल्यानंतर स्वर्गसुख मिळेल अशी आशा दाखवून त्याला निरर्थक कर्मकांडात आणि पूजा-प्रार्थनेत अडकवून त्याचे भौतिक शोषण सुरू केले. *तथागत भगवान बुद्धांनी मात्र माणसाला मूळ सत्त्य त्यांनी जसे पाहिले – जाणले तसेच पाहाण्यास शिकविले. आपल्या चित्तशक्तीत भिनलेल्या त्या लोभ, द्वेष आणि अज्ञानाच्या विषाला दूर करून जन्म-मृत्याच्या फेऱ्यातून मुक्त होऊन ईहलोकीच सुखी होण्याचा मार्ग दाखविला. त्यांचे ते मार्गदर्शन स्वानुभूतीतून साकारलेले प्रत्यक्ष सत्त्य होते.* म्हणून त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, *“यं मया सामं दिट्ठं तमहं वदामि।”* म्हणजे जे मी प्रत्यक्ष पाहिले, अनुभविले तेच मी आपणास सांगतो आहे. आणि त्या सत्त्याला जाणण्याचा मार्ग म्हणजे आपापल्या चित्ताची परिशुद्धी होय आणि ती प्रत्येकाला स्वतःच करायची असते. तोच त्यांचा धम्म होय. म्हणून प्रत्येकाला धम्माचे प्रत्यक्ष आचरण करूनच त्याचा लाभ घेता येतो. *धम्म केवळ मानण्याची किंवा विश्वास ठेवण्याची गोष्ट नाही. धम्माला मानले की आपले काम झाले असे नाही. तर धम्माप्रमाणे वागून पाहिले तरच अपले काम झाले असा त्याचा अर्थ आहे.*_
_यावरून आपल्या लक्षात येईल की, *धम्मामध्ये संस्कारांचे किती महत्त्व आहे. संस्कार म्हणजे चित्त-प्रवृत्ती होय. जो विचार मनात भिनल्यामुळे त्या विचाराप्रमाणेच वागण्याची मनाला प्रेरणा मिळते आणि त्याप्रमाणे वारंवार वागून माणसाला तशीच सवय लागते. अशा प्रकारे संस्कार घट्ट होत असतात. तेव्हा त्याला सवय म्हटले जाते. सवय ही भावनात्मक प्रवृत्ती बनते आणि पुढे कोणताही विचार न करता किंवा त्या सवयीच्या बऱ्यावाईट परिणामांची मुळीच पर्वा न करता माणूस सवयीचा गुलाम बनतो. त्याची ही मानसिक गुलामगिरी म्हणजे पराकोटीचे अज्ञान होय. या अज्ञानाची त्याला काहीच जाणीव नसल्यामुळे तो बहुदा बुद्धीवादी असला तरी अज्ञानीच राहतो. अशा वेळी आपण कळते पण वळत नाही असे म्हणतो.* सवय ही एक प्रकारे नशेची किंवा मोहाची अवस्था असते. म्हणून *अज्ञानाला पाली भाषेत ‘मोह’ किंवा संमोह असे म्हणतात.* या मोहरूपी मूलभूत *अज्ञानामुळे माणूस लोभाचा आणि द्वेषाचा शिकार बनतो आणि आयुष्यभर त्याप्रमाणे वागत राहून दुःखच दुःख निर्माण करीत असतो. त्यातून त्याची मुक्ती कोणत्याही बाह्य शक्तीच्या पूजा-अर्चनेने किंवा कर्मकांडाने किंवा व्रतवैकल्याने होऊ शकत नाही. कारण की प्रत्येकाचे मन फक्त त्यालाच जाणता येते आणि त्यातील दोष त्यालाच दूर करता येतात.* हे सत्त्य तथागत भगवान बुद्धांनी स्वप्रयत्नांनी जाणले आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष करून सर्व दुःखमुक्त झाले. म्हणून त्यांनी निक्षून सांगितले आहे की,_
*’मनोपुब्बङ्गमा धम्मा मनोसेट्ठा मनोमया।*
*मनसा चे पदुट्ठेन भासति वा करोति वा।।’*
_*म्हणजे प्रवृत्ती मनातूनच उदय पावतात, मनातही त्या श्रेष्ठ असून मनोमयच असतात त्यातून प्रगट झाल्याने माणसाला त्याप्रमाणेच भासते आणि करावेसे वाटते.* पुढे म्हटले आहे की, *’ततो’नं दुक्खमन्वेति, चक्कं’व वहतो पदं।’* म्हणजे माणसाने जर दुःखजनक वृत्तीने वर्तन केले तर ज्याप्रमाणे बैलगाडीच्या बैलाच्या मागून चाक जाते त्याप्रमाणे माणसाच्या वागण्यातून दुःख निर्माण होते. तसेच *’ततो’नं सुखमन्वेति छाया’व अनपायिनी।।’* म्हणजे माणसाने जर सुखजनक वर्तन केले तर कधीही साथ न सोडणाऱ्या सावलीप्रमाणे सुख त्याचे मागून येते._
_हे स्पष्ट करताना *डॉ. आंबेडकरांना आपल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथात लिहिले आहे की, ‘लोभाने लुब्ध, रागाने क्षुब्ध आणि मोहाने (अज्ञानाने) मूढ झाल्यामुळे माणसे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळवू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पिडा अनुभवाव्या लागतात. (३.३.३/२९)* पुढे ते म्हणतात की, *‘भगवान बुद्धांच्या मते.. सत्प्रवृत्ती हीच चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे. म्हणूनच भगवान बुद्धांनी चित्ताच्या साधनेला म्हणजेच माणसाच्या वृत्तीला सुसंस्काराने वळण लावण्याला अगदी पहिले स्थान दिले आहे. (३.३.३/३१-२) त्यांनी पुढे मनाच्या सामर्थ्याचे वर्णन करताना म्हटले आहे की, ‘माणसात इच्छाशक्ती नावाची एक शक्ती असते. जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हा या इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते. …आपणास पाहिजे त्या दिशेने जाण्यासाठी आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो. मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहात बंदीवान करीत असते आणि तेच आपणाला तेथे डांबून ठेवते. पण मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करू शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळविल्यास त्याला बंधमुक्तही करू शकते. (२.२.४) यावरून धम्म-संस्कारांनी मनाला वळण लावण्याचे महत्त्व आपल्या लक्षात येईल.*_
_*तथागत भगवान बुद्धांनी धम्म-संस्कार दोन प्रकारचे मानलेले आहेत. एक दुःखजनक संस्कार ज्याला त्यांना अकुशल म्हटले आहे आणि दुसरे सुखजनक संस्कार ज्यांना त्यांनी कुशल म्हटले आहे. अकुशल म्हणजे लोभ, द्वेष आणि मोहयुक्त मनोप्रवृत्ती घडविणारे संस्कार होत आणि कुशल म्हणजे त्यापासून मुक्त दान, मैत्री आणि प्रज्ञायुक्त मनोप्रवृत्ती घडविणारे संस्कार होत. दुःखयुक्त संस्कारांना त्यांनी पापमय म्हटले आहे, तर सुखयुक्त संस्कारांना पुण्यमय म्हटले आहे. म्हणजेच अकुशल म्हणजे पाप आणि कुशल म्हणजे पुण्य होय. हीच खरी पाप-पुण्याची व्याख्या होय आणि मानवी जगाच्या इतिहासात ती तथागत भगवान बुद्धांशिवाय इतर कोणी केलेली नाही, हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे.*_
_म्हणूनच *बुद्धांचा धम्म अवघ्या तीन वाक्यात सांगितला जातोः ”सब्बपापस्स अकरणं, कुसलस्स उपसम्पदा । सचित्तपरियोदपनं, एतं बुद्धान सासनं।” (धम्मपद, १८३) म्हणजे, कोणत्याही प्रकारचे पाप न करणे, पुण्यकारक कर्माचा अंगिकार करणे, त्यासाठी आपल्या चित्ताची (लोभ, द्वेष आणि अज्ञानापासून) शुद्धी करणे, हेच बुद्धांचे अनुशासन (धम्म शिकवण) होय.* अशा प्रकारे धम्म-जीवनमार्ग म्हणजे आपल्या मनाला प्रयत्नपूर्वक सतत सुसंस्कारीत करण्याचे आचरण होय. यासाठी धम्म-संस्कारांची गरज आहे. हे धम्म-संस्कार मिळविण्यासाठी आणि त्यांचे पालन करून पाहाण्यासाठी म्हणून बुद्धविहारांची आणि तेथे प्रयत्नपूर्वक आचरण करून दाखविण्यात दक्ष असणाऱ्या संघाची गरज आहे. तथागत भगवान बुद्धांनी आचरणशील लोकांच्या परस्परोपयोगी सामूहिक अस्तित्वाला संघ म्हटले आहे. त्यांच्या दृष्टीने असा संघ म्हणजे प्रत्यक्ष धम्म-जीवनप्रवाहात पूर्णपणे वाहत राहणाऱ्या आणि त्यातून कधीच मागे न फिरणाऱ्या अनुयायांचा संघ होय असे अनुयायी भिक्खु, भिक्खूनी, उपासक आणि उपासिका अशा चार प्रकारचे असतात. *केवळ भिक्खू-भिक्खूनींचा संघ म्हणजे खरा संघ नव्हे, तर भिक्खू-भिक्खूनी आणि उपासक-उपासिका अशा दोन्ही प्रकारच्या अनुयायांचा मिळून होतो तो संघ असतो. त्याला त्यांनी श्रावक-संघ (पालीमध्ये सावकसंघो) असे म्हटलेले आहे.*_
_*श्रावक म्हणजे कमीत कमी श्रोतापन्न (पाली: सोतापन्न) या अवस्थेला पोहोचलेला म्हणजेच ज्याच्या कुशल प्रवृत्ती पक्क्या झाल्या आहेत असा मनुष्य होय. ज्यांच्या कुशल प्रवृत्ती पक्क्या होतात तेच पुढील प्रगती करू शकतात. त्यांना सकदागामी, अनागामी आणि शेवटी अर्हत म्हणजे दुःखमुक्त असे म्हणतात. जरी श्रोतापन्न नसले तरी भिक्खू- भिक्खूनींना विशेष महत्त्व यासाठी दिले जाते की, एक तर ते आपल्या अस्तित्त्वासाठी पूर्णपणे गृहस्थांवर अवलंबून असतात आणि दुसरे म्हणजे सांसारीक जीवनाचा त्याग करून पूर्ण वेळ केवळ धम्माचे अध्ययन, आचरण आणि त्याचा इतरांना उपदेश करण्याचेच कामात मग्न राहतात म्हणून होय.* पूर्ण वेळ धम्मरत राहिल्यामुळे धम्म- संस्कार अनुभविण्याची आणि ते इतरांना देण्याची त्यांची क्षमता अधिक असू शकते. *परंतु जर भिक्खू-भिक्खूनी धम्मरत नसतील तर ते गृहस्थांच्या धम्मश्रद्धेला अस्थीर करून धम्माला धोकादायक होऊ शकतात. म्हणून आचरणहीन भिक्खू-भिक्खूनींपासून दूर राहण्याचा आणि त्यांचे पोषण न करण्याचा भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे.* धम्म-संस्कार जोपासून धम्म-श्रद्धा पक्की करण्यास योगदान देणे हेच भिक्खू-भिक्खूनीचे परम कर्तव्य आहे. त्यासाठी बुद्धविहारे आणि दानाचा आधार देणे हे गृहस्थ अनुयायांचे कर्तव्य आहे. अशा प्रकारे धम्म-जीवनमार्गाचा गाभा म्हणजे धम्म-संस्कार होत आणि ते रूजविण्याची यंत्रणा म्हणजे भिक्खू-भिक्खूनी संघाचे नेतृत्त्व आणि गुहस्थांचे दातृत्त्व यातून साकारलेले संघ जीवन होय. म्हणून संघ जीवन हे प्राथमिक महत्वाचे असून त्यामुळेच धम्म-जीवन साकार होऊन बुद्ध जीवनाकडे वाटचाल शक्य होत असते._
*‘संघ सरणं गच्छामि’ ला भगवान बुद्धांनी प्रत्यक्ष आपणाएवढे आणि धम्माएवढे महत्त्व को दिले याचे मर्म यावरून लक्षात येईल.* असे हे संघ-जीवन रचण्याचे मूलभूत कार्य *डॉ. आंबेडकरांनी धम्मदीक्षेच्या अगोदरच हाती घेतले होते. त्यासाठी त्यांना बेंगलोरला एक बुद्धिस्ट रिलिजिअस सेमिनरी स्थापन करून तिचे संचालन ब्रह्मदेशच्या भिक्खू संघाकडे सोपायचे होते. परंतु तसे काही घडले नाही.* प्रत्यक्ष डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांनीसुद्धा हे कार्य हाती घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. परिणामी भारतातील धम्मक्रांतीची प्रचंड पिछेहाट होत गेली. ती अजूनही चालू आहे. बौद्ध समाजच मुळी धम्म-संस्कारांपासून वंचित राहिला आहे. ते रूजविण्याची यंत्राणा वर नमूद केल्याप्रमाणे आहे, परंतु ती कोठेही कार्यरत नाही. *बुद्ध विहारे खूप आहेत, परंतु त्यात भिक्खू-भिक्खूनींना जागा नाही. भिक्खू-भिक्खूनीसुद्धा योग्य प्रकारे प्रशिक्षित नाहीत, म्हणून संघटीत आणि कार्यक्षम नाहीत, हेही खरेच आहे.*_
_*अनेक विहारे अज्ञानी आणि आचरणहीन गृहस्थांच्या मालकीची आणि त्यांनी आपापल्या मर्जीनुसार चालविलेली आहेत. तेथे प्रशिक्षित, आचरणशील भिक्खू- भिक्खूनींना धारा नाही आणि कोठे असलाच तर त्यांच्यापासून शिकायला कोणाला वेळ नाही. चुकून-माकून कार्यक्रमाच्या निमित्ताने काही शिकविले गेले तर ते श्रद्धेने आचरणात आणायला कोणाला सवड नाही. म्हणून धम्मकार्य केवळ प्रसंगापुरते शोभेचे कार्य झालेले आहे. त्यात मग माणसे जमविण्यासाठी गायनपार्ट्या आणि ऑकेस्ट्राच्या करमणूकीच्या कार्यक्रमाची फॅशन रूढ झालेली आहे. नाव धम्मकार्याचे आणि गाव करमणूकीच्या चंगळवादाचे, असा प्रकार सर्वत्र घडत आहे.* धम्मश्रद्धेच्या अभावाचे आणि धम्म- संस्कार शून्यतेचे हे ठळक लक्षण आहे. *बौद्ध सणावाराच्या दिवशीसुद्धा आपला वेळ धम्म शिकण्या- समजण्यासाठी आणि थोडेफार का होईना, परंतु आचरण करून पाहाण्यासाठी उपयोगात आणावा आणि आपली बुद्ध, धम्म आणि संघाप्रती श्रद्धा व्यक्त करावी असे कोणाला वाटत नाही, हेच मोठे आश्चर्य आहे.* म्हणून आज गरज आहे ती धम्म-संस्कारांचे पुनरूज्जीवन करून त्यांची रूजवात करण्याची. त्यासाठी *प्रशिक्षित भिक्खू-भिक्खूनी आणि उपासक-उपासिकांची निर्मिती करणे हे प्रथम कर्तव्य आहे.* अशा प्रशिक्षित प्रचारकांनी सर्वसामान्य लोकांत वावरून त्यांना धम्मदीक्षेसह नामांतर आणि कर्मांतर शिकविणे गरजेचे आहे. बौद्ध जीवनमार्गाला, सणावारांना आणि उत्सवांना मूळ संस्कृतीच्या कोंदणात गुंफणे आवश्यक आहे. ते सर्व आज भरकटत चाललेले आहेत. संघजीवन, संघदान आणि संघसेवेचा आदर्श प्रस्थापित करणे आवश्यक आहे. त्यातून बौद्ध समाजाचे सुसंघटन होणे शक्य आहे. सुसंघटनाशिवाय सामाजिक आणि आर्थिक प्रगती शक्य नाही. तसेच अन्याय – अत्याचारापासून सुटकाही नाही. *आज मितीला केवळ बौद्ध समाजातच नव्हे, तर अवघ्या दलित वर्गातील सत्तर टक्के विद्यार्थी मॅट्रिकपूर्वीच शाळेतून गळताहेत. तसेच सत्तर टक्के लोग गरीबीचे जीवन जगताहेत. या बहुजनांच्या मुक्तीचा एकच खात्रीचा मार्ग आहे, आणि तो म्हणजे धम्मक्रांतीचा मार्ग होय. परंतु त्याचा वसा घेतलेलेच जर नीटपणे धम्म- संस्कार घेऊ शकले नाहीत, तर दुसऱ्याला ते काय देऊ शकणार आहेत ?*_
_*धम्म-संस्कारातील पहिले पाऊल आहे ते धम्मश्रद्धा जागृत करण्याचे होय.* त्यासाठी श्रुतमय आणि चिंतमय प्रज्ञेला उत्तेजीत करून सम्यकदृष्टीच्या विकासाचे संस्कार करावयाचे असतात. त्यामध्ये कमीत कमी बुद्धानुसति, धम्मानुसति, संघानुसति, शीलानुसति, त्यागानुसति याचे प्राथमिक प्रशिक्षण घेऊन त्यांचा सराव करायचा असतो आणि सतत चिंतन-मननातून ते सत्त्य जाणायचे असते. पुढे चालून मग मनुष्य आनापानसति, कायानुसति आणि मरणानुसति यांचे प्रशिक्षण घेऊन विपस्सना साधना करावयास सिद्ध होत असतो. या संस्कारात माणसाची बौद्धिक आणि भावनिक शक्ती विकास पावून त्याचे जीवन ताण-तणावमुक्त आणि संतुलीत होत असते. माणूस खऱ्या अर्थाने श्रद्धावान बनून आचरणशील होत असतो आणि आपल्या जीवनात त्याचा प्रत्यक्ष सकारात्मक अनुभव घेत राहतो. त्याचे विचार शुद्ध आणि सात्विक होत जातात. *बुद्धविहारे अशा या कम्मट्ठानाच्या म्हणजे मानसिक कार्यसिद्धीच्या कामासाठी वापरावयाची असतात.*_
_*दुसरा धम्म-संस्कार म्हणजे मैत्री भावनेचा होय.* यात मैत्रीभावनेच्या सरावाबरोबरच संघदानाचा संस्कार सामावलेला असतो. दान भावनेतून लोभ कमी होत असतो, समाज जोडला जातो आणि बहुजनांच्या हिताचे आणि सुखाचे दृष्टीने संघाचे हातून धम्मकार्य घडत राहते. म्हणून संघाला अग्रक्रमाने दान देणे बौद्ध संस्कृतीचे फार महत्त्वाचे अंग आहे. तथागत भगवान बुद्धांनी संघाला दान देण्याच्या आचरणाला पुण्ण्याचे अमाप पीक देणाऱ्या संघरूपी शेतात बीज पेरण्याची उपमा दिलेली आहे. *‘अनुत्तरं पुञख्खेतं लोकस्स’* असे म्हटले आहे. *बौद्ध राष्ट्रात अनेक लोक दररोज संघाला दान केल्याशिवाय आपला दिवस सार्थकी लागला असे समजत नाहीत.* दानाची सवय लागणे म्हणजे मैत्रीचा धम्म- संस्कार घडणे होय. त्यातून सतत सकारात्मकता वाढत जाते आणि माणसाचे जीवन शांती आणि समाधाने भरून जाते. दानातून *‘दानकिरियावत्थु’* चा संस्कार घडत असतो. दान कसे द्यायचे, काय द्यायचे, केव्हा द्यायचे आणि दानातून काय लाभते, हे शिकावे लागते. त्यासाठी पुन्हा एकदा बुद्धविहारे आणि संघाची गरज पडतेच. या दोन प्रकारच्या संस्कारातून *’सब्बपापस्स अकरणं’ आणि ‘कुसलस्स उपसंपदा’* हे आचरण सिद्ध होत असते._
_*तिसरा संस्कार म्हणजे भावना होय.* भावना याचा अर्थ आहे आंतरिक विकास, त्यालाच मनाची शुद्धी म्हणतात. त्यात सम्यक व्यायम, सम्यक स्मृति आणि सम्यक समाधी मुख्य असतात. त्यामध्ये ‘समाधीभावना’ सर्वश्रेष्ठ मानली जाते. ती पुढे सम्यक समाधीत परिवर्तीत होते. यातून सुसंस्कार घडत असतात. मनाला कायम स्वरूपाचे वळण लागत असते. *डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे, ‘परिव्राजकांनो, लोभ, द्वेष, आळस व सुस्ती, संशय आणि अनिश्चय (अस्वस्थता)’ हे पाच अडथळे होत, म्हणून हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. हे अडथळे म्हणजे बंधने होत आणि ते दूर करण्याचा मार्ग म्हणजे समाधी होय. परंतु परिव्राजकांनो, सम्यक समाधि म्हणजे समाधि नव्हे, हे लक्षात घ्या. तिचे स्वरूप अगदी निराळे आहे. समाधि म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता होय. वरील पाच अडथळ्यांना अटकाव करणाऱ्या स्वयंप्रेरित अशा ध्यानावस्थांच्या मार्गावर ती आपणास नेते यात शंका नाही. परंतु या ध्यानाच्या अवस्था तात्पुरत्या असतात. त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटकाव हा देखील तात्पुरता ठरतो. मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे कायम स्वरूपी वळण केवळ सम्यक समाधीनेच लावता येईल. समाधीमुळे अडथळ्यांना फक्त तात्पुरता अटकाव होतो. म्हणून ती केवळ नकारात्मक स्थिती होय. तिच्यात मनाला वळण लावले जात नाही. सम्यक समाधि ही वास्तवात्मक असते. ती मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेच्या काळात कुशल कर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते, आणि त्याला अनुसरूनच अडथळ्यांमुळे निर्माण होणाऱ्या अकुशल कर्माकडे आकर्षित होण्याची मनाची प्रवृत्तीही नष्ट करते. सम्यक समाधि मनाला चांगल्या गोष्टींचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टींचाच नेहमी विचार करण्याची सवय लावते. सम्यक समाधि चांगल्या कृती करण्यास आवश्यक अशीच प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते.” (२.२.५)*_
_*कोणताही माणूस एकाएकी समाधी भावनेच्या नादी लागत नाही. त्याला हहूहळू त्याची सवय व्हावी लागते. ते कार्य बुद्धविहारांतून व्हावे लागते. लहान-थोर, शिक्षित-अशिक्षित, श्रीमंत-गरीब, नेता- अनुयायी असा कोणताही भेदाभेद न करता, सर्व बौद्धांना अशा प्रकारे सुसंस्कार करून घ्यावे लागतात. म्हणून प्रत्येकानेच विहारांमध्ये नियमित जावे लागते. परंतु जर विहारांमध्ये असे काही कार्य होत नसेल, तर तेथे कोण कशाला जाईल आणि काय मिळविल?* खरं तर विहारात जा म्हणणारेसुद्धा स्वतः कधी जात नसतात. *डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बुद्धविहारे एखाद्या सेमिनरीप्रमाणे धम्म- संस्काराची केंद्रे बनली नाहीत. त्यामुळे धम्मक्रांतीची जोरदार पिछेहाट झालेली आहे.* धम्म-संस्कारामध्ये मुलांवर सुसंस्कार घडविण्यासाठी आणि त्यांची वृत्ती वैज्ञानिक बनविण्यासाठी खास कार्यक्रम राबविले जातात. त्यासाठी दर रविवारी सकाळी विहारांमध्ये संडे स्कूल्स भरविली जातात. तेथे प्रशिक्षित लोक त्यांना अनेक प्रकारच्या उपक्रमांतून प्रशिक्षण देत असतात. त्यासाठी बऱ्याच सोई निर्माण कराव्या लागतात. केवळ भाषणांच्या माध्यमातून ते प्रशिक्षण होत नसते. अशा सोई विहारांतून निर्माण होतील तो सुदिन समजायचा. पण त्या निर्माण केल्याशिवाय काही गत्यंतर नाही, हे मात्र खरे!_
_आता तरी सावध होऊन सर्व बौद्धांनी धम्माच्या सुसंस्काराची कास धरावी आणि त्यासाठी तरी योग्य त्या भिक्खू-भिक्खूनी संघाला जवळ करून त्यांचे कडून धम्मसेवा करून घ्यावी, हीच सदिच्छा._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन – महेश कांबळे_*
*_दिनांक :- २६/०२/२०२४_*
*_संदर्भ :-_*
*_१) विजित संग्राम, मासिक मे २०१४ अंक ७०, वर्ष सहावे_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


