प्रबुद्ध भारताच्या निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या २२ प्रतिज्ञा अभियानामार्फत दरवर्षी नित्यनियमाने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वानदिनी (दि.५ व ६ डिसेंबर) रोजी ‘चैत्यभूमी,मुंबई येथे धम्मजागृतीचे कार्य केले जाते. त्या अंतर्गत चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या देश-विदेशातील सर्व धम्मबांधवाना २२ प्रतिज्ञा व त्याचे धम्माच्या दृष्टीने असलेले महत्व पटवून देणे,धम्माच्या विसंगत ज्या ज्या गोष्टी असतील त्याविषयी जनमाणसात प्रबोधन करणे. दारू,तंबाखू,गुटखा यासारख्या मादक पदार्थाचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सांगून ते सोडण्यासाठी आव्हान करणे. अंधश्रद्धेतून पुरुष-महिलांनी हातात व गळ्यात बांधलेले धागे,दोरे,गंडे, यांची निरर्थकता त्यांना पटवून देणे व ते त्यांना त्यांच्या हाताने काढावयास प्रवृत्त करणे. महिलांमध्ये मोठ्याप्रमाणात असलेल्या नवसाच्या,उपवास करण्याच्या पद्धतीला विरोध करून त्यांना धम्माचे महत्व समजावून सांगणे.
सारांश थोडक्यात, तथागत भगवान बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या मानवी कल्याणाच्या उत्कर्षासाठी व विकासासाठी आवश्यक असलेल्या विज्ञानदृष्टीने धम्माकडे पाहणे व त्याच पद्धतीचे आचरण जीवनात प्रत्येकाने करावे यासाठी २२ प्रतिज्ञा अभियान शुद्ध व्हा ! बुद्ध व्हा! हा भीमसंदेश सदोदित लोकांपर्यंत पोहचवीत असते. चैत्यभूमीवर जे जे समाज बांधव येतात त्यांच्यामध्ये जर खरच अश्या प्रकारच्या धम्मविसंगत बाबी आढळल्या तर त्यांना त्या सोडण्यासाठी जाहीर आव्हान करण्यात येते. हे कार्य म्हणजेच बाबासाहेबांचे धम्मक्रांतीचे अभियान समजले जाते, कारण २२ प्रतिज्ञा या मानवाच्या दुख: मुक्तीचा राजमार्ग आहे. जो व्यक्ती २२ प्रतिज्ञा संपूर्णपणे आपल्या जीवनात पाळेल तोच खऱ्या अर्थाने पूर्ण शुध्द बुद्ध समजला जाईल यासाठीच तर आम्ही सारेजण मिळून हे कार्य अखंडपणे करीत आहोत आणि करत राहणार प्रबुद्ध भारताच्या निर्मितीसाठी. या तुम्ही पण सहभागी व्हा २२ प्रतिज्ञा अभियान आपल्या सर्वांचे आहे त्यामुळे आपण सारे मिळून ५ व ६ डिसेंबर या दिवशी पुन्हा एकदा चैत्यभूमीवर हे कार्य करण्यसाठी सज्ज होऊया. धम्मप्रचार, प्रसारची आवड असलेल्या व सामाजिकतेचे भान असलेल्या प्रत्येकाने या अभियानात सामील व्हा.
विनोद पवार
बावीस प्रतिज्ञा अभियान मुख्य प्रचारक