✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_भाग ९_*
*_समाप्त_*
*_फलज्योतिष कला_*
_एवढं सगळं सांगून झाल्यानंतर लोक म्हणतात की, ‘हे ठीक आहे. आम्हाला पटलं. पण मग माणसाने ज्योतिष बघूच नये का?’ *माणसानं ज्योतिष बघावं का बघू नये, हा आमचा विषय नाही. ज्योतिष हे शास्त्र आहे का नाही, हा आमचा विषय आहे. म्हणजे ‘ज्योतिष हे शास्त्र नाही; पण ती कला आहे; असं जर कोणी म्हणालं तर आमचा त्याला विरोध नाही. ही कसली कला? ही माणसाला आधाराचं स्वप्न विकण्याची कला.* प्रत्येकाला एक आधार पाहिजे असतो. माणूस ज्यावेळी अगतिक असतो, त्यावेळेला अधिक काही तरी मिळेल. प्लॉट असेल तर बंगला मिळेल, दोन चाकी असेल तर चार चाकी मिळेल. यासाठी आधार पाहिजे असतो. आणि अत्यंत सुस्थिती असेल, तर ती आयुष्यभर तशीच टिकून राहील यासाठी आधार हवा असतो. *ही माणसाच्या मनाची कमजोरी आहे. ही योग्य गोष्ट नाही. पण ही स्वप्नं विकत घेण्यासाठी त्याला ज्योतिष मदत करतं. अशी मदत करणं, याचा शास्त्राशी काहीही संबंध नाही. शास्त्राच्यासाठी एका चोख पद्धतीनं विश्लेषणं करायचं असतं. प्रत्येकासाठी जर वेगवेगळे नियम लावण्याची पाळी आली जशी आज ज्योतिषाच्यामध्ये येते तर ते शास्त्र नव्हे, असे वि. म. दांडेकरांच्यासारखा माणूस अनेक वर्ष ज्योतिषाचा अभ्यास करून मांडतो, हे लक्षात घेण्यासारखे आहे.*_
_मग ज्योतिष लोकांना आवडतं म्हणजे काय? ज्योतिषावर लोक विश्वास ठेवतात म्हणजे काय? *ज्योतिष कसं सांगितलं जातं, हे जर आपण समजावून घेतलं; तर त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. तुम्ही कुठल्याही माणसाचा हात हातामध्ये घ्या आणि त्याला असं सांगा की, ‘तुमचं म्हणजे कसं, तुम्ही मनानं अगदी सरळ आहात. तुम्ही कोणाच्या अध्यात नाही, मध्यात नाही. लोकांचं नेहमी भलंच व्हावं, असं तुम्हाला वाटतं. पण तुमच्या जर कोणी विनाकारण वाकडं गेलं तर मात्र तुम्ही त्याला सोडणार नाही, बरं का. तो माणूस डोकं हालवतोच. कारण त्याला खरंच स्वतःबद्दल असं वाटत असतं. तुम्ही जर एखाद्या बाईला असं सांगितलं की, ‘बाई, तुझं बघ, तू एवढी सासरसाठी राब- राब राबतेस; पण घरच्यांना काही त्याचं चीज नाही’ प्रत्येक बाईला ही गोष्ट एका मिनिटात पटते. किंवा पुढं जाऊन तिला असं सांगितलंत की, ‘तुमचे हे म्हणजे अगदीच साधे-भोळे. तुम्ही आहात, म्हणून त्यांचा संसार नीट चाललाय; नाही तर काही खरं नव्हतं. तरी तिला असं वाटतं की, ‘बरोबर आहे. हे खरंच आहे. मी जर नसते, तर यांच्या संसाराचं काही खरं नव्हतं. म्हणजे जी-जी गोष्ट आपल्याला सांगितली जाते, ती-ती गोष्ट आपल्याला योग्य वाटेल किंवा सार्वत्रिक असेल अशाच पद्धतीनं सांगितली जाते.* आमच्यातला एक कार्यकर्ता सभेमध्ये सगळ्यांचं भविष्य एकदम सांगायचा. म्हणायचा, ‘मी आता भविष्याचं पहिलं वाक्य उच्चारतो. ज्याचं कुणाचं ते भविष्य नसेल किंवा चुकलं असेल, त्यांनी मला सांगायचं; मी पुढचं भविष्य सांगायचं बंद करतो. लोक कान टवकारायचे आणि हा असं म्हणायचा, ‘तुम्ही लई मोठ्या मनाचे आहात. आता कुणी सांगेल का की, ‘मी मोठ्या मनाचा नाही’ म्हणून. या पद्धतीनं भविष्य सांगितलं जातं. ज्याला कसलाही शास्त्राचा आधार नाही._
_*शास्त्राचा आधार नाही हे फलज्योतिषाला विरोध करण्याचं एकमेव कारण नाही. त्यातला दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की, बहुसंख्य वेळेला तुम्हाला असं सांगितलं जातं की, अदृश्य नियतीच्याद्वारे तुमच्या जीवनाच्या वस्तुस्थिती नक्की करण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामुळं माणसं ही स्वतःला कुणी तरी अज्ञाताच्या हातातलं बाहुलं समजायला लागतात.* आपल्याला महाभारतातली ती कथा माहित आहे. मत्स्यवेधाचा तो पण लावलेला असतो. आणि खाली पाण्यामध्ये बघून माशाचा डोळा वेधायचा असतो. कर्ण पुढं येतो. तो धनुर्धारी असतो. पाण्यामध्ये बघतो वर बाण सोडतो. मत्स्यवेध होत नाही. माशाच्या नेत्राच्या बाजूला बाण लागतो आणि बाण खाली पडतो. द्रौपदी चटकनं म्हणते, ‘बरं झालं बाई, सूतपुत्राला वरायचं टळलं’ त्यावेळेला कर्णानं दिलेलं उत्तर भारतीय इतिहासामध्ये अजरामर आहे. तो असं म्हणतो की, ‘सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम्, दैवायत्ते कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्’ मी कोण आहे हे मला माहीत नाही. मी सूत आहे की सूतपुत्र आहे, हे मला माहीत नाही. मी कुणाच्या पोटी जन्माला यायचं, हे माझ्या हातात नाही. मदायत्तं तु पौरुषम्, माझ्या पौरुषाचा विचार, माझ्या समाजाचा विचार, माझ्या कर्तृत्वाचा विचार. *या समाजामध्ये माणसाने स्वतःच्या सामर्थ्यावर, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला पाहिजे. ज्यावेळी तुम्ही हातामध्ये कुंडली घेता, त्यावेळी तुम्ही कळत नकळत एक पांगुळगाडा आपल्या हातामध्ये घेता. तो पूर्णपणे अशास्त्रीय आणि निरुपयोगी असतो. ज्यावेळेला तुम्ही तो पांगुळगाडा हातामध्ये घेता, त्यावेळी तुमच्या हातातील ती कुंडली दैववाद रुजवते. नशिबाची कल्पना उगवते. आणि त्याच्यामुळे परिवर्तन कुजवते. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही परिवर्तनाची चळवळ आहे आणि म्हणूनच ती या सर्वाला विरोध करते.*_
*_समाप्त_*
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_संदर्भ :- श्रद्धा आणि अंधश्रद्धा_*
*_लेखक :- डॉ नरेंद्र दाभोलकर_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :-_* २७/१२/२०२४
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹


