✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_भाग ७_*
*_फलज्योतिष शास्त्र नाहीः इतर कारणं_*
_फलज्योतिष हे शास्त्र का नाही, याच्याबद्दल इतर अनेक गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत. *जगामधल्या १९२शास्त्रज्ञांनी की ज्यापैकी १८ शास्त्रज्ञ हे नोबेल पारितोषिक विजेते आहेत, पत्रक काढून असं जाहीर केलं की, ‘फलज्योतिषाला शास्त्राचा दर्जा द्यावा, असं त्याच्यामध्ये काहीही नाही; दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेकांची चुकलेली भविष्यं या त्यांच्या चुकलेल्या भविष्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे!* उदा. २० मार्च १९७७ला त्यावेळच्या दैनिक तरुण भारतचे संपादक चं.प. भिशीकर यांनी भारतामधल्या प्रमुख वृत्तपत्रांनी निवडणुकीचे दिलेले निकाल काढले. लक्षात असं आलं की, सगळेच्या सगळेजण तोंडघशी पडलेले होते. काँग्रेस सतत सत्तेमध्ये येत होती. हे तोपर्यंत देशाच्या राजकारणाचं अविभाज्य गणित होतं. आणीबाणी झालेली होती. त्याच्यामुळं तर इंदिरा गांधी सत्तेवर येणार, असं वाटत होतं. प्रत्यक्षात काँग्रेसचं त्या निवडणुकीत पानिपत झालं. परंतु नेहमीच ही भविष्य चुकतात आणि याचं प्रमाण फार मोठं आहे. याच्याबद्दल कोणी बोलत नाही. आणि जी भविष्यं बरोबर येतात, त्यांच्याबद्दल मात्र मोठ्या प्रमाणात दणकून प्रसिद्धी केली जाते. नुकत्याच ९५ साली झालेल्या महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या आधी महाराष्ट्रामधल्या सर्व प्रमुख ज्योतिषांना पत्र लिहून आम्ही असं विचारलं होतं की, ‘तुम्ही या निवडणुकांच्या संदर्भात आधीच तुमचं भविष्य वर्तवू शकता का? आणि दोन वेळेला रजिस्टर पोस्टाने पत्र पाठवून देखील एकानं देखील त्यास उत्तर देण्याचं धाडस दाखवलं नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की, ज्याच्याबद्दल जर फलज्योतिषी आधी आपलं भविष्य वर्तवू शकत असता तर त्याला आव्हान घायला आम्ही तयार आहोत. मात्र एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळेला फक्त दोनच पर्याय असतात, त्यावेळेला शक्यता अशक्यतेच्या सिद्धांताप्रमाणे त्यापैकी एक पर्याय बरोबर येण्याची शक्यता असते. म्हणजे जर दोनच व्यक्ती निवडणुकीला उभ्या असल्या तर एक ज्योतिषी असं म्हणू शकतो की, ‘हा निवडून येईल’. आणि दुसरा ज्योतिषी असं म्हणू शकतो की, ‘तो निवडून येईल.’ कोणाचं तरी उत्तर १०० टक्के बरोबर येऊ शकतं. परंतु ते उत्तर बरोबर येणं नसतं, तर ती शक्यता अशक्यतेच्या सिद्धांताप्रमाणे केलेली मखलाशी असते. ज्यावेळेला बहुपर्यायी उत्तर सातत्यानं बरोबर येतं, त्याचवेळेला त्याला शास्त्राचा दर्जा प्राप्त होतो._
_*पेपरमधल्या भविष्याच्या नोंदी जर आपण बघितल्या तरी फलज्योतिषाच्या नावाने केवळ करमणूक किंवा केवळ फसवणूक केली जाते, हे आपल्या सहज लक्षात येऊ शकेल. आपल्या गावातील कुठलेही दोन पेपर काढा आणि कुठल्याही गावामध्ये हा प्रयोग करता येण्यासारखा आहे. त्या दोन पेपरच्यामध्ये एकाच राशीच्या व्यक्तीचं त्या दिवशी वेगवेगळं आणि बऱ्याच वेळेला अत्यंत परस्परविरोधी असं भविष्य सांगितलेलं असतं. म्हणजे एकामध्ये जर असं लिहिलेलं असेल की ‘कुटुंब सौख्य’ तर दुसऱ्यामध्ये लिहिलेलं असतं की ‘गृहकलह’. एकामध्ये लिहिलेलं असतं ‘धनलाभ’ तर दुसऱ्यामध्ये लिहिलेलं असतं ‘आर्थिक टंचाई’ आता एकाच दिवशी एकाच राशीची वेगवेगळी भविष्यं वेगवेगळ्या वृत्तपत्रात येतात कशी. आणि त्याच्यावर माणसं मूर्खासारखा विश्वास ठेवतात कशी?* किंवा हाही विचार करायला हरकत नाही की, *जगातली सगळी माणसं जर १२ राशींमध्ये विभागली गेली असतील तर याचा अर्थ धनलाभांश हे त्या दिवशी जगातल्या १/१२ लोकांचं भविष्य आहे. म्हणजे जगाच्या लोकसंख्येमधील त्या १/१२ व्यक्तींनी जर त्या दिवशी लॉटरीचं तिकिट काढलं किंवा शेअर्स घेतले, तर त्यांना धनाचा लाभ व्हायला पाहिजे. असं सरसकट काही घडत नसतं. हे आपण सारासार बुद्धीनं देखील समजू शकतो. पण ही सारासार बुद्धी आपण सामान्यपणे वापरत नाही.*_
_*आकाशातून ग्रहगोलांची येणारी किरणं ही जर आईच्या गर्भावर परिणाम करणार असतील तर आपण हा सारासार बुद्धीचा विचार करत नाही की, ‘ही किरणं एवढी प्रचंड अशा अवकाश पोकळीतून येतात. १०-१२ मजली इमारतीच्या सिमेंट काँक्रीटच्या स्लॅबमधून येतात. ती गरोदरबाई तिच्या खोलीमध्ये येतात. परंतु त्या गरोदर बाईच्या चार इंच जाडीच्या पोटाच्यामधील बालकाच्यावर परिणाम टाकण्यासाठी मात्र ती खोळंबून राहतात. आणि फक्त ते बालक ज्यावेळेला बाहेर येतं, त्यावेळेला ती परिणाम टाकू शकतात!’ हे कसे? या सगळ्यामध्ये काहीच तर्क सुसंगती नाही, हे आपल्या लगेच लक्षात येईल. परंतु तरी देखील आपण विचारच करत नसल्यामुळं आपल्याला याच्यामधली विसंगती जाणवत नाही.* आता तुम्हांला माहीत आहे की, अंटार्किटकाला सहा महिने रात्र असते आणि ६ महिने दिवस असतो. याचा अर्थ असा की, अंटार्किटकावर आजच मानवी वस्ती थोड्या प्रमाणामध्ये शास्त्रज्ञांनी केलेली आहे. अनेक देशांचे तिथं १२ महिने तळ असतात, ज्यावेळी *अंटाक्टिकावर पूर्ण अंधार असलेल्या सहा महिन्यांच्या काळामध्ये एखादी माता प्रसूत होईल, त्यावेळी तिच्या बालकाला भविष्य असेल की नसेल? चंद्रावर माणूस पोचलेला आहे. कधी ना कधी माणूस चंद्रावर वसाहती करेल आणि चंद्रावर ज्यावेळी पहिली स्त्री प्रसूत होईल, त्यावेळेला तिच्या पत्रिकेमध्ये चंद्र कुठं लिहिला जाईल? हे प्रश्न देखील आपल्याला सुचत नाहीत किंवा जर सुचले तर आपल्याला पटत नाहीत.*_
*_क्रमशः_*
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_संदर्भ :- श्रद्धा आणि अंधश्रद्धा_*
*_लेखक :- डॉ नरेंद्र दाभोलकर_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :-_* २५/१२/२०२४
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹


