‘तुझं नाव नव्हतं खोटं’
इथपास्न
तुझं नावच आमच्यासाठी सर्वस्व
नावात काय असल्याची
सुभाषितं, वचनं- बीचनं
पचनी पडत नाहीत आमच्या
आंबेडकरा..
वाचा अंगार झाली रे बाबा
अन हात कनव्हर्ट झालेत शस्त्रामंदी
आता आमच्या चार शब्दांनी
शहरं बंद व्हायची
भीती स्थिती परिस्थिती
भस्म करत सुटतात आमचे शब्द
इथल्या भंगारपणाला
तुझ्या नावाचा उद्घोष केल्याबिना
वाचेला फुटतच नाही जीव
कानाचे पडदेच करतायत
फिल्टरचे काम
तुझीच शब्दावळ आत घेवून
खकाना झटदीशी फेकून देतात बाहेर
तुझ्या नावासाठी
धराशाई होणारांची
कमी नाहीए इथं
सहनच करत नाही ते
पटतच नाही त्यांच्या अडाणी मनाला
इथले विद्यापीठ इंष्टीटयूट
आणि संस्थाबिंस्था
तुझ्या नावाशिवाय
आंबेडकरा…
आता तूच सांग
तू आमच्यात
शब्द पेरले कि शस्त्र…..?


