बाबासाहेब…!

तुम्हाला खूप गोष्टी करता आल्या

मरता  मात्र आलं नाही तुम्हाला !
ज्वालामुखीच्या धबधब्याखाली उभं राहून
निर्माण केलं तुम्ही चांदण्यांचं अंतरिक्ष.
विझलेल्या हातात दिल्या तुम्ही क्रांतीच्या विजा,
हरलेल्या डोळ्यांपुढं मांडला स्वप्नांचा समारंभ
आणि अनुवाद केला भीषण रात्रींचा तुम्ही
समाजवादी संग्रामात .
तुम्ही उगवलात सतत मृत्यूंच्या क्षितिजातून .
मृत्यूच्या जळत्या उंटावर स्वार होऊन
जिंदगीच्या वाळवंटाला तुम्ही तारांगणाची दीक्षा दिली .
घृणेचा प्रचार करणाऱ्या शब्दांना
तुम्ही मनुस्मृतीसोबतच चितेत फेकलं
असहिष्णुतेची हरळी मुळासकट उपटण्याचा
अभ्यासक्रम शिकविला तुम्ही दुनियेला.
कोसळलेली माणसं उभी करणारा
सिद्धांत मानते आता दुनिया तुम्हाला.
तुमचं सतत उगवणं वाचलं
आणि मृत्यूनं वाचला मृत्यूला मृत्यू देणारा
प्रबोधनप्रकल्प .
आम्ही पाहीलीत  खूप माणसं मारतांना ,
मृत्युपुढं लोळागोळा होतांना
आणि एक तुम्ही असे निघालात
ज्यांच्यापुढे खुद्द मृत्यूलाही मारण्यात गौरव वाटला.
सहा डिसेंबर १९५६ नंतर दुनिया तुम्हाला
मरण मारणारा जीवननायक म्हणून ओळखते.
मृत्यूला शिकविलात तुम्ही उजेडाचा सन्मान करण्याचा धडा.
मृत्यूनं दिला तुम्हाला मृत्यूविहीन जन्म
आणि तुमचं मावळणं विसरूनच गेलं तुम्हाला .
सहा डिसेंबरला दुनियेनं प्रथमच
कोट्यवधी सूर्यांनी पिसारलेलं क्षितिज पाहिलं,
पहिला सहा डिसेंबरच्या माथ्यावर उमललेला
क्रांतीच्या जन्मदिवसाचा अजिंठा,
पाहिला तुमच्या मृत्यूचा मृत्यूदिवस
आणि साऱ्या दुनियेनंही आता
तुमचा मृत्यू अमान्यच केला आहे.

डॉ यशवंत मनोहर
( बाबासाहेब….! या दीर्घकवितेतून )