25 नोहेंबर 1949 रोजी घटना समितीने केलेल्या प्रचंड जयजयकारात वादविवादाला उत्तर देण्यासाठी राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार”डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे भाषण करण्यास उभे राहिले.
राज्यघटनेच्या गुणांविषयी बोलताना ते म्हणाले, राज्यघटनेत गुंफलेली तत्वे ही चालु पिढीची मते आहेत.आणि माझे हे विधान कदाचित अतिरंजित वाटले तर हे ह्या सभागृहाचे मत आहे असे मानावे.राज्यघटना कितीही चांगली वा वाईट असली तरी शेवटी ती चांगली की वाईट हे ठरणे हे जे राज्यकर्ते तिचा वापर करतील त्यांच्यावर अवलंबून राहिल. राष्ट्राच्या भवितव्यतेचा विचार करून त्यांनी चिंता व्यक्त केली आणि ते म्हणाले, माझ्या मनाला अतिशय दुःख होते ते ह्या गोष्टीमुळे की, भारताला यापुर्वी आपले स्वातंत्र्य गमावण्याची वेळ एकदाच येऊन गेली नाही.परंतु ते भारताच्या जनतेच्या स्वतःच्याच विश्वासघातामुळे, देशद्रोहीपणामुळे त्याला गमवावे लागले.
→जेंव्हा महंमद बीन कासीमने सिंधवर स्वारी केली तेंव्हा राजा दाहीरच्या सेनापतीने महंमद बीन कासीमच्या मुनीमाकडून लाच खाऊन आपल्या राजाच्या बाजूने लढण्याचे साफ नाकारले.
→महंमद घोरीला हिंदूस्थानवर स्वारी करण्यास आमंत्रण देणारा जयचंद हा पुरूष होय.त्याने महंमद घोरीला सोळंकी राज्याचे आणि आपले सहाय्य देण्याचे वचन दिले होते.
→जेव्हा शिवाजी महाराज हिंदूंच्या स्वातंत्र्यासाठी युद्ध करीत होते, तेव्हा इतर मराठे सरदार व रजपूत मोगल बादशाहाच्या बाजूने लढत होते.
→जेव्हा शीख राज्यकर्त्यांविरूद्ध ब्रिटिश लढत होते, तेंव्हा त्यांचे सेनापती मूग गिळून बसले होते.शीखांचे स्वातंत्र्य रक्षण करण्यासाठी त्यांनी मुळीच प्रयत्न केले नाहीत.1857 साली हिंदूस्थानच्या मोठया विभागाने ब्रिटिशांविरूद्ध स्वातंत्र्ययुद्ध पुकारले असता शीख लोक ते युद्ध शांतपणे प्रेक्षक वृत्तीने पाहत राहिले.
इतिहासाची पुनारावृत्ती होईल का? असे सभागृहात विचारून ते म्हणाले, ‘हिंदू लोकांचे जातिभेद आणि पंथभेद ह्या जुन्या शत्रुमध्ये एकमेकांच्या विरूद्ध असलेल्या नवीन पक्षाची आणखी भर पडली आहे. ह्या जाणीवेमुळे माझी चिंता दुणावली आहे.’ म्हणून भारतीय जनतेला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असा इशारा दिला की,→जर त्यांनी आपल्या पक्षाचे मत राष्ट्रहिताच्यापेक्षा श्रेष्ठ मानले तर, भारतीयांचे स्वातंत्र्य दुस-यांदा धोक्यात येईल आणि कदाचित ते कायमचे नष्ट होईल.
♥तरी रक्ताचा शेवटचा थेंब शरीरात असेपर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा निर्धार केला पाहिजे.हे अमोल बोल एकुन सभागृहाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा जयजयकार केला.यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कोणत्या मार्गाने लोकशाहीचे समर्थन करावे या विचाराकडे वळले.ते म्हणाले, लोकांनी पहिली गोष्ट केली पाहिजे ती ही की, आपले सामाजिक आणि आर्थिक हेतु साध्य करताना घटनात्माक साधनांचा मार्ग स्वीकारला पाहिजे.असहकाराचे, कायदेभगांचे नि सत्याग्रहाचे मार्ग त्यांनी सोडून द्यावे.कारण घटनाबाह्य मार्ग म्हणजे केवळ अराजकाचे व्याकरण होय.
{2} →स्वातंत्र्याला दुसरा धोका लोकांच्या विभूतिपूजेतून निर्माण झाला आहे, असे सांगुन त्यांनी जाॅन स्टूअर्ट मिल या ब्रिटिश तत्ववेत्त्याच्या मताची सभागृहाला आठवण दिली.त्या ब्रिटिश तत्ववेत्त्याने लोकशाहीच्या संरक्षकांस असा इशारा दिला की, एखादा माणुस कितीही थोर असला तरी त्याच्या चरणावर त्यांनी आपले स्वातंत्र्य अर्पण करू नये किंवा आपल्या संस्थेचा नाश करण्यास तो समर्थ होईल एवढी मोठी सत्ता त्याच्या स्वाधीन करू नये.देशात प्रचलित असणा-या निर्बृद्ध आणि आंधळया विभूतिपूजेविरूद्ध डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इशारा देताना म्हटले, ‘ज्या थोर लोकांनी आयुष्यभर राष्ट्राची सेवा केली, त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगण्यात काही गैर नाही.परंतु त्या कृतज्ञतेस काही मर्यादा असते.आयरिश देशभक्त ओकानेल यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या आत्मप्रतिष्ठेचा बळी देऊन कोणीही मनुष्य कृतज्ञ राहू शकत नाही…
★आपल्या शीलाचा बळी देऊन कोणीही स्त्री कृतज्ञ राहू शकत नाही.
★आपल्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कुठलेही राष्ट्र कृतज्ञ राहू शकत नाही.
दुस-या कोणत्याही देशापेक्षा भारतात ही सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.कारण भारतामध्ये राजकारणात विभूतीपुजेचा इतका जबरदस्त परिणाम होतो की, तसा परिणाम जगातील कोणत्याही दुस-या देशाच्या राजकारणात होत नाही.धर्मामध्ये भक्ती ही आत्म्याला मुक्ती मिळविण्याचा मार्ग असू शकेल.परंतु राजकारणात भक्ती अथवा विभूतिपुजा हा अधोगतीचा आणि अंती हुकूमशाहीचा निश्चित मार्ग आहे म्हणून समजावे.
{3} भारतीय लोकशाहीचे संरक्षण करताना भारतीयांनी तिसरी गोष्ट केली पाहिजे ती ही की, त्यांनी राजकीय लोकशाहीमुळे संतुष्ट राहू नये.राजकीय लोकशाहीचे त्यांनी सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत रूपांतर केले पाहिजे.राजकीय लोकशाही ही जर सामाजिक लोकशाहीवर अधिष्ठित केली नाही, तर ती टिकूच शकणार नाही.कारण सामाजिक लोकशाही, स्वातंत्र्य, समता, आणि बंधुभाव ही जीवणाची तत्वे म्हणून ओळखते.स्वातंत्र्य, समता, आणि बंधुभाव ही एक अखंड आणि अभंग अशी त्रिमुर्ती आहे.
♣जर सामाजिक समता नसेल तर स्वातंत्र्याचा अर्थ मुठभर लोकांचे जनतेवर राज्य असणे असा होईल.
♣जर समता ही स्वातंत्र्यशून्य असेल, तर ती व्यक्तीच्या जीवनातील स्वयंप्रेरणा नष्ट करील.
★जर बंधुभाव नसेल तर स्वातंत्र्य आणि समता यांची वाढ साहजिकपणे होणार नाही.
हिंदी जनतेने एक गोष्ट मान्य केली पाहिजे ती ही की हिंदी समाजात दोन गोष्टींचा अभाव आहे.त्या दोन गोष्टी म्हणजे सामाजिक समता आणि आर्थिक समता या होत.आपल्या आवेशयुक्त भाषणात देशाला धोक्याची सूचना देताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले….
26 जानेवारी 1950 रोजी आम्हाला राजकीय समता लाभेल.पण सामाजिक आणि आर्थिक जीवणात असमता राहिल.जर ही विसंगती आपण शक्यतो लवकर नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही, तर ज्यांना विषमतेची आच लागलेली आहे ते लोक घटना समितीने इतक्या परिश्रमाने बांधलेला हा राजकीय लोकशाहीचा मनोरा उध्वस्त करून टाकल्यावाचून राहणार नाहीत.शेवटी त्यांनी भारतीयांना असे आवाहन केले की, ज्या जातिभेदामुळे सामाजिक जीवणात तट पडले आहेत आणि जातीजातींत मत्सर आणि शत्रुत्व निर्माण झाले आहे, त्या जातिभेदाचा त्याग करून भारतीयांनी सामाजिक आणि भावनिक अर्थाने एक राष्ट्र बनावे.♥♥
¤डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 40 मिनिटे चाललेले हे मधुर, अस्खलित नि भविष्यवाणीने भरलेले ऐतिहासिक भाषण ऐकताना सर्व घटना समिती तल्लीन झाली होती.मधून-मधून ती डाॅ आंबेडकरांचा जयजयकार करीत होती.डाॅ.आंबेडकरांचे ते भाषण म्हणजे भारताच्या प्रचलित राजकिय परिस्थितीचे यथातथ्य आणि वास्तव चित्र आहे, असे त्या भाषणाचे वर्णन करण्यात आले.
💦💦💦💦💦💦💦💦
संदर्भ:डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
लेखक:धनंजय किर.


