तू अमर तेज तव अखंड सामर्थ्याचे
दलितांच्या दीपा प्रणाम तुज विश्वाचे
तू होऊनि जीवन पतितांचे विश्रामा
चिखलात फुलविली सहस्त्र कमळे भीमा
सर्वस्व वाहुनी दलितांच्या उद्धारा
तू पावन तेजा उज्ज्वल केले नामा
तू जीवन दिधले मातीला गंधाचे
दलितांच्या दीपा प्रणाम तुज विश्वाचे
सत्याग्रह करुनी जागविले जग सारे
चवदार तळ्याची उघडी केली दारे
नित जागृत राहुनी न्याय दिला दलितांना
झुंजला तयास्तव गिळूनि द्वेष निखारे
घन तमी उजळिले लक्ष दीप ज्ञानाचे
दलितांच्या दीपा प्रणाम तुज विश्वाचे
तू अमर तेज तव अखंड सामर्थ्याचे
दलितांच्या दीपा प्रणाम तुज विश्वाचे