गेली अनेक वर्षे अकोला जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा अखंडपणे सुरु आहे.एकच नेता, विशाल मिरवणूक, प्रचंड प्रतिसाद,ओसंडून वाहणारा उत्साह, आखाडे, लेझीम पथके, आकर्षक देखावे,विविध झाक्या, हजारोचा स्वंयशिस्त समूह, कमालीचे आज्ञाधारी कार्यकर्ते, वर्षागणीक वाढत जाणारी गर्दी, भारतीय बौद्ध महासभेचे शिस्तबद्ध आयोजन, आणि महाराष्ट्राला राजकीय सामाजिक दिशा देणारी जाहीर सभा असा दरवर्षीचा शिरस्ता…पूर्वीचा भारिप बहुजन महासंघ (आताचा वंचित) आणि भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त परिश्रमाने दरवर्षी आयोजन असते. अॅड. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर “ अकोला पॅटर्न “ गतिमान करण्यात ह्या “विशाल मिरवणूक व जाहीर सभांचा“ सिंहाचा वाटा राहिला आहे.तीन पिढ्यातील बदल अनेक बदल अकोला जिल्ह्याने या निमित्ताने पाहिलेत. परंतु अगदी पहिल्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्या पासूनच आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेले अॅड. बाळासाहेब आंबेडकरच या वर्षी साजरा होणा-या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आकर्षण आहेत.सलग ३८ वर्षे असाच पायंडा आहे.महाराष्ट्राला आकर्षण असलेला हा सोहळ्याच्या आयोजनाचा इतिहास असाच उल्लेखनीय आहे, जुन्या जाणत्या कार्यकर्ते पदाधिकारी ह्यांनी दूरदृष्टी ठेवून सुरुवात केलेल्या छोटेखानी कार्यक्रमाने पहाता पहाता भव्य स्वरूप प्राप्त केले आहे.
तसा अकोला जिल्हा चळवळीचा बालेकिल्लाच होता..डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा भारताच्या सामाजिक राजकिय क्षितिजावर नेतृत्व उदय झाल्यानंतर त्यांचे पाठीशी हा जिल्हा प्रचंड ताकदीने उभा झाला.आंबेडकरी चळवळीतील कलापथके,गीतकार, शाहीर, जलसे, कलापथके, धंडारी,भजनी मंडळानी जागृतीचा वणवा सतत पेटत ठेवला होता.शेड्यूल कास्ट फेडरेशनचे व-हाड प्रांतिकचे ९ व १० डिसेंबर १९४५ ला बाबासाहेबांच्या उपस्थितीत अकोल्यात भरले होते.भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, शेकाफे चे कार्य मोठ्या गतीने सुरु होते.भय्यासाहेब आंबेडकरांनी देखील पाच वेळा ह्या जिल्ह्याचा दौरा केला होता.भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचा विशेष दबदबा होता.तसेच रिपब्लिकन पक्षाच्या प्रेसिडीयमची पहिली बैठक देखील २८,२९ व ३० डिसेंबर १९५७ साली अकोल्यातच संपन्न झाली होती.बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्विकाराच्या आवाहना नुसार १००% बौद्ध धम्म स्वीकारणारा जिल्हा अकोलाच आहे.१९०१ सालच्या जनगणनेत एकही बौद्ध धर्मीयांची नोंद नसलेल्या अकोला (वाशीम संयुक्त) जिल्ह्यात १९५६ ला धम्म स्वीकाराच्या नंतर १९६१ च्या जनगणनेत दोन लाख बेचाळीस हजार चारशे चौसष्ट बौद्ध धर्मीयांची संख्या नोंदविण्यात आली होती.एवढी प्रचंड आंबेडकरी निष्ठा असलेला जिल्ह्या म्हणून अकोल्याचा लौकिक होता.त्या मुळे हे तरूण बाळासाहेब पहिल्याच दिवशी नेते म्हणून स्विकारले गेले.भारतीय बौद्ध महासभेचे कार्य व भैय्यासाहेब आंबेडकर ह्यांचे नंतर महाउपासिका मीराताई आंबेडकर व बाळासाहेबांचा राबता ह्या जिल्ह्यात वाढविण्यात तत्कालीन पदाधिकारी कार्यकर्ते यशस्वी झाले.
अशी झाली सुरुवात …
१४ ऑगस्ट १९८० ला विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे नातू अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांचे अकोल्यात प्रथम आगमन झालेले.१९८० पासून अकोल्यात बाळासाहेबांचा राबता होता.सभा आणि कार्यक्रमांना सुरुवात झाली होती.धम्मदीक्षेनंतर अकोल्यात धम्म चळवळ प्रभावी होती.त्याकाळापासून भारतीय बौद्ध महासभा जिल्ह्यात कार्यरत होतीच.बाळासाहेबांचे आगमनाने राजकीय बांधणी होऊन १९८४ सालची लोकसभा निवडणूक लढण्यात आली होती.३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधी ह्यांची हत्या झाली होती.परिणामी १९८४ च्या लोकसभा निवडणुकीवर इंदिरा गांधींच्या हत्येमुळे काँग्रेस बाबत सहानुभूती ची लाट होती.इंदिरा गांधींच्या बलिदानावर मते मागितली गेली.दरम्यान १९८० मध्ये जनसंघ हा भारतीय जनता पक्ष झाला होता.भाजपाने अकोल्यात खामगांव विधानसभा मतदार संघात दोन वेळ आमदार राहिलेल्या पांडुरंग पुंडकर ह्यांना उमेदवारी दिली होती.अश्या दिग्ग्ज पक्ष आणि उमेदवाराचे विरुद्ध बाळासाहेब आंबेडकर स्वबळावर उभे होते.पक्षनिधी साठी ‘एक रूपया, एक मत’ अशी भावनिक मागणी त्यावेळी पदाधिकारी करीत होते.लोकवर्गणीतून ही निवडणूक लढविण्यात येत होती.त्याला उस्फुर्त प्रतिसाद होता.तराजू ह्या निशाणीवर बाळासाहेबांनी निवडणूक लढविली होती.स्वबळावर लढविलेल्या निवडणुकीत बाळासाहेबांना १,६५,६६४ इतकी मते मिळाली होती.इंदिरा काँग्रेसचे मधुसूदन वैराळे ह्यांनी १,७८,८७४ मते घेत केवळ १३,२१० मतांनी विजय मिळविला होता.भाजपच्या पांडुरंग पुंडकर ह्यांना १,४८,९०९ मते प्राप्त होऊन ते तिस-या क्रमांकावर राहिले होते.७,३६,०६० मतदारांपैकी ५,२४,१९९ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला होता.अर्थात ७१% मतदान झालेले होते.त्यापैकी इंदिरा काँग्रेसचे मधुसूदन वैराळे ह्यांना ३४.८६% आणि बाळासाहेबांना ३२.१७% मते मिळाली होती.भाजपच्या पांडुरंग पुंडकर ह्यांना २९.०२% मते होती.एकूण चौदा उमेदवार निवडणुकीला उभे होते लढत मात्र तिरंगी झाली.पहिल्याच निवडणुकीत मिळालेल्या १,६५,६६४ मतांनी आंबेडकरी कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली.
धम्मचक्र प्रवर्तन सोहळा सुरु करण्याची कल्पना त्या काळच्या जुन्या व दूरदर्शी कार्यकर्त्यांना रेल्वे स्टेशनवर चर्चा करताना सहज सुचली होती.एका कार्यकर्मानंतर बाळासाहेब आंबेडकर ह्यांना शेगांव येथे रेल्वे स्टेशनवर सोडून देताना, ह्या कल्पनेचा जन्म झाला होता, हे सांगितल्यास कुणालाही नवल वाटल्या शिवाय राहणार नाही.खामगांव येथे बाळासाहेबांची सभा होती.शिरस्त्याप्रमाणे सभा संपली की त्यांना रेल्वे स्टेशनवर सोडले जाई.खामगांवची सभा संपल्यावर शेगांव रेल्वे स्टेशन वर सोडायला अकोल्यातील कार्यकर्ते लंकेश्वर गुरुजी, गुणवंतराव पाटील,पी. आर. महाजन,बी.आर.सिरसाट व श्रीकृष्ण वानखडे गेले होते.सातत्याने नवनवीन प्रयोग करून लोकसंग्रह करण्याचा त्या काळच्या कार्यकर्त्याचा हातखंडा होता.संघटना बांधणी बाबत चर्चा सुरु असताना धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्या बाबत चर्चा झाली.दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या कुटुंबाला स्थान नसते ह्याबाबत संताप व्यक्त केला गेला.तसेच नागपूरला मोठ्या संख्येने जाणा-या बौद्ध अनुयायी नागपूर वरून परततात.प्रचंड गर्दी तसेच रात्री अपरात्री वाशीम मराठवाडा बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील विविध गावांत परतण्याची सोय नसल्याने त्यांना रात्र रेल्वे स्टेशनवर काढावी लागते.त्याकाळी मराठवाड्यात जाण्याचा मार्ग हा रेल्वे आणि बसेस असल्याने त्यांना अकोल्या याशिवाय पर्याय नव्हता.तसेच अकोला जिल्ह्यात रात्रीच्या हॉलटिंग गाड्या गेल्या की गावी जाण्याची सोय नसे.रात्रभर आपल्या बायका मुले, मुली आई वडील ह्यांच्यासह गैरसोय सहन करतात.आपण त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे ह्यावर एकमत झाले.नागपूरच्या धर्तीवर अकोला जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम घेण्यासाठी चर्चा झाली.विचारविनिमय करून हा सोहळा आयोजनाचा निर्धार करून कार्यकर्ते परतले.लागलीच त्याची अंमलबजावणी झाली.अशोक वाटिका येथे बैठकित सर्वांनी हे आयोजन मान्य केले.नियोजनाची चर्चा झाली आणि पहिला कार्यक्रम हा अशोक वाटीके समोर असलेल्या पोस्ट ऑफेंस मागील खुल्या मैदानावर बौद्ध महासभेचा कार्यक्रम साध्या पद्धतीने स्थानिक नेत्यांचे आणि पदाधिकारी कार्यकर्त्याचे हजेरीत पार पडला.१९८४ साली पहिला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा अशोक वाटीके समोर असलेल्या पोस्ट ऑफेंस मागील खुल्या मैदानावर वर संपन्न झाला.त्याला मिराताई आंबेडकर ह्यांचे सोबत बाळासाहेब आंबेडकर ह्यांची प्रमुख हजेरी होती.अकोला जिल्ह्यात झालेला प्रचार आणि नागपुरातील परतणारी गर्दीने सभेने विक्रम प्रस्थापित झाला.नागपूर नंतर संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होणारा हा भव्य दिव्य सोहळा अकोला जिल्हयाचे वैशिष्टय बनले.पुढे वसंत देसाई स्टेडीयम वर अनेक वर्षे हा कार्यक्रम व्हायचा.त्यानंतर आता गेली १० वर्षे अधिक काळापासून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर हा सोहळा संपन्न होतो.
दरवर्षी अकोला रेल्वे स्टेशन पुलापासून दुपारी मिरवणूक सुरु होते.सर्वात पुढे अश्वावर धम्मध्वज घेऊन स्वार असतात.त्यामागे श्रामणेर संघ, त्याचे भोवती समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी असतात.त्याचे पाठोपाठ एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांच्या करीता सजविलेला धम्मरथ असतो.त्यावर बाळासाहेब सोबत जिल्हा आणि राज्यातील पदाधिकारी आणि सत्तेतील प्रमुख पदाधिकारी विराजमान असतात.रेल्वे स्टेशन चौकापासून शिवाजी कॉलेज, टिळक मार्ग, सिटी कोतवाली पोलीस स्टेशन चौक आणि तेथून गांधी मार्गावरून नवीन बस स्थानक पासून अकोला क्रिकेट क्लब येथे साहेबांच्या धम्मरथाचे आगमन होते.धम्मरथा मागे जिल्हातील ग्रामीण आणि शहरी भागातील आखाडे, लेझीम पथके, आकर्षक देखावे,विविध झाक्या, हजारोचा स्वंयशिस्त समूह कार्यकर्ते ह्यांची प्रचंड गर्दी असते.शहरातील विविध ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे स्वागत केले जाते.र्त्याचे कडेला देखावे आणि जनतेच्या सोयी साठी मोफत पाणी, जेवण आणि आरोग्य सुविधा ह्यांची सुविधा असते.जेथे सभा होणार असते त्या मैदानावर देखील फुले शाहू आंबेडकरी विचारधनाची आणि धम्मावरील पुस्तकांचे सर्वाधिक स्टॉल असतात,ज्यात धम्मध्वजा पासून, मुर्त्या व इतर साहित्य उपलब्ध असते.आंबेडकरी चळवळीचे गायक, कलावंत आणि लेखकांचे स्वतंत्र स्टॉल लावून गाण्याच्या केसेट, पुस्तके विकतात.मैदानावर डॉ धर्मेंद्र राऊत ह्यांचे सह अनेक डॉक्टर्स आणि आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या जातात.काही संस्था आणि मंडळे स्टेशन चौकापासून रस्त्याच्या कडेला ते मैदानाच्या आत देखील भिम अनुयायां करीता भोजन पाण्याची मोफत व्यवस्था करतात.
ह्या मिरवणूक आणि सभेचे स्वरक्षण करण्यासाठी मागील काही वर्षात समता सैनिक दला बरोबर मिरवणूक नियंत्रण समिती, धम्म रथ सजावट समिती, मैदान सुरक्षा समिती आणि स्टेज व्यवस्थापन समिती ह्यांनी विशेष यंत्रणा नेमली असते.२०१३ सालापासून मी मिरवणूक नियंत्रण समिती प्रमुख झाल्या नंतर मिरवणूक नियंत्रण समितीला नवीन स्वरूप दिले.मिरवणूक नियंत्रण समितीचे ट्रॅकसूट असलेल्या तरुणांच्या हातात मिरवणुकीची सूत्रे सोपविली.मिरवणूक मार्गावरील प्रत्येक चौक आणि सम्पूर्ण मिरवणूक मार्गावर मिरवणूक नियंत्रण समितीचे तरुण कार्यकर्ते मिरवणुकीचे नियंत्रण आणि संचालन करतात.त्यामुळे पोलिसा वरील मिरवणूक नियंत्रणाचा भार नसतो.कुठेही वाद किंवा गडबड होऊ दिली जात नाही.विशेष म्हणजे दरवर्षी दुर्गा विसर्जन दस-याच्या दुस-या दिवशी असते.नेमके त्याच दिवशी मिरवणूक आणि जाहीर सभा होते.परंतु ३८ वर्षात दोन्ही मिरवणुका एकाच वेळी वेगवेगळ्या मार्गाने एकाच वेळी जातात मात्र कुठलाही अनुचित प्रकार कधीही घडला नाही.
ह्या सोहळ्याचे अनेक वैशिष्ट्य राहिलीत.मीराताई आंबेडकर ह्यांचे सोबत भिमरावजी आंबेडकर, आनंदराज आंबेडकर व बाळासाहेब ह्या भावंडाची एकत्रित उपस्थिती असो किंवा अगदी मागच्याच काही वर्षात बाळासाहेबां सोबत प्रा.अंजलीताई आंबेडकर, मनीषाताई आनंदराज आंबेडकर आणि बाबासाहेबांच्या चौथ्या पिढीतील सुजात आंबेडकर, ऋतिका भीमराव आंबेडकर, साहील आणि अमन आंबेडकर ह्यांची हजेरी असो, अनेक विशिष्ट असलेला हा महोत्सव अनेक अर्थांनी वेगळा असतो.८० च्या दशकात बाळासाहेबांसाठी खास करून हत्ती आणून हत्ती वर काढण्यात आलेली मिरवणूक, हा अनेक वर्षे प्रचंड कुतूहल आणि चर्चेचा विषय होता.जिल्ह्याला भारावून टाकणारा एक प्रसंग घडला होता तो अगदी पहिल्याच सोहळ्यात.ह्या सोहळ्यात मीराताई आंबेडकर ह्या भाषणासाठी उभ्या राहिल्या,त्यांनी सांगितल की “ बाबासाहेबांनी आपल्या हयातीत जे काही कमवलं ते सर्व समाजाला देवून टाकलं, माझ्या कडे बाबासाहेबांनी कमाविलेल्या संपत्तीचे काहीही नाही.परंतु आज समाज आंबेडकर कुटुंबांकडे प्रचंड आशेने पाहतो,माझ्या कडे बाबासाहेबांची संपती नसली तरी माझ्या कडे बाबासाहेबांचा नातू आहे आणि तो मी आज समाजाच्या ओटीत टाकते ….”ह्या वाक्याने सभा स्तब्ध झाली, मीराताईंच्या भाषणाने उपस्थित समूहाच्या काळजाचा वेध घेतला. जनतेच्या डोळ्यात अश्रू तरळले.टाळ्यांचा कडकडाटात बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा स्विकार केला गेला.आणि नेता, पक्ष, संघटना फिनिक्स पक्षा प्रमाणे झेपावली.पुढच्या काळात ’बहुजन सारे एक होवू सत्ता आपल्या हाती घेऊ ‘हा नारा देत सत्ताबाह्य समूहाला सत्ताधारी होण्याचा राजमार्ग प्रशस्त करणा-या ‘बहुजन पॅटर्नने’ जन्म घेतला. महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटा वरील अनेक प्रस्थापितांना सत्तेतून बेदखल केले.आणि बहुजनांची सत्ता प्रस्थापित केली.ह्यात अनेक ज्ञात अज्ञात कार्यकर्ते पदाधिकारी ह्यांचे मोलाचे योगदान आणि आंबेडकर कुटुंबाची ३८ बहुमुल्य वर्ष आहेत हे विसरता येणे शक्य नाही.
बाळासाहेबावर बायपास शस्त्रक्रिया; विश्रांती आणि पुनरागमन.
८ जुलै २०२१ रोजी सकाळी एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांचा एक व्हिडीओ सकाळी सोशल मिडियात आला.तीन महिने राजकीय कार्यक्रमांपासून दूर राहणार असल्याची घोषणा त्यांनी सदर व्हिडिओच्या माध्यमातून केली.अचानक आलेल्या ह्या व्हिडीओने अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं.बाळासाहेबांनी व्यक्तिगत कारणांसाठी पक्षाच्या कार्यक्रमांपासून पुढील तीन महिने दूर राहणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर तीन महिन्यांच्या कार्यकाळात पक्षाचे कार्यक्रम सुरू राहावेत यासाठी पक्षाच्या जेष्ठ नेत्या आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांची पक्षाच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.त्याच व्हिडिओ मध्ये पक्षाच्या प्रभारी अध्यक्षा म्हणून रेखाताई ठाकूर ह्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात येत असल्याची घोषणा देखील होती.एखाद्या राजकीय नेत्याने तीन महिन्यांच्या सुट्टीची घोषणा केल्याची हि अभूतपूर्व घटना असल्याने अनेक तर्क- वितर्क लढवण्यात येत होते.दरम्यान, “माझ्या व्यक्तिगत कारणासाठी पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमातून तीन महिन्यासाठी कार्यरत राहणार नाही. पक्ष चालला पाहिजे. आपण आंदोलनाला सुरुवात केली आहे. राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये निवडणुका आहेत. म्हणून पक्षाला अध्यक्ष असणे महत्वाचे आहे, असे सांगत वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी प्रभारी म्हणून रेखाताई ठाकूर यांची नियुक्त करण्यात येत आहे. पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांनी रेखाताई ठाकूर यांना सहकार्य करून पक्षाचे कार्यक्रम राबवावेत”, असे आवाहनही बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडीओ व्दारे केले होतं. त्याचे खरे कारण समोर आलं होते की त्यांचे वर बायपास सर्जरीची तातडी असल्याने त्यांनी सुट्टी आणि प्रभारी अध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतला होता.
त्याच दिवशी अर्थात गुरुवार ८ जुलै २०२१ रोजी तातडीने त्यांचेवर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली.सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, मुंबई डॉ. अन्वय मुळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हि शस्त्रक्रिया केली होती. वंचितच्या प्रभारी अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी मेडिकल बुलेटिन जाहीर करीत यासंदर्भात माहिती माध्यमं आणि सोशल मीडियावर दिली होती.बाळासाहेब आंबेडकर हे आयसीयूमध्ये असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जाहीर करण्यात आले होते. अजून काही दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येईल, असेही रेखाताई ठाकूर यांनी म्हटलं होतं. मुंबईतील मुस्लिम समाजाच्या आरक्षण मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले होते.मात्र सकाळीच त्रास व्हायला लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यापूर्वी मराठा क्रांती मोर्चा मध्ये कोल्हापूर येथे छत्रपती संभाजी महाराज ह्यांचे सोबत आंदोलन करताना बाळासाहेबांना त्रास जाणवला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले होते.
दिनांक १७/०७/२०२१ रोजी सुजात आंबेडकर ह्यांनी त्यांचे फेसबुक वरून आंबेडकर परिवाराच्यावतीने एक निवेदन प्रसिद्ध केले होते.त्या निवेदनाचा मजकूर असा होता. “सुजात आंबेडकर, रितिका आंबेडकर, साहिल आंबेडकर, अमन आंबेडकर आणि संपूर्ण आंबेडकर कुटुंबियांच्यावतीने सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, मुंबई डॉ. अन्वय मुळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभारी आहोत.ऍड प्रकाश आंबेडकर यांच्यावर शस्त्रक्रिया करणारे वैद्यकीय टीम, पॅरामेडिकल आणि रुग्णालयातील इतर सर्व कर्मचार्यांचे आम्ही ऋणी आहोत. आपणा सर्वांचे खूप आभार. धन्यवाद !” अर्थात आंबेडकरी चळवळीवर आलेले एक मोठे संकट दूर झाले होते.दरम्यान अकोला जिल्हा परिषद सह काही ठिकाणी पोटनिवडणुका लागल्या मात्र त्याला त्या निवडणुकीत पहिल्यादा ते अनुपस्थित होते.अकोल्यातील कार्यकर्त्यांनी ही निवडणूक एकजुटीने लढत पोटनिवडणुकीच्या जिल्हा परिषदेच्या १४ पैकी ६ जागा स्वबळावर विजय मिळवला होता.आणि २८ पंचायत समिती गणात पोटनिवडणूक पार पडली होती.२८ पैकी १६ जागा वंचितने जिंकल्या.
तीन महिन्याचे सुट्टीनंतर बाळासाहेब आंबेडकर पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले तो कार्यक्रम होता.भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वातील धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्याचा.कोविडच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नव्हती.त्यामुळे १६ ऑक्टोबर २०२१ रोजी अकोला जिल्हा परिषद अध्यक्षांचे निवास्थानी मोजक्या निमंत्रित पदाधिकारी कार्यकर्त्याच्या उपस्थितीत आयोजित डिजिटल धम्मचक्र प्रवर्तन सोहळा २०२१ चे आयोजन करण्यात आले होते.ह्या यशाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब आंबेडकर १६ तारखे होणं-या सभेचे प्रबुद्ध भारत वरील फेसबुक पेजवर live प्रक्षेपण महाराष्ट्रासाठी व्हावे म्हणून प्रबुद्ध भारतचे कैमेरामन वैभव गायकवाड आणि मी नियोजन केले होते.सभेच्या नियोजनाची आणि स्टेजव्यवस्थापनाचा भर देखील माझ्यावर होता.भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष पी जे वानखडे ह्यांचे अध्यक्षतेखाली होणार-या सभेत बाळासाहेब आंबेडकर काय बोलतात ह्याची प्रचंड उत्सुकता होतीच.नांदेड जिल्हयातील देगलूर बिलोली ह्या अनूसूचित जातीसाठी राखीव जागेची पोटनिवडणूक होणार होती.त्यात पक्षाने डॉ उत्तम इंगोले ह्यांना उमेदवारी जाहीर केली होती.म्हणूनच धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यात बाळासाहेब काय घोषणा करतात, भाषण काय देतात ह्या वर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहोतेच.त्या अर्थाने हा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा अर्थात “धम्म मेळावा ” राज्याच्या समाजकारण व राजकारणाला नवी दिशा देणारा होता.सभेच्या दोन दिवस आधी पासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता.सभेच्या दिवशी ऐन संध्याकाळी ६ वाजता पासून विजा चमकायला लागल्या.तासाने हलकी हजेरी लावली.पाऊस थांबण्याची दोन तास वाट पाहून आम्ही सभा सुरु केली.आणि तीन महिन्याचे नंतर पहिल्यादा बाळासाहेब सार्वजनिक कार्यक्रमात दाखल झाले.त्यांचे बरोबर अंजलीताई आंबेडकर, अमन आंबेडकर आणि राहुल अहिरे होते.बाळासाहेबांचे वाहन थेट स्टेजजवळ आणायची व्यवस्था केल्याने साहेबांचा वाहन चालक स्वेल वाघमारे ह्यानें वाहन थेट सभेच्या पायऱ्या जवळ आणले होते.अचानक हलक्या बरसणा-या पावसाच्या सरी तीव्र झाल्या आणि मग वक्त्यांची भाषणे आटपुन घेत थेट बाळासाहेबांचे भाषण सुरु केले.पाऊस असल्याने मी विशेष मोठ्या आकाराच्या छत्र्या आणून ठेवल्या होत्या.बाळासाहबांचे पाठीमागे भाषण सुरु असताना मोठी छत्री धरून मी पूर्णवेळ उभा होतो.
“ओबीसी’ ना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू” बाळासाहेब आंबेडकर
ऑनलाइन धम्म मेळाव्यात बोलताना बाळासाहेबांनी असंतोषाला आंदोलनाचे स्वरुप देण्याचे आवाहन केले होते इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) उद्धवस्त करण्याची व्यवस्था निर्माण केली जात असून, समाजात असंतोष निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे या व्यवस्थेविरोधात येत्या काळात वाढत जाणाऱ्या असंतोषाला चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे स्वरूप देणे गरजेचे आहे, असे आवाहन केले.कायदे व अनेक निर्णयांद्वारे ओबीसींना संपविण्याचे काम होत असल्याचा आरोप त्यांनी केला. आताचे “ओबीसी नेते मंडलविरोधी असून शरीराने ते ओबीसीसोबत असले तरी मनाने मात्र ते कमंडलसोबत असल्याचा घणाघात त्यांनी केला होता.महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडतांना गत आठवड्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता. मात्र हा तर तोंडदेखलेपणा असल्याचे टीकास्त्र अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर सोडले. पंतप्रधान मोदी सरकारने यांनी मंजूर केलेले शेतकरी विरोधी आहेत; मात्र हे कायदे करण्यासाठी मोदींना डोक कोणी दिलं असा सवाल करीत, मोदी यांनी मंजूर केलेले २००५ व २००६ मध्ये महाराष्ट्र विधानसभेत हे कायदे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मंजूर केले, असा आरोप त्यांनी यावेळी केला.समाजव्यस्थेत ज्यांना डावलण्याचा प्रकार झाला, त्यांनी समाजव्यवस्थेविरोधात उठाव केला. त्यामध्ये येथील आदिवासी आणि दलितांचा उठाव झाला असून, आता ओबीसींना डावलण्याचा प्रकार होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हा परिषद पंचायत समिती मधील पोटनिवडणुकीचा निकाल चांगला असे सांगत सर्व कार्यकर्त्यांचे कौतूक करताना एकत्र आलेल्या विरोधकांचा जिल्हा परिषदेत शिरकाव होऊ दिला नाही!
अकोला जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा निकाल अत्यंत चांगला लागला असून पक्षाच्या विरोधात एकत्र आलेल्या विरोधकांचा जिल्हा परिषदेत शिरकाव होऊ दिला नाही, असे सांगत बाळासाहेब आंबेडकर यांनी जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांच्या कामगिरीचे कौतूक केले.जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत सर्वांनी मिळून निर्णय घेऊन काम केले. त्यामुळे पक्षाला चांगले यश मिळाले. जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात एकत्र बसलेल्या विरोधकांचा जिल्हा परिषदेत शिरकाव होऊ दिला नाही आणि १४ पैकी ६ जिल्हा परिषद आणि १६ पंचायत समिती सदस्य निवडून आणल्याने जाहीरपणे कौतुकाची थाप दिली.यापुढे कार्यकर्त्याला चळवळीचा नेता व्हावे लागेल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी अपडेट होण्याची गरज आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी समुहाऐवजी चळवळीच्या नेतृत्वाकडे वळावे, असा मोलाचा सल्ला देखील दिला.
भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी. जे. वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या धम्म मेळाव्याला प्रा. अंजली आंबेडकर, अमन आंबेडकर, भंते बी. संघपालजी महाथेरो, भंते बुध्दपालजी थेरो, राजेंद्र पातोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने,डॉ धैर्यवर्धन पुंडकर, अरुंधतीताई सिरसाठ ,उपाध्यक्ष सावित्री राठोड, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, सभापती पंजाबराव वडाळ, प्रदीप वानखडे, प्रमोद देंडवे, प्रभाताई शिरसाट, शंकरराव इंगळे कलीम खान पठान, वंदनाताई वासनिक एवढे मोजकेच पदाधिकारी धम्ममंचावर होते.समोर भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. या धम्म मेळाव्याचं प्रास्ताविक विजय जाधव, संचालन भारतीय बौध्द महासभेचे जिल्हा महासचिव प्रा. डॉ. एम. आर. इंगळे यांनी तर आभारप्रदर्शन रमेश गवई गुरुजींनी केले. सामुहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करुन सुरु झालेल्या कार्यक्रमाची सरण:तयने सांगता झाली.पत्रकारांची व्यवस्था वंचितचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे,सहायक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशिव ह्यांनी केली होती.
प्रत्येक पाच वर्षात देशाचे व राज्याचे भवितव्य ठरविणारी निवडणूक होतात.त्या अनुषंगाने ह्या पार्श्वभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यात बाळासाहेब काय घोषणा करतात ह्या वर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असते.त्यामुळे खऱ्या अर्थाने हा धम्मचक्र प्रवर्तन दिन राज्य व देशाच्या राजकारणाला दिशा देणारी ठरते.पुढील काळात भारतीय बौद्ध महासभा भारिप, भारिप बहुजन महासंघ आणि वंचितच्या राजकीय वाटचालीतील रथाचे दुसरे चाक बनले होते.बौद्ध महासभेचे जिल्हा प्रमुख दिनबंधू गुरुजी, जिल्हाध्यक्ष एन. एस. इंगळे, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब इंगळे,महाथेरो भन्ते बी. संघपालजी, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ लबडे, जिल्हाध्यक्ष ना. मु. इंगळे, जिल्हाध्यक्ष रवींद्र दारोकर आणि विद्यमान जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी पी. जे. वानखडे व त्यांच्या सहका-यांनी हा समृद्ध वारसा नुसता जपलाच नाही तर त्याला सातत्याने एक नवा आयाम दिल्याने अकोला जिल्ह्यात बौद्ध समाजाची एकजूट कायम राहिली.कोरोना निर्बंधानंतर दोन वर्षाने अकोला क्रिकेट क्लब वरील जाहीर धम्म मेळावा आणि भव्य मिरवणूक २०२२ साठी अकोला जिल्हा सज्ज झाला आहे, वाट आहे ती ६ ऑक्टोबरची.पुन्हा अकोल्यात तोच जोश जल्लोष आणि माहोल उभा होणार आहे.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
९४२२१६०१०१