” मी हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हते ; पण मी हिंदू म्हणून मरणार नाही , ते मात्र माझ्या हातात आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला मुक्कामी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. व ३१ मे १९३६ रोजी धर्मांतराविषयी अस्पृश्य समाजाचे मनोगत जाणून घेण्यासाठी सभा भरविली व याच सभेत ” मुक्ती कोण पथे ” हे बाबासाहेबांचे ऐतिहासिक भाषण झाले. या भाषणामध्ये बाबासाहेबांनी बुद्धांचाच उपदेश जनतेला दिला . त्यानंतर १७ मे १९४१ साली डॉ. बाबासाहेबांनी जनता वृत्तपत्रात ‘ बुद्धजयंती आणि तिचे राजकीय महत्व ‘ हा अग्रलेख लिहिला . आणि सर्वांनी बुद्ध जयंती साजरी करावी असे आवाहन त्यांनी त्या लेखातून केले. त्यांनी बुद्धांचे चरित्र आणि भगवान बुद्धांचे कार्य याविषयी विस्ताराने प्रकाश टाकला . २० जुलै १९४६ रोजी बाबासाहेबांनी मुंबई येथे ” सिद्धार्थ कॉलेज ” सुरु केले या महाविद्यालयाचे नाव बुद्धांच्या नावावरून त्यांनी ठेवले .
१९ जानेवारी १९४९ रोजी एका सभेत बाबासाहेबांनी ” क्रांतीचे चक्र आपण फिरवू या ” या आशयाचे भाषण दिले.
२ जानेवारी १९५० रोजी नवी दिल्ली येथे बुद्धजयंती निमित्त भाषणात ते म्हणाले ” भगवान बुद्धांमुळेच भारताची शान आहे व बौद्ध धम्मामुळेच भारत देश महान असल्याचे त्यांनी सांगितले .
१९ व २२ मे १९५० रोजी हैद्राबाद येथील पत्रकार परिषदेत बोलतांना बाबासाहेब म्हणाले ” मीच काय , भारतवर्ष बुद्धधम्मीय व्हावे व संपूर्ण भारताने बौद्ध धम्म स्वीकारावा . “
४ डिसेंबर १९५४ रोजी रंगून येथे जागतिक बौद्ध परिषदेत डॉ. बाबासाहेब म्हणाले, इतक्या देशात बौद्ध धम्म असूनसुद्धा त्याचा प्रचार व प्रसार होत नाही .व त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार करण्याविषयी दृढ संकल्प केला .
२३ सप्टेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारण्याचा दिवस व ठिकाण निश्चित केले. व १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे मी धर्मांतर करणार असा संदेश त्यांनी जनतेस दिला .
व ठरल्याप्रमाणे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर अंबाझरी रोडवरील भव्यमंडपात सकाळी ९.३० च्या सुमारास बाबासाहेब व माईसाहेब आंबेडकर यांचा बौद्ध धम्म दीक्षा विधी पूज्य भन्ते चंद्रमणी महास्थवीर यांनी केल्यानंतर पुनः त्याच मंडपात खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुमारे पाच (५ ) लाखापेक्षा अधिक बांधवाना २२ धम्म प्रतिज्ञा देऊन स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यावेळी ‘ भगवान बुद्ध कि जय ‘ ‘ बाबासाहेब करे पुकार बौद्धधम्म का करो स्वीकार ‘ अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते.
ज्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनुष्य मात्रास नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो असे म्हणाले, तेव्हा त्यांचा गळा दाटून आला व त्यांच्या डोळ्यात अश्रू चमकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणते दुःख झाले असले पाहिजे ? त्यांच्या सारख्या असामान्य निश्चयाच्या या महापुरुषाच्या नेत्रातून का अश्रू यावेत ? डॉ . बाबासाहेबांना असे वाटण्याचा संभव आहे कि , मी ज्ञान मिळविण्याची पराकाष्ठा केली, उत्कृष्ट चारित्र्य ठेवले, वैयक्तिक लाभाची पर्वा केली नाही, अनेक ग्रंथ लिहून भारताच्या ‘ विचारत ‘ भर घातली , ब्रीदाने जीवन घालविले . म्हणजे ज्ञान , शील, सचोटी या बाबतीत मी कोणाहीपेक्षा कमी नसतांना व ३० वर्षे हिंदूधर्म समाजरचनेत राहिलो, पण केवळ माझ्या बांधवाना इज्जतीचा व स्वतंत्र बाण्याचा मार्ग दाखवितो म्हणून हिंदुनी सर्व प्रकारच्या कारवाया करून माझे मार्ग बंद करण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु ठेवले ? त्यांना याबाबत साध्या माणुसकीची पण आठवण राहिली नाही .
तेव्हा मी व माझ्या बांधवानी असे कोणते पाप केले कि , त्यांच्यामध्ये राहूनही ते आम्हास सध्या मानुसकीने राहू देत नाहीत. ते काहीही असो ! या अतिशय बिकट परिस्थितीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग आता आपल्या बांधवाना दाखविला , तो पूर्ण ‘ स्वतंत्र ‘ बाण्याचा सर्वोत्कृष्ट आहे यात शंकाच नाही.