सुदत्त – अनाथपिण्डक.

पूर्वीच्या काळचा उत्तरपथ हा राजगृह, नालंदा, पाटलीपुत्र, कुसिनारा, श्रावस्ती यांना जोडून तक्षशिलापर्यंत जात होता. तर दक्षिणपथ श्रावस्ती, साकेत, कौसंबी, विदिशा, उज्जयीनी यांना जोडून विंध्यपर्वत आणि सातपुडा यांना ओलांडून प्रतिष्ठान (पैठण) कडे जात होता. अशा तऱ्हेने श्रावस्ती ही उत्तरपथ आणि दक्षिणपथ या महत्वाच्या व्यापारी मार्गावर वसले होते. म्हणूनच सावत्थीला ‘सब्बमेत्थ अत्तीती सावत्थी’ म्हणजे इथे सर्व काही मिळते असे पाली वाड्मयात म्हटले आहे.
सुदत्त श्रावस्तीचा वासी होता. श्रावस्ती कोशल राज्याची राजधानी होती. प्रसेनजित कोशल देशाचा राजा होता. सुदत्त प्रसेनजिताचा कोषाधापती होता. तो गोरगरिबांना दान देत असे म्हणून तो “अनाथपिण्डक” या नावाने ख्यात होता.
राजा प्रसेनजिताच्या एका मुलाचे नाव जेत असे होते. सुदत्त किंवा अनाथपिण्डक याने बुद्धांना श्रावस्ती येथे येण्याचे आमंत्रण दिले होते तसेच त्यांना एक विहार बांधुन दान करावे अशी त्याची इच्छा होती.
श्रावस्तीत तथागत बुद्धांना राहण्यासाठी योग्य जागा शोधत असता श्रावस्ती नगरीच्या शेजारी असलेले राजपुत्र जेताचे ‘जेतवन’ हे अत्यंत योग्य आहे, असे त्याला वाटले. राजपुत्राने अनाथपिण्डकाला ती जमीन विकण्याचे कबूल केले पण तिची किंमत म्हणून अनाथपिण्डकाने ती संपूर्ण जमीन सोन्याच्या नाण्यांनी झाकली पाहीजे अशी अट घातली. अनाथपिण्डकाने ती जमीन सोन्याच्या नाण्यांनी झाकण्यास सुरुवात केली. अठराकोट नाणी पसरल्यावर नाणी कमी पडली म्हणून अनाथपिण्डकाने बैलगाडीतून आणखी नाणी आणावयास सांगितले. तोपर्यंत राजपुत्र जेताला अनाथपिण्डक ती जमीन कशासाठी घेत आहे, हे माहीत नव्हते. जेव्हा राजपुत्राला कळाले की भगवान बुद्धांना राहण्यासाठी तेथे विहार बांधायचा आहे, तेव्हा राजपुत्राने अनाथपिण्डकाला आणखी नाणी आणू नका, असे सांगितले. त्याने अर्ध्याच सुवर्णमुद्रा स्वीकारल्या आणि म्हणाला, ” भूमी तुझी आहे. पण वृक्षराजी माझी असेल. मी ही वृक्षराजी माझ्यावतीने तथागतास दान देतो.” यामुळे त्या विहाराला अनाथपिंडिकाचा जेतवन विहार असे नाव पडले.
हा प्रसंग बौद्ध शिल्पकारांचा फार आवडीची आहे. बुद्धगया, सांची वगैरे अनेक ठिकाणी ‘बैलगाडीवर सोन्याची नाणी आणली जात आहेत आणि ती जमिनीवर पसरविली जात आहेत’ असे शिल्प दगडात कोरलेले दिसून येते.
अनाथपिण्डकांनी जेतवनात सारिपुत्रांच्या मार्गदर्शनाखाली मोठा विहार बांधला. तथागत बुद्ध तेथील ‘गंधकुटी’ विहारात राहत असत. बुद्धांनी येथे २४ वर्षावास केले. तेथे बांधलेल्या इतर कुटींची नावे – करेरी कुटी, कोसंब कुटी, चंदन माला आणि सलल घर अशी होती. सम्राट अशोक धम्मयात्रेसाठी श्रावस्तीत आला होता. त्यावेळी तेथे सारिपुत्र, महामोग्गलान, महाकाश्यप आणि आनंद यांचे स्तूप होते. सम्राट अशोकाने त्यांना आदरांजली वाहिली.
कुशानांच्या काळात श्रावस्ती भरभराटीला आलेले शहर होते. पण कुशानांच्या नंतर श्रावस्तीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकात फा-हियान श्रावस्ती येथे आला होता, तो म्हणतो की जुन्या बौद्ध विहारांवर हिंदु मंदीरे बांधली होती. जेतवन विहाराची इमारत आगीत भस्म झाली होती.
इसवी सनाच्या सातव्या शतकात हयू-एन-त्सँग श्रावस्ती येथे आला. जेतवनाच्या पूर्वेकडील्या दरवाज्याजवळ त्याने सम्राट अशोकाचे प्रत्येकी ७५ फूट उंचीचे दोन स्तंभ पाहिले. विहार आणि स्तूपांची पडझड झालेली त्याने पाहिली जेतवनापासून उत्तर पश्चिमेला साधारणपणे अर्ध्या मैलापर्यंच्या अंतरावर आनंदवन होते, तेथे अनेक स्तूपे पाहीली.
श्रावस्तीत आठव्या नवव्या शतकातील काही लेख सापडले आहेत. त्यावरुन असे वाटते की आठव्या नवव्या शतकात जेतवन हे बौद्धांचे केंद्र होते. त्या ठिकाणी बाराव्या शतकापर्यंत बौद्ध भिक्खू रहात होते. बाराव्या शतकानंतरच्या मुस्लीम स्वाऱ्या नंतर श्रावस्तीत बौद्ध भिक्खू रहात असल्याच्या खुणा दिसत नाहीत.
जनरल कनिंगहॕमने इ.स. १८६३ आणि १८७३ साली ‘सहेत महेत’ येथे उत्खनन केले. त्याने तेथील १६ स्तूप शोधून काढले, त्याचप्रमाणे त्याने गंधकुटी आणि कोसंबकुटी सुद्धा शोधून काढल्या..
Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?