संत तुकाराम महाराजा अभंग | Sant Tukaram Maharaj Abhang

1. जन्माचे तें मूळ पाहिलें शोधून । दु:खासी कारण जन्म घ्यावा॥१॥

पापपुण्य करूनी जन्मा येतो प्राणी । नरदेही येऊनी हानी केली ॥ २ ॥

रजतमसत्व आहे ज्याचे अंगी । याच गुणॆं जगी वाया गेला ॥ ३॥

तम म्हणिजे काय नर्कचि केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥ ४॥

तुका म्हणे येथें सत्याचे सामर्थ्य । करावा परमार्थ अहर्निशी ॥ ५॥

2. अहर्निशी सदा परमार्थ करावा} पाय न ठेवावा आडमार्गी ॥ १॥

आडमार्गी कोणी जन जे जातील । त्यांतून काढील तोचि ज्ञानी ॥ २॥

तोचि ज्ञानी खरा दुजीयासी । वेळोवेळां त्यासी शरण जावे ॥ ३ ॥

आपण तरेल नव्हें ते नवल । कुळॆं उद्धरील सर्वांची ती ॥ ४ ॥

शरण गेलियानें काय होतें फळ । तुका म्हणें कुळ उद्धरिले ॥ ५ ॥

3. उद्धरीले कूळ आपण तरला । पूर्ण तोचि झाला त्र्यैलोक्यात ॥ १॥

त्र्यैलोक्यात झाले द्वैतची निमाले । ऐसे साधियेले साधन बरवें ॥ २॥

बरवें साधन सुखशांति मना । क्रोध नाही जना तीळभरी ॥ ३॥

तीळभरी नाही चित्तासी तो मळ । तुका म्हणे जळ गंगेचे ते ॥ ४ ॥

4. जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन । भगवंत जाण त्याचेजवळी ॥ १ ॥

त्याचे जवळी देव भक्तीभावे उभा । स्वानंदाचा गाभा तया दिसे ॥ २॥

तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण । अनुभवी खूण जाणती हे ॥ ३॥

जाणती जे खूण स्वात्मअनुभवी । तुका म्हणे पदवी ज्याची त्याला ॥ ४ ॥

5. सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया।

तुलसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर,तेचि रूप।।

मकर कुंडले, तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणि विराजीत।।

तुका म्हणे माझे, हेचि सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने।।

6. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥

गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ ॥

विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥

तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥

7. आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥

कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हरीख वाटे देवा ॥॥

गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचें ॥२॥

तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥३॥

8. कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥

ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥॥

कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥

गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तेचि रूप ॥३॥

झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥

तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥५॥

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?