सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं हाय वो
सांगा धनाचा साठा नि आमचा वाटा कुठं हाय वो !!धृ!!
घाम शेतात आमचा गळं
चोर आयताच घेऊन पळं
धन चोराचा हा पळण्याचा फाटा कुठं हाय वो
सांगा धनाचा साठा….!!१!!
लोणी सारंच तिकडं पळ,
इथं भुकेनं जीवडा जळं
दुकानवाले दादा आमचा आटा कुठं हाय वो
सांगा धनाचा साठा…!!२!
इथं बिर्हाड उघड्यावर,
तिथं लुगडी लुगड्यावर
या दुबळीचं धुडकं फडकं
धाटा कुठं हाय वो
सांगा धनाचा साठा..!!३!!
इथं मिठात शिजतात तुरी,तिथं मुर्गी काटा सुरी
सांगा आम्हाला मुर्गी कटलेट,काटा कुठं हाय वो
सांगा धनाचा साठा…!!४!!
न्याय येशीला टांगा सदा,माल त्याचा की आमचा वदा
करा निवाडा आणा तराजू काटा कुठं हाय वो
सांगा धनाचा साठा…!!५!!
शोधा सारे साठे चला,
आज पाडा वाटे चला
*वामनदादा*******-
सांगा आमचा घुगरी घाटा कुठं हाय वो !!६!!

समाज जीवनाचा ऊत्तुंग अभ्यास असलेलं व्यक्तीमत्व म्हणजे वामनदादा,बाबासाहेबांचा क्रांतीकारी वारसा चालविणारे वामनदादा,शोषित-श्रमिक-ऊपेक्षित-स्ञीदास्य-कष्टकऱ्यांच्या मुक्तीसाठी संघर्ष करणारे वामनदादा…तुफानातील एक दिवा म्हणजे वामनदादा..डॉ.बाबासाहेबांची चळवळ खेड्यापाड्यातील जनतेच्या हृदयापर्यंत पोहचविणारे वामनदादा…बुध्द कबीर-फुले-शाहूंच्या तत्वज्ञानाला शब्दबध्द करून समाजमनात सुमधुर वाणीत रूजविणारे वामनदादा..एक युगप्रवर्तक महानायक!
वामनदादांचं गाणं झोपडीत जन्मलं.त्यांनी शाहिरी फड,सभा संमेलन गाजविले.वामनदादांनी प्रथम हिंदी विडंबन गीत मुंबईला निर्माण केलं व चाळसभेच्या सुरूवातीला स्वतःच्या पहाडी आवाजात सादर केलं
“आज कितने दिन से हमको
अछूत करके पुकारा है
दूर हटो ए कॉग्रेसवालो
फेडरेशन हमारा है!”
अशी गीतलेखनाला सुरूवात केली ती अखेरपर्यंत सहा दशकाहून अधिक काळ दादा लिहित होते…वाचकांना देत होते..श्रोत्यांना ऐकवत होते..असे अगाध प्रतिभासंपन्न कवी-गायक-संगीतकार केवळ आणी केवळ वामनदादाच!.वामनदादांच्या लेखणीतून चार हजारांहून अधिक काव्यगीतांची रचना झाली.मात्र त्यातील फक्त सव्वा दोनशे गीते जनतेपर्यत पोहचली कारण वामनदादाची लेखणी समाजमनाचा अंगार फुलवित होती ती व्यावसायिकांचे तळवे चाटणारी बोथट धार कधीही बनली नाही.अत्यंत प्रतिकूल परीस्थितीत दादांनी गाणे तयार करून ते स्वतः जनतेपर्यंत पोहचविले या धकाधकीच्या आयुष्यात त्यांना पहिली पत्नी सोडून निघून गेली.त्यांचे एकुलते एक अपत्य त्यांची मुलगी या अपत्यप्रेमापासून देखील दादा वंचितच राहिले .दुसरी पत्नी देखील अडाणी आणी रागीट स्वभावाची असल्यामुळे दादांच्या आयुष्यात त्यांच्या मानसपुत्राने आनंद देण्याचा प्रयत्न केला.संपूर्ण समाज हेच वामनदादांचे कुटुंब होते म्हणूनच वामनदादांची आयुष्यभर भटकंती सुरू राहिली.समाजाच्या हाल अपेष्टा आणी गरीबीमुळे वाताहत झालेल्या जनतेचे वर्णन करतांना दादा लिहतात
“तांडा चालला..तांडा चालला..
पोटाच्या खळगीसाठी
घेऊन बिऱ्हाड पाठी
तांडा चालला…तांडा चालला…..
याच गरीब जनतेच्या ऊदरनिर्वाहाच्या प्रश्नांनी व्यथित होवून दादा आपल्या गीतांमधून थेट टाटा -बिर्लालाच जाब विचारतात
“सांगा आम्हाला बिर्ला -बाटा
टाटा कुठं हाय वो
सांगा धनाचा साठा नि आमचा वाटा कुठं हाय वो! आज एकूण देशाची स्थिती काय आहे? तर इकडे माड्या आहेत.तिकडे झोपड्या आहेत.झोपड्या आसवे ढाळीत आहेत.अन्नधान्य पिकले तरी गुप्तसाठ्यात बंद आहे.
“कष्ट मरणाचे करतो कुणी
पोती आयतीच भरतो कुणी
घाम गाळी ऊपाशी गडी”
दीन-दुबळ्यांचे जीवन असे
मीठ आहे तर मिरची नसे
साबणाची मिळेना वडी.
मातृभूमी या चिंतनशील गीतात देशाचा,त्यातील वैचारिक आणी सामाजिक संघर्षाचा इतिहास वामनदादा मांडत आहेत.आम्हाला मातृभूमी नाही.ज्यांनी आम्हाला दलित आदीवासी बनविले त्यांना फासावर लटकविले पाहिजे असे वामनदादा म्हणतात .
“धनी जरी मूळ आदिवासी
दरीमध्ये राही ऊपाशी
चोर इथे आज धनी झाला
पीक आम्ही काढीत होतो
भीक आम्ही वाढीत होतो
अंतरलो त्याच शिवाराला”
आम्ही एत्तदेशीय आहोत.या मातीची औरस संतान आहोत.या भूमीचे आणी तिच्या सर्व संपत्तीचे आम्ही मालक आहोत.पण आज ऊलटे झाले.चोर इथे धनी झाले.आमच्या शिवारावर,आमच्या देशावर आमची सत्ता राहिली नाही.आम्ही या मातृभूमीच्या पोटची पोरे पण आज ऊलटे-पालटे झाले.आम्ही मातृभूमीविहीन झालो.हे बदलले पाहिजे. ज्याचे त्याला मिळाले पाहिजे .न्यायाला न्याय आणी सत्याला अभय मिळाले पाहिजे. वामनदादांचे गाणे युध्दाचे आणी गोरगरीबांच्या सत्तेची वाट तयार करणारे होते.बंडाचे,साखळदंडाचे , भयंकर छळाचे,छळातही बळाचे आणी माणसाचे हित व्हावे असे गीत वामनदादांचे होते.
“माणसा इथे मी तुझे गीत गावे
असे गीत गावे तुझे हित व्हावे!!धृ!!
असे गोड नाते तुझ्याशी जडावे
तुझ्या संकटाशी इथे मी लढावे!!१!!
तुझ्याच भुकेचे कोडे ऊलगडावे
तुझे दु:ख सारे गळुनी पडावे!!२!!
एकाने हसावे लाखाने रडावे
जुने सारे सारे असे ना ऊरावे!!३!!
माणसाच्या हिताच्या कवीता करतांना वामनदादांची लेखणी बाबासाहेबांच्या विचारांच्या दिशेने कृतार्थ मनाने कायम धावतच राहिली. म्हणूनच
“ऊध्दरली कोटी कुळे
भीमा तुझ्या जन्मामुळे”
असे गाणे तर
“भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते” या गीतांनी वामनदादांनी आपले गीतसैन्य ऊभे केले. वामनदादांनी समाजाप्रती आपली नाळ घट्ट बांधून ठेवण्याचा अविरत प्रयत्न केला,परंतु समाजाकडूनही वामनदादांची सतत प्रतारणा,विटंबना आणी अवहेलनाच झालेली आहे.पैश्यांअभावी दादांची अनेक गीते प्रकाशित होवू शकली नाहीत परंतु त्यांची गीते गाणाऱ्या गायकांनी मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. आयुष्यभर पोटाला चिमटा देऊन समाजासाठी वणवण भटकणाऱ्या वामनदादांनी स्वता:चे दु:ख मात्र कुणालाही सांगितले नाही पण
“ऊदरी भूक आहे,ऊदास विमुख आहे
तरी वामनला तुझ्या सावलीत सुख आहे”
या काव्यपंक्तीतून निश्चितच व्यक्त केलेले आहे. वामनदादांच्या गीतांचे मानधन देखील आम्ही वामनदादांच्या हयातीत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचवू शकलो नाही हा आमचा समाज म्हणून नक्कीच दुबळेपणा आहे.आजही वामनदादांनंतर त्यांच्या कुंटुंबाची /त्यांची काळजी वाहणाऱ्या मानसपुत्र कुटुंबाची पैशाआभावी वाताहत झालेली आहे. राहण्यासाठी घरदार नाही किंवा ऊदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसे ऊत्पन्न नाही परंतु समाजाला या गोष्टींचे काहीएक भान नाही फक्त जयंतीनिमित्त कार्यक्रम घडवून आणण्याची शोबाजी मात्र करतील. शोबाजी न करता प्रत्यक्ष वामनदादांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत ऊपलब्ध करून दिली तरच वामनदादांची जयंती साजरी करण्याचे खरे मानसिक समाधान समाजाला प्राप्त होईल. पंधरा आँगष्ट या वामनदादांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वास विनम्र अभिवादन
ॲड.मनस्वी तायडे,नाशिक पुणे


