पुणे करार आणि बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका
१९१६ ला लखनौ करार झाला. तो कॉंग्रेस व मुस्लिम मध्ये.त्यात मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे कबूल झाले होते. त्यानंतर १९१९ ला साऊथब्यूरो कमिशन समोर, आधी लखनौ करार झाला असताना व मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आल्यावरही बाबासाहेबांनी अस्पृश्यांसाठी राखीव जागा मागितल्या होत्या. व मतदार हक्कांची अट शिथिल करण्यास सांगितली होती. पण स्वतंत्र मतदारसंघ मागितला नव्हता. साउथब्यूरो तर अधिकाराची विभागणी करताना अस्पृश्यांसाठी विचारच करत नव्हते. अस्पृश्यांना हिंदूचा अभिन्न भाग समजले जात होते. पण बाबासाहेबांनी अस्पृश्यांसाठी वेगळे हक्क मागुन, त्यांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्यासाठी बाध्य केले…..
मग स्वतंत्र मतदारसंघ/संयुक्त मतदारसंघ बाबतीत बाबासाहेबांचे विचार जाणून घेण्यासाठी खालील उतारे पाहू.
१)वयात आलेल्या सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार असावा. या गोष्टीचा आग्रह धरण्यात हा त्यांचा हेतू उघड झाला आहे. संयुक्त मतदान पध्दतीचा ते एवढ्या साठीच पुरस्कार करीत आहे…. (जनता २९-१२-३०)
२) डॉक्टर आंबेडकरांनी वयात आलेल्या सर्वांना सरसकट मतदानाचा हक्क पाहिजे असे सांगितले.
(जनता २९-१२-३०)
३)सुशिक्षित व पुढाऱलेल्या वर्गाचे ते स्वराज्य होणार आहे. अस्पृश्य,ब्राह्मणेतर मजूर वगैरे मागासलेले व अज्ञानी जनता पूर्वीप्रमाणेच नाडली जाणार आहे.
(जनता २६-१-३१)
४) डॉक्टर आंबेडकरांनी वयात आलेल्या सर्वांना मतदानाचा सरसकट हक्क मिळावा , म्हणून विलायतेत अतिशय खटपट केली. पण दोघांशिवाय इतर प्रतिनिधींनी त्यांना सहकार्य केले नाही. त्यामुळे पुढे येणारे स्वराज्य हे पुढारलेल्या वर्गाचे स्वराज्य होणार आहे. ……… समाजाचे ते स्वराज्य असणार नाही. ते मिळविण्यासाठी मत देण्याचा आपला अधिकार प्रत्येक व्यक्तीने संपादिला पाहिजे…(जनता २६-१-३१)
५) सार्वत्रिक मतदान पध्दतीची मागणी अमान्य करण्यात आल्यामुळे पहिली १० वर्षे स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करणे त्यांना नाईलाजास्तव भाग पडले. पण याची जबाबदारी त्यांच्यावर नसुन ती सर्वस्वी इतर स्पृश्य व मुसलमानांवर आहे.(जनता 9-2-31)
६) अस्पृश्यांना स्वतंत्र की संयुक्त मतदान पध्दती पाहिजे पाहिजे हा प्रश्न विचारता “बाबासाहेबांनी अ) एकतर सार्वत्रिक मतदान पद्धती
ब) पहिली १० वर्षे स्वतंत्र मतदान पध्दती व नंतर संयुक्त मतदान पध्दतीने आणि राखीव जागांच्या व्यवस्थेनुसार व्यवस्था करावी असे सुचविले”…
जे देश राजकीय दृष्ट्या स्वतंत्र झाले आहेत, त्या सर्वात हा सार्वत्रिक मतदानाचा हक्क प्रस्थापित झाला आहे असे नाही….(९-३-३१ जनता)
७) डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या प्रतिनिधी या नात्याने संयुक्त मतदान पध्दतीला,आपली संमती आधीच देउन ठेवली आहे. वयात आलेल्या प्रत्येक स्त्री पुरुष व्यक्तीला मतदानाचा हक्क असावा,या मताचे डॉक्टर आंबेडकर हे एक प्रमुख पुरस्कर्ते आहेत. ……. अस्पृश्यता निवारणासाठी संयुक्त मतदान पध्दतीला आपला पाठिंबा दिला आहे. देशहिताच्या व एकराष्ट्रीयत्वाच्या दृष्टीनेही जाती व धर्मविशिष्ट मतदारसंघ घातक असल्यामुळे, त्यांनी स्वतंत्र मतदारसंघ पध्दतीचा पुरस्कार केला नाही.
( २५-५-३१जनता )
८) २४ सप्टेंबर१९३१ ला गांधी सोबत भेटीत डॉक्टर आंबेडकरांनी पूर्वीप्रमाणेच सांगितले की ,जर सार्वत्रिक मतदानाचा अधिकार मिळत असेल तर वेगळ्या मतदार संघाची अस्पृश्यांना आवश्यकता नाही.( २८-९ -३१जनता)
वरील उताऱ्यावरुन हे सिध्द होते की बाबासाहेबांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेच नव्हता. मग तो गमावला म्हणुन बाबासाहेबांचे अनुयायी म्हणणारे जे निषेध/धिक्कार करतात ते करणे योग्य वाटत नाही. आता बाबासाहेबांना स्वतंत्र मतदारसंघ का पाहिजे नव्हता ? तर
मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ दिला. म्हणजे मुसलमान उभे राहतील तिथे फक्त मुसलमानच मतदान करू शकतील. त्यामुळे त्यांना इतर समाज स्वीकारणार नाही.याला सोपे करून पाहू…
मुसलमान जर संयुक्त मतदारसंघातून उभा राहिला तर आपल्या पक्षाचे सरकार बनावे म्हणुन इतर जातीधर्मातील पक्ष आणि नेते त्यांच्या सोबत मैत्रीभावनेने वागतील त्यामुळे स्विकाहार्यता वाढेल जर तो स्वतंत्र मतदारसंघातून उभा असेल तर त्याच्याशी काही घेणेदेणे नाही म्हणुन कोणी त्याला स्वीकारणार नाही.
तसेच मुसलमान मतदार फक्त मुसलमानालाच मत देतील,हिन्दूला नाही त्यामुळे हिंदू नेते मुसलमानाला तो आपला वोटर नसल्याने मैत्री करण्याचे कारण उरणार नाही.
आजही भाजप,कॉंग्रेस,शिवसेना व इतर हे मुसलमानांना जवळ फक्त यासाठीच करतात कारण ते त्यांचे वोटर तरी आहेत किंवा आपल्या पक्षातून उभे राहिले तर त्यांच्या प्रतिनिधीची संख्या वाढून सत्ता उपभोगता तरी येते. आज जे मुसलमान /आणि मागासलेल्या जातीच्या लोकांना सर्व पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते स्वीकारतात त्याचे कारण संयुक्त मतदारसंघच आहे. असे म्हणायला हरकत नाही.
स्वतंत्र मतदारसंघाचा साइड इफेक्ट होऊन अखंड देशाचे तुकडे होऊ शकतात हे बाबासाहेबांसारखे दुरदृष्टीकोण असणारे देशभक्तच ओळखू शकतात. पाकिस्तानच्या फाळणीला कारणीभूत हाच लखनौचा स्वतंत्र मतदारसंघाचा करार ठरतो.
वरील उताऱ्यावरुन प्रश्न पडतो की मग बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघ का मागितला ?
त्याचे उत्तर ही त्यांच्या वृत्तपत्रा मध्ये मिळते ते खालीलप्रमाणे आहे… 👇🏻
स्वतंत्र मतदारसंघ नको असे ज्यांना प्रामाणिकपणे वाटते अशा काही स्वतंत्र बुद्धीची माणसे अस्पृश्यांतही आहेत. डॉक्टर आंबेडकर हे त्यातील एक आहेत. डॉक्टर आंबेडकर ही स्वतंत्र मतदारसंघावर केवळ मजेखातर लूब्ध होणारे पुढारी नाहीत. कॉंग्रेसने केला नव्हता त्या आधीपासून डॉक्टर आंबेडकरांनी सार्वत्रिक मतदानाचा पुरस्कार केला आहे. ……..
….. हिंदू समाजाचे हृदय परिवर्तन अजून झाले नाही…..
सार्वत्रिक मतदानाचा हक्क ही मृगजळाप्रमाणे दुर दुर पळत आहे. अशी प्रत्यक्ष परिस्थिती डॉक्टर आंबेडकरांनी पाहीली तेव्हाच त्यांनी देखील केवळ अपरिहार्य आपत्ती म्हणुन स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली आहे.(जनता 19-10-31)
तरी मग स्वतंत्र मतदारसंघ मंजूर होतो. आणि गांधी या साठी उपोषणाला बसतात, की अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ नको… मग बाबासाहेबांना खुनाच्या धमक्या येतात, तडजोड करावी म्हणुन हिंदू स्पृश्य पुढारी येतात. पण बाबासाहेब तयार होत नाहीत. आणि बोलतात की ,मला विजेच्या खांबावर अटकवुन मारले तरी मी हक्क सोडणार नाही….
…. माझा निर्णय आहे तो कायम आहे. हिंदूच्या स्वार्थाकरिता आपला प्राण पणास लावून गांधीला जर, अस्पृश्य समाजाविरुद्ध संग्रामच करायचा असेल, तर अस्पृश्य समाजालाही आपल्या हक्कांच्या प्राप्तिसाठी व संरक्षणा साठी आपल्या प्राणाचे बलिदान देण्यास सज्ज होणे भाग पडेल……..
( जनता १७-९-३२)
गांधीचे प्राण वाचविण्यासाठी मी माझ्या बांधवांच्या न्याय हक्काला हरताळ फासण्यास कारणीभूत होणार नाही.
(जनता 24-९-३२)
याचा अर्थ जर स्वतंत्र मतदारसंघ च्या मोबदल्यात जर इतर जास्त सवलत मिळत असेल,तरच बाबासाहेब तो सोडू शकत होते. आणि बाबासाहेबांना ते मिळू शकते असे वाटायचे कारण 👇🏻
गांधीने भारताच्या स्टेट्स सेक्रेटरी सर सॅमुएल होअर सोबत केलेला पत्रव्यवहार….
शिक्षण, मालमत्ता, वगैरे बाबतीत जरूर अशा मतदार होण्याच्या अटी अस्पृश्यांना न लावता त्यांच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषांचे नाव मतदारांच्या यादीत समाविष्ट व्हावे. असे माझे मत आहे… गांधी…
(चां. भ. खैरमोडे खंड ५ )
हेच तर बाबासाहेबांना पाहिजे होते. हे वरील उताऱ्यात स्पष्ट दिसत आहे. मग राहिला प्रश्न स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव जागेचा तर…..
मुसलमान आणि शीख यांना फक्त एकेरी मतदान होते. तसे बाबासाहेबांनी न घेता करारात दुहेरी मतदान घेतले. आधी अस्पृश्यापैकी कोणी निवडणूक लढावी हे इतर पक्षातील स्पृश्य नाही ठरवणार तर फक्त अस्पृश्य व्यक्ती ठरवेल की कोण निवडणूक लढवेल. यामुळे चार गोष्टी साध्य होतात
१) जो अस्पृश्यांसाठी इमानदारीने काम करतो त्यालाच अस्पृश्य निवडणूक लढवण्यास पाठवतिल.
२) निवडणुकित स्पृश्य व्यक्तीला मत देण्याचा अधिकार अस्पृश्यांसाठी असल्याने स्पृश्य नेता अस्पृश्यांना जवळ करून अस्पृश्यता सोडून मतांची भीक मागेल. त्यामुळे अस्पृश्यता नष्ट होण्यास मदत मिळेल.
३) अस्पृश्यांसाठी बाकी पक्षात नेते म्हणून जागा ठेवण्यात येतील.
४) देशाच्या अखंडतेला बाधा पोहोचणार नाही.
या करारामुळे जिथे ब्रिटिशांच्या मते ७१ जागेवर अस्पृश्य व्यक्ती निवडून यायला पाहिजे तिथे करारानुसार १४८ निवडून येणार….. आता असे असल्यामुळे विरोध/निषेध करणे खरच योग्य आहे ?
जर ७१ च्या जागी १४८ निवडून देण्याची करारात सोय नसती. तर जे लोक बाबासाहेबांना करारात करुणेचा महासागर समजतात त्यांना बाबासाहेबांचा मार्शल रेस मधील सैनिक दिसला असता. जो need to kill चा समर्थक आहे. आणि त्यांच्या सोबत १०० दिवस शेळीसारखे जगण्यापेक्षा एक दिवस सिंहासारखे जगणारे भिमा कोरेगांव गाजवणाऱ्याचे वंशज सुद्धा होते……
जातीय निवाड्यानुसार अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ होता, पण फक्त प्रांतिक कायदेमंडळ मध्ये तो मध्यवर्ती कायदेमंडळ मध्ये सुरवातीला करण्यात आला नव्हता.
मतदार अधिकार स्पष्ट करण्यात आले नव्हते.
जास्तीत जास्त २० वर्षे हे अधिकार राहतील. मग आपोआप रद्द होतील असे होते.
मग गांधीने उपोषणाला सुरवात केल्यानंतर बाबासाहेबांनी नवीन योजना तयार केली. त्यात
१) १९७ जागा मागितल्या.
२) अस्पृश्य उमेदवार हे अस्पृश्यच ठरवतील.
३) १० वर्षांनंतर संयुक्त मतदारसंघ आणि राखीव जागा.
४) वयस्क मताधिकार
५) लोकसंख्या नुसार अस्पृश्यांसाठी नोकरीत राखीव जागा.
स्पृश्याजवळ काहीच योजना नव्हती. बस स्वतंत्र मतदारसंघ सोडा एवढेच त्यांचे म्हणणे होते.
आणि ज्या करारावर सह्या झाल्या त्यातील मुद्दे खालीलप्रमाणे होते. ते स्पष्टीकरण सह देत आहे.
१) ७८७ पैकी १४८ जागा अस्पृश्यांसाठी राखीव
स्पष्टीकरण — गांधी हे स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव जागा दोन्ही देणार नाहीत ह्या मताचे होते.बाबासाहेब राखीव मतदारसंघ चे पुरस्कर्ते होते. बाबासाहेबांना पूर्ण मागण्या मंजूर होऊ शकत नव्हत्या म्हणुन मुत्सद्दीपणा दाखवून त्यांनी आधीच १९७ जागा मागितल्या. आणि १४८ जागा मिळवल्या.ज्या फक्त ७१मिळणार होत्या…..
२) अस्पृश्यांसाठी उमेदवार अस्पृश्यच निवडतिल.
स्पष्टीकरण=- गांधी/कॉंग्रेसने त्यांचे चमचे उभे केले असते. जे अस्पृश्यांसाठी काम न करणारे असते.
३) मध्यवर्ती कायदेमंडळमध्ये अस्पृश्याचे प्रतिनिधी सर्वसाधारण मतदारसंघात राखीव जागासाठी पॅनलच्या निवडणुकीने निवडले जावे.
स्पष्टीकरण =- ब्रिटिश जाहिरनाम्यानुसार मध्यवर्ती कायदेमंडळ चा विचारच करण्यात आला नव्हता.
४) मध्यवर्ती कायदेमंडळात हिंदुच्या जागेपैकी १८% जागा अस्पृश्यांसाठी राखीव….
५) अस्पृश्य उमेदवारांच्या पॅनलची पद्धत १०वर्षेच अमलात आणावी. पण त्याआधी सर्व जातीनी एकमताने ती रद्द करायचे ठरवल्यास तसे करण्यास हरकत नाही.
बाबासाहेब पण १० वर्षे आधीपासूनच मागत होते.
६) राखीव जागाचे तत्व सर्व जातीत एकवाक्यता होइपर्यंत अमलात रहावे.
स्पष्टीकरण =- ब्रिटिश २० वर्षे राहुन आपोआप बंद म्हणत होते. गांधी १० वर्षांनी आपोआप बंद म्हणत होते. पण बाबासाहेब अस्पृश्यांची परवानगी असे पर्यंत रद्द करण्यात येउ नये म्हणत होते.
७) मताधिकार लोथियम समितीनुसार व्हावा.
स्पष्टीकरण =- गांधीने पत्र पाठवून अस्पृश्यांसाठी वयस्क मताधिकार मंजूर केला होता.
८) स्थानिक संस्थानात निवडणूक किंवा सरकारी नोकर्यांमध्ये योग्य प्रमाणात जागा द्याव्या…..
स्पष्टीकरण =- ब्रिटिश किंवा गांधी नोकरीत आरक्षण याविषयी काहीच द्यायला किंवा बोलायला तयार नव्हते. ते अधिकार बाबासाहेबांनी मिळविले…….
९) निवडणुकीत आणि नोकरीत शिक्षणाच्या अटी अस्पृश्यांनी पूर्ण केलेल्या असाव्यात.
याला कोणीच विरोध केला नाही. म्हणून विजय /पराजय चा प्रश्न उद्भवत नाही.
१० ) अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी योग्य प्रमाणात प्रांतिक सरकारच्या बजेटात तरतुद असावी…..
ब्रिटिश किंवा गांधी याविषयी काहीच द्यायला किंवा बोलायला तयार नव्हते. ते अधिकार बाबासाहेबांनी मिळविले…….
तात्पर्य बाबासाहेब विजयी.
जो गांधी अस्पृश्यांसाठी कोणतेही वेगळे अधिकार नसावेत या मतांचा आहे. त्यासाठीच उपोषणाला बसला आहे. आणि इतक्या मागण्या करारात मंजूर करत आहे. मग या करारात बाबासाहेब हरले कुठे हे शोधूनही सापडत नाही. मग धिक्कार का करावा ?
करारानंतर बाबासाहेब काय म्हणतात तेही पाहुनच घेऊ…..
१) “माझ्या सर्व मागण्यांना गांधींनी मान्यता देउन उलट माझेच अभिनंदन केले. गांधीनी ही तडजोड मान्य केली ती दुसऱ्या राउंड टेबल परिषद मध्ये मान्य केली असती तर आजचे बिकट व भयानक असे वातावरण कधीच उत्पन्न झाले नसते.”
( १-१०-१९३२ जनता)
२) “या कराराद्वारे आपल्या समाजाने बेदरकार हिंदू समाजास आपले राजकीय अस्तित्व कबूल करण्यास भाग पाडले आहे. याकरिता तो आपला राजकीय दिन म्हणुन पाळला पाहिजे. पुणे करारान्वये आपल्या समाजास मिळालेले अधिकार आपण योग्य रितीने उपयोगात आणतो की नाही, हे पाहण्यासाठी आपण या दिवशी जमले पाहिजे”.
सारांश =- गांधी आणि स्पृश्य हिंदू अस्पृश्यांसाठी कोणतेही विशेष अधिकार द्यायला तयार नव्हते, स्वतंत्र अस्तित्वच मानायला तयार नव्हते त्यांनीच नमते घेऊन करार घडवून आणला व भरपूर अधिकार बहाल केले.बाबासाहेब आधीपासुनच स्वतंत्र मतदारसंघाचे समर्थक नव्हते. वयस्क मताधिकार आणि राखीव जागा यांचे ते समर्थक होते त्यावेळी जगातील बऱ्याच देशात (इंग्लंड सहीत)उच्च शिक्षित आणि श्रीमंत लोकांनाच मताधिकार राहत होता. त्यामुळे भारतात सुध्दा त्याच पध्दतीने मताधिकार असावा असे ब्रिटिश म्हणत होते. त्यावेळी आताचे बौद्ध पण त्यावेळच्या अस्पृश्यांमध्ये उच्चशिक्षित आणि श्रीमंत मतदार अत्यल्प असल्याने अस्पृश्य व्यक्ती निवडून येणे अशक्य असल्याने बाबासाहेबांनी फक्त अस्पृश्यच नव्हे तर सर्व अल्पसंख्याकाच्या आग्रहाने स्वतंत्र मतदारसंघ मागितला.
पण संधी मिळाल्या बरोबर त्यांनी त्यांच्या जुन्या मागण्या सोबत नोकरी आणि शिक्षणासाठी नवीन मागण्या मंजूर करून घेतल्या.
यात बाबासाहेबांनी घाबरून किंवा दया दाखवून कोणतेही निर्णय घेतले नाही.उपोषण चालू असताना ज्या तडजोडी झाल्या त्या सर्व बाबासाहेबांच्या मतानुसारच झाल्या.
स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिताना त्यांनी १) वयस्क मताधिकार २) राजकारणात राखीव जागा ३) नोकरी व शिक्षणामध्ये राखीव जागा. मिळवल्या. आधी जे स्वतंत्र मतदारसंघ मुसलमान व शिख यांना मिळाले होते ते ही रद्द केले. यामुळे संविधान निर्मिती नंतर १९३२ चा करार संपला. आता भारतीय संविधानालाच महत्त्व राहते.
बाबासाहेब १९१९ ला साउथब्यूरो , १९२८ सायमन कमिशन , १९३१-३२ ला गोलमेज परिषद , १९३२ पुणे करार आणि १९४७-४९ संविधान निर्मिती या अधिकार मिळविण्याच्या प्रत्येक टप्प्यात विजयीच झाले. बाबासाहेबांचा विजय असो विजय असो….



