माझा स्वराज्याला बिलकूल विरोध नाही पण त्या स्वराज्यात आम्हाला पुरेसा हिस्सा पाहिजे

“माझा स्वराज्याला बिलकूल विरोध नाही. पण त्या स्वराज्यात आम्हाला पुरेसा हिस्सा पाहिजे. अधिकाराच्या व माऱ्याच्या जागी आमची माणसे हक्काने आली पाहिजे. गोलमेज परिषदेमध्ये स्वतंत्र मतदार संघासाठी मी भांडलो. स्पृश्यांनी निवडलेली माणसे आम्हाला प्रतिनिधी नकोत म्हणून मी आग्रह धरला. अखेर मी विजयी झालो व स्वतंत्र मतदारसंघ मिळविला. पण गांधींना पोटदुखी उठली. अस्पृश्यांना स्वाभिमानाचे हक्क जे मिळाले ते दुष्टपणाने हिरावून घेण्यासाठी त्यांनी आमरण अन्नसत्याग्रह केला व आपले हक्क हिरावून घेतले. त्यामुळे आपल्याला फारच कमी हक्क मिळाले. आपल्या बुरुजाला जी भेग पाडली आहे तीत संघटनेचा चुना वगैरे घालून आपण ती भरून काढली पाहिजे. आपले सरकारी अधिकारी पाहिजेत, मंत्री पाहिजेत, मध्यवर्ती सरकारातही मंत्री पाहिजेत. असे असता सात प्रांतात काँग्रेस मंत्रिमंडळे झाली, पण गांधींचा दृष्टिकोन बदलला नाही किंवा त्यांच्या हृदयात पालटही झाला नाही. परवा गांधींनी मद्रासचा दौरा काढला. तेथे अस्पृश्यांची व तुमची एवढी तेढ का? असा एकाने प्रश्न केला, तेव्हा सरळ व स्पष्ट उत्तर न देता गांधींनी काहीतरी उडवाउडवीचे उत्तर दिले व इंग्रजांनी यांना अधिकाराची चटक लावली असे उद्गार काढले. मराठे, मुसलमान, तसेच ख्रिश्चन, ॲंग्लो इंडियनांना नोकऱ्या देतात त्याबद्दल गांधींचे काही म्हणणे नाही. फक्त अस्पृश्यांना दिल्या की त्यांच्या पोटात दुखते असा अनुभव आहे.”
~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. १५ फेब्रुवारी १९४६, दहिवडी, सातारा.