जरी संकटाची काळ रात होती
तरी भीमराया तुझी साथ होती
तुझी तेवण्याची सुरुवात होती
प्रकाशात माझी पिढी न्हात होती
पालवीत होते प्रकाशाचे गोळे
पालवीत होते तुझे दोन डोळे
प्रकाशाचे गाणे मनी गात होती
अशी फौज माझी पुढे जात होती
गणतीच माझी गुलामात होती
जिंदगीच माझी सलामात होती
तोडलीस माझी गुलामीची बेडी
अशी झुंजणारी तुझी जात होती
मला दावलेली तुझी पायवाट
जाहली आता जी विकासाची वाट
वदे आज वामन कालची तुझी ती
पेरणी उद्याच्या विकासात होती