“… मी येथे जमलेल्या सर्व लोकांस हीच विनंती करितो की, आतापर्यंत आम्ही निकृष्ट अवस्थेस पोहचण्याचे कारण आम्ही आमचा योग्य पुढारी योजून काढत नाही. गोड बोलून नावलौकिक मिळविण्याच्या हेतूने आमच्यापैकी काही आपलपोटी मंडळी अयोग्य पुढारी नेमून देऊन अज्ञानी लोकांना फसवितात. पशुपक्षी देखील आपल्याच जातीचा पुढारी करितात. पक्ष्यांत कधी चतुष्पादाचा पुढारी झाला नाही. चतुष्पादी कधीही पक्ष्यांचा पुढारी नसतो. गाय, बैल, मेंढरे यात मात्र धनगर त्यांचा पुढारी असतो. त्यामुळे शेवटी त्यांना कसाबखान्यात जावे लागते!”
“…आज त्यांना पंडित ही पदवी देण्यास तरी काय हरकत आहे? विद्वानांत ते एक भूषणच आहेत. आर्यसमाज, बुद्धसमाज व ख्रिस्ती यांनी त्यांना आपल्यात आनंदाने घेतले असते. परंतु ते तुमचा उद्धार करण्याकरिता तिकडे गेले नाहीत. याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजेत व मीही मानतो.”
“माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजनांनो, तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला ह्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की, ते सर्व हिंदुस्तानचे पुढारी होतील अशी माझी मनोदेवता मला सांगते.”
माणगाव, 22 मार्च 1920
**********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग १


