बौद्ध पूजा पाठ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित एक पुस्तक

पूजा, प्रार्थनेस बौद्ध धम्मात काय स्थान आहे? याबाबत विचार करताना अनेकजण गोंधळून जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला विज्ञानवादी धम्म दिला पण त्याचसोबत बौद्ध पूजा पाठ, बौद्ध संस्कार पाठ, बौद्ध उपासना पाठ अशी लिखानेही केली.
पूजेबद्दल लोकांचा असा प्राथमिक समज आहे की पूजा ही देवाला प्रसन्न करण्यासाठी केली जाते. मग बौद्ध धम्मातही पूजा आहेच. बुद्ध पावतात की प्रसन्न होतात?
समज/गैरसमज
बौद्धांनी बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन त्रिशरण, पंचशील ग्रहण करणे, विहारात जाणे या गोष्टिवरहि गहजब करतात.
त्यांचे मते बुद्ध पूजा निरर्थक आहे व ते हिन्दू धर्मातील कर्मकांडाचा प्रकार आहे.
तथागताची पूजा बौद्ध अनुयायी करतात म्हणजे काय करतात? ते काही तथागताला काही नवस बोलून काही मागतात काय? त्याचे उत्तर नकारार्थी आहे.
मुळात पूजा याचा बाबासाहेबानी संपादित केलेल्या पाली इंग्रजी या डिक्शनरी मध्ये अर्थ दिलेला आहे.
पुजेचा अर्थ आहे दक्ष असणे, सन्मान दर्शविने, काळजी करणे. म्हणजेच बुद्ध पूजेमध्ये बुद्धाच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन ऐतिहासिक पुरुषोत्तमाला सन्मान देणे.
त्यासोबतच आपले वर्तन चांगले राहावे याची काळजी घेणे. याचा दूसरा अर्थ आपल्यामधील ज्ञानपुरुषाला जाग्रत करने होय.
मुळात बुद्ध, धम्म आणि संघाला वंदन करणे म्हणजेच ऐतिहासिक पुरुषोत्तमाप्रति आदरभाव व्यक्त करणे.
तथागतानी दिलेल्या धम्माप्रति जाग्रत राहून त्याचे अनुसरण करणे, संघवंदना म्हणजे धम्ममार्गावर प्रतिष्ठित, सदाचरणी असलेल्या श्रेष्ठ अशा भिक्खूं संघाचे अनुसरण करणे स्वतः ला चांगल्या मार्गावर घेवून जाण्याचा प्रयत्न करणे होय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नेमका कसा धर्म अपेक्षित होता? त्यांना धर्माबद्दल काय वाटत होते? धर्म माणसाच्या गरजेचा आहे की नाही याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत काय होते हे जाणून घेणे गरजेचे आहे.
बाबासाहेब म्हणतात : हल्ली धर्माला ग्लानी आली आहे. पण मी म्हणतो की धर्माची सर्वांनाच आवश्यकता आहे. माझ्या मते एक गोष्ट निश्चित आहे. धर्माशिवाय समाज जगणार नाही आणि तो धर्म बौद्ध धम्मच पाहिजे. समता, प्रेम, बंधुभाव या सर्व गोष्टी जगाच्या उद्घाराकरिता आवश्यक असतील तर त्या बुद्ध धम्मातच सापडतील. मी आज 20 वर्षे प्रत्येक धर्माचा अभ्यास केला आहे. सर्व धर्माचा अभ्यास केल्यावर जगाला बौद्ध धम्मच स्वीकारायला पाहिजे असे माझे मत झाले आहे.
बुद्धाची पूजा म्हणजे नेमकं काय?
जसे इतर धर्मात पूजा पाठ, विधिसंस्कार केले नाहीतर धर्म परंपरा बुडते, ईश्वर कोपेल अशी आंधळी समजूत निरीश्वरवादी बौद्ध धम्मात मुळीच नाही.
ईश्वर प्रधान धर्मात पूजा-प्रार्थना ह्या ईश्वराला संतुष्ट ठेवण्यासाठी, त्याच्या कोपापासून वाचण्यासाठी आणि प्रसन्न करून काही मनोवांछित मागण्यांसाठी पूजा केली जाते या कारणासाठी बौद्ध धम्मात वावच नाही.
बुद्ध एक मानव होते पण ते सर्वसामान्य मानव नव्हते तर ते प्रबुद्ध मानव होते परिपूर्ण प्रज्ञा, अपार मैत्री, आणि करुणा ह्याचे मूर्तिमंत प्रतीक होते म्हणून त्यांची आपण पूजा करतो.
आपण एक मानव म्हणून काय बनू शकतो व कसे बनू शकतो.मार्ग दाखवल्याबद्दल एक गुरू, एक आदर्श, एक मार्गदाता म्हणून गौरव करण्याकरिता त्यांची पूजा केली जाते..! देव मानून नव्हे..!
या पूजेतही आपण स्वतःलाच शोधतो. बुद्धांनी सांगितलेले त्रिसरण-पंचशील यात आपण कसे आयुष्य जगायला हवे याबद्दल शिकवणूक आहे.
त्रिसरण आणि पंचशीलात स्वतःप्रत करावयाच्या प्रतिज्ञा आहेत. सातत्याने प्रतिज्ञाबद्ध होणे म्हणजेच सातत्याने आपल्या कार्याप्रति, कर्तव्याप्रति, आचरणाप्रति जागरूक होणे, दक्ष होणे होय. त्यामुळे बुद्ध पूजेचा नेमका अर्थ समजून घेणे गरजेचे आहे.
ज्या लोकांना पाली भाषेचे ज्ञान आहे त्यांचेसाठी पूजा पाली भाषेत केल्यास काहीच हरकत नसावी.
परंतु ज्याना पाली भाषा ज्ञात नाही त्यांचेसमोर पाली भाषेतील गाथांचे उच्चारण मंत्रासारखे होईल आणि पुजेचा आणि प्रतिज्ञा यांचे उच्चारणाचा काहीच उपयोग होणार नाही.
केवळ कानाला श्रवणीय वाटते म्हणून त्या तालासुरात म्हणू नये.
‘बौद्ध पूजा पाठ’ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तक
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मातील पूजापद्धती आणि गाथा ज्या लोप पावल्या होत्या, त्या पुनःश्च आपल्यासाठी आणल्या.
बाबासाहेबांनी यासाठी पुस्तक लिहिले. ते म्हणजे “बौद्ध पूजा पाठ”
ज्यात पाली गाथांचा स्वतः बाबासाहेबांनी मराठी मध्ये अनुवाद केला.
त्या पुस्तकाची प्रस्तावना २४ फेब्रुवारी १९५६ ला लिहून तयार केली होती. व पुढे हे पुस्तक प्रकाशित झाले.