सर्वांगिण विकासासाठी डॉ. आंबेडकरांनी धम्माची दीक्षा दिली.

*१.  सर्व लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. आंबेडकरांनी धम्माची दीक्षा दिली.*

       चातुर्वर्ण्य व्यवस्थेमुळे होणा-या अन्यायापासून आपली व आपल्या अनुयायांची सुटका करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी स्वतः बुद्ध धम्माची दीक्षा घेतली व नंतर आपल्या अनुयायांना धम्माची दीक्षा दिली. बुद्धाचा मार्ग स्वीकारून दुःखातून लोकांना मुक्त करणे हा सुद्धा धम्म दीक्षेमागचा मुख्य उद्देश होता. बुद्ध धम्म हा मानवी विकासाची सर्वोत्तम पातळी गाठण्याची क्षमता धारण करतो व म्हणूनच आपले अनुयायी बुद्ध धम्माच्या पालनातून जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्राविण्य मिळवतील अशी डॉ. आंबेडकरांना खात्री होती आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा आपल्या अनुयायांना दिली.
१३ नोव्हेंबर, १९५६ ला डॉ. आंबेडकरांनी आशा व्यक्त केली की, त्यांचे अनुयायी बुद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी सर्व त-हेचा त्याग करतील. १३ नोव्हेंबर, १९५६ ला नवी दिल्ली विमानतळावर डॉ. आंबेडकर म्हणाले, “ख-या अर्थाने बुद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनाचे काम उशिरा सुरू केल्याचा मला खेद वाटतो. मला आशा व विश्वास वाटतो की, माझे लोक स्वतःचे वैयक्तिक सुख बाजूला ठेवून धम्माचे काम प्रामाणिकपणे करतील. मला असाही विश्वास आहे की, बुद्ध धम्माचा  भारतात प्रचार व प्रसार करण्यासाठी ते आपला प्रामाणिक संघर्ष सुरू ठेवतील.”
अशाप्रकारे, डॉ. आंबेडकरांनी बुद्ध धम्म भारतात रुजविण्यासाठी त्यांच्या अनुयायांकडून सर्व त-हेच्या त्यागाची अपेक्षा केली होती. त्यामुळे त्यांच्या सर्व अनुयायांची ही जबाबदारी आहे की, त्यांनी बुद्ध धम्माच्या तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे. बुद्ध धम्म म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन होय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात डॉ. आंबेडकरांनी हेच वारंवार सांगितले आहे. त्यांच्या अनुयायांनी, त्यामुळेच कोणत्याही शंकेविना आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन करण्यास सर्वाधिक प्राधान्य देणे आवश्यक आहे. तथापि, बोधिसत्त्व डॉ. आंबेडकरांचा धम्म विचार हा फक्त त्यांच्या अनुयायांपुरता मर्यादित नाही. त्यांनी भारतातील व जगातील सर्व मानवांसमोर भक्कमपणे मांडले की, बुद्ध धम्म हाच फक्त वैज्ञानिक व वैश्विक असा दुःख मुक्तीचा मार्ग आहे व त्यानुसार स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मैत्री व करुणा या तत्त्वांवर आधारीत समाजाची रचना जागतिक स्तरावर करता येते. अशाप्रकारे, बुद्ध धम्म स्वीकारुन व त्याचे महत्त्व सर्वांना पटवून देऊन डॉ. आंबेडकरांनी सर्व जगाच्या विकासासाठी सदाचाराचे साम्राज्य निर्माण करण्याचे ध्येय समोर ठेवले होते.

  *- आयु. श्याम तागडे*