Varshavas start date 2024 : Varshavas date start on Ashadha Purnima, Sun, 21 Jul, 2024
Varshavas end date 2024 : Varshavas ends on Aswhin Purnima, Thursday, 17 Oct, 2024
तथागत बुध्दाने लोकांच्या कल्याणासाठी मानवाला हितकारक असा जो धम्म सांगितला तो धम्म लोकांपर्यंत पोहचावा आणि मानवाचे जिवन सुखकारक व्हावे यासाठी तथागत बुद्धांनी आपल्या भिक्खु संघाला धम्म प्रचार प्रसारासाठी जो आदेश दिला तो पुढील प्रमाणे –
(मराठी अर्थ : भिक्खूहो, बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी, मानवांना कल्याणकारी, धम्मपदेश करण्यात तुम्ही प्रवृत्त व्हा. प्रारंभी कल्याणपद , मध्यंतरी कल्याणपद आणि शेवटीही कल्याणपद अशा या धम्ममार्गाचा लोकांना उपदेश करा.)
वरील तथागत बुद्धांच्या आदेशानुसार भिक्खु संघ धम्म प्रचारासाठी सर्व ऋतूत चारही दिशांना पायी फिरत असत.
या तिन्ही ऋतुत त्याना अनेक संकटांचा सामना करीत, नैसर्गिक संकटांचा सामना करून प्रतिकूल परिस्थितीतही ते धम्माचा प्रचार-प्रसार करीत असत.
त्या काळी खूप पाऊस पडत असे. पावसामुळे पायी फिरणे भिक्खु संघाला अशक्य होत असे. पावसाच्या काळात भिक्खुनां
भिक्षाटनासाठी जाता येत नसल्याने त्यांची ऊपासमारही होत असे.
एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असताना नदी नाल्यांना आलेल्या पुरात अनेक भिक्खु वाहून जात आणि अनेक भिक्खुंना यामध्ये जिव गमवावा लागत असे. पावसाळयात अनेक आजारांचा भिक्खु संघाला सामना करावा लागत होता.
हे सर्व लक्षात घेऊन तथागत बुद्धांनी भिख्खू संघाला आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत, एकाच ठिकाणी विहारात राहून धम्माचा अधिक अभ्यास करीत आसपासच्या परिसरातील उपासकांना धम्म ज्ञान देण्याबाबत सूचना दिल्या.
आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा काळ वर्षावास म्हणुन तेव्हापासुन सुरू झाला. वर्षावास म्हणजे पावसाळयातील निवास.
त्यानुसार ईसवी सन पूर्व म्हणजे तथागत बुध्दांच्या काळापासून वर्षावास सुरू आहेत.
तथागत बुध्दांनी त्यांचा पहिला वर्षावास इ.स.पूर्व ५२७ला ऋषीपतन सारनाथ येथे व्यतीत केला व इ.स.पूर्वी ४८३ ला शेवटचा ४५ वा वर्षावास केला.
त्यानी स्वतः श्रावस्ती, जेतवन, वैशाली, राजगृह इत्यादी विहरात वर्षावास केले.
अशा प्रकारे सद्धम्माचा प्रचार तथागत बुध्दांनी करून मानवाला धम्मपथाच्या राजमार्गावर आरूढ केले.
वर्षावासाचे नाते भगवान गौतम बुध्दांच्या जीवनातील अनेक संस्मरणीय घटनांशी निगडीत आहे.
आषाढ पौर्णिमेला वर्षावास सुरू होतो आणि अश्विन पौर्णिमेला संपन्न होतो. बौध्द धम्मात वर्षावासाला अनन्य साधारण महत्व आहे.
सर्व बौध्द उपासक उपासिकांनी या चार महिन्याच्या कालावधीत स्वताच्या घरी रोज डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ” बुध्द आणि त्यांचा धम्म” या पुस्तकाचे किंवा अन्य बुद्ध धम्माशी संबंधित पुस्तकाचे रोज सामुहिक वाचन करून त्यावर मनन चिंतन करावे व त्याचे आपल्या जिवनात अनुकरण केले पाहिजे. नियमितपणे शेजारच्या बुध्द विहारात जावून धम्म श्रवण करावा व धम्ममार्गावर आरूढ व्हावे. धम्मदान द्यावे.
उपोसथ व्रत घेऊन अष्टशिलाचे पालन करून सद्गुणांचा पाया मजबूत करावा. आपल्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबास यानुसार आचरण करण्यास प्रोत्साहित केल्यास बौध्द उपासकांचा भला मोठा संघ तयार होईल. आणि बाबासाहेबांनी पाहिलेल्या प्रबुध्द भारताचे दिव्य स्वप्न साकार होण्यास हातभार लागेल.