राजर्षी शाहू महाराज जयंती विशेष

आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती, त्यानिमित्ताने त्यांचा कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख.. 
राजर्षी शाहू महाराज  यांचा जन्म २६  जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या ठिकाणी झाला
राजर्षी शाहू महाराजांचं राज्य हे समतेचे राज्य होते, सर्व जाती धर्मातील लोकांना ते एकत्रित घेऊन राज्याचा कारभार चालवीत असत हे आपल्याला खालील मुद्द्यावरून लक्षात येईल.
(अ) राजर्षी शाहू महाराजांचे हुकूम
(१) महसूल, न्याय आदी खात्यात अस्पृश्यता न पाळण्याचा शाहू महाराजांचा मूळ हुकूम’ –
कोल्हापूर इलाख्यातील रेव्हेन्यू, ज्युडिशियल आदींकरून सर्व अधिकाऱ्यांनी आमच्या संस्थानात जे अस्पृश्य नोकरी करतील त्यांना प्रेमाने, समतेने वागविले पाहिजे. जर कोणा अधिकाऱ्यांची वरीलप्रमाणे अस्पृश्यांना वागविण्याची इच्छा नसेल, त्याने हा हुकूम पोहोचल्यापासून ६ आडवड्याच्या आत नोटीस देऊन राजीनामा द्यावा. पेन्शन मिळणार नाही. आमची अशी इच्छा आहे की, आमच्या राज्यातील कोणाही इसमाला जनावराप्रमाणे न वागविता मनुष्य प्राण्याप्रमाणे वागवावे. आमची फार इच्छा आहे की, आमच्या अधिकाऱ्यांनी मिशनरी, आर्य समाजिष्ट रेल्वे व गव्हर्नमेंट अधिकाऱ्याचे याबाबतीत अनुकरण करावे.
कोल्हापूर, २२ ऑगस्ट १९१९
सही,
शाहू छत्रपती
(२) विद्या खात्यात अस्पृश्यता न पाळण्याचा शाहू महाराजांचा मूळ हुकूम 2
हुजूरांच्या असे पाहण्यात आले की, अस्पृश्यांना व स्पृश्यांना शाळा खात्यात निरनिराळ्या तऱ्हेने वागविले जाते व अस्पृश्यांना शाळा
खात्याच्या इमारतीच्या कंपाउंडच्या आत येऊ दिले जात नाही .  सरकारी इमारती खाजगी उपयोगासाठी दिलेल्या नसल्यामुळे अस्पृश्यांना
तुच्छतेने वागविण्याचा कोणताही हक्क नसून अस्पृश्यांची प्रत्येक तऱ्हेने काळजी घेतली पाहिजे . शिक्षण संस्था गरीब लोकांकरिता असून गरिबातील गरीब हे अस्पृश्य त्यांना समतेच्या पायावर वागविणे योग्य आहे.
ते कर देतात तर त्यांना वाईट रीतीने  का वागवावे? हुजूरांची अंत:करणपूर्व इच्छा आहे की, शाळा खात्यातील ज्या खाजगी किंवा सरकारी
संस्थाना ग्रँट किंवा इमारती किंवा प्ले-ग्राऊंड वगैरे रूपाने मदत मिळते , त्यांनी  स्पृश्य वर्गापेक्षा अस्पृश्यांना जास्त ममतेने व आदराने
वागवावे.
कारण स्पृश्य  लोक कोणत्याही प्रकारे  शिक्षणात आपला मार्ग काढू शकतात  . परंतु अस्पृश्यांना ते असाध्य असल्यामुळे कोणताही मार्ग नाही . जर अस्पृश्यांना समतेने वागविले नाही तर मग तो प्रिन्सिपॉल अगर खालच्या दर्जाचा शिक्षक असो, त्याला जाब द्यावा लागेल
आणि खाजगी संस्थांना जी मदत मिळते ती काढून घेण्यात येईल.
हुजूरांची मनःपूर्वक इच्छा आहे की, मिरजेचे अमेरिकन मिशन, सेंट झेविअर, वुईल्सन कॉलेज व बंगलोर, पाचगणी येथील मिशन स्कुले किंवा आर्य समाजाच्या शाळा, कॉलेज किंवा गुरुकुले, रेल्वे व सरकारी अधिकारी हे असे स्पृश्यास्पृश्य भेदभाव ठेवत नाहीत, त्याचप्रमाणे संस्थानातील विद्याखात्याने वागावे. सरकारी मदत मिळणाऱ्या कोणत्याही शाळेत एखादा अस्पृश्य वर्गाचा विद्यार्थी आला तर संभावित गृहस्थाप्रमाणे आदरपूर्वक वागवून त्याला शाळेत घेणेत यावे. शाळा खात्यातील कोणा इसमाची असे करण्यास हरकत असेल तर त्याने हा हुकूम झाल्यापासून ६ आठवड्यांचे आत आपला राजीनामा पाठवावा, अर्थात त्याला पेन्शन मिळणार नाही. मदत मिळणाऱ्या शिक्षण संस्थेची हरकत असेल तर त्यांचीही ग्रँट किंवा इतर मदत दरबार बंद करील. प्ले-ग्राऊंड, इमारती किंवा दुसरी स्थावर जंगम मिळकत जी संस्थानाकडून त्यांना देण्यात आलेली आहे तीजवर जबर कर बसेल. जर एखादी खाजगी शिक्षण संस्था, देणगी देणाऱ्याच्या विरुद्ध जाईल तर देणगीची स्थावर अगर जंगम मिळकतीवर शेकडा ७ टक्के कर बसेल किंवा देणगी देणाऱ्याच्या किंवा त्याच्या वारसाच्या इच्छेप्रमाणे एक शिष्यवृत्ती ठेवली जाईल. कोणत्याही शिक्षकाने मग तो काम करून कितीही थकला असो, अस्पृश्य विद्यार्थी शाळेत येताच त्याला आवश्यक मदत करावी.
रावब, डोंगरे हे सर्व शिक्षकांना मग ते सरकारी अथवा मदत मिळणाऱ्या संस्थेतील असोत, ह्या हुकूमाची नक्कल पाठवून देतील.
कोल्हापूर, २२ ऑगस्ट १९१९
सही,
शाहू छत्रपती
(३) धर्मार्थ दवाखान्यात अस्पृश्यता न पाळण्याचा शाहू महाराजांचा मूळ हुकूम’
हुजूरांच्या असे पाहण्यात आले आहे की, अस्पृश्यांना व स्पृश्यांना धर्मार्थ दवाखान्यात निरनिराळ्या तऱ्हेने वागविण्यात येऊन अस्पृश्यांना दवाखान्याचे इमारतीतील कंपाउंडमध्येसुद्धा येऊ दिले जात नाही. सरकारी इमारती ह्या काही कोणाला सॉनटोरियम म्हणून दिलेल्या नसल्यामुळे अस्पृश्यांची हरएक तऱ्हेने काळजी घेतली पाहिजे. धर्मार्थ संस्था ह्या गरीब लोकांकरिता असून गरिबातील गरीब अस्पृश्यांना समतेच्या पायावर वागविणे योग्य आहे. हुजूरांची अंत:करणपूर्वक इच्छा आहे की, स्टेट मेडिकल अधिकाऱ्यांनी पाश्चात्यांचे, त्यात मिरजेच्या अमेरिकन मिशनचे अनुकरण करावे. एखादा रोगी तो स्पृश्य किंवा अस्पृश्य असो तो दवाखान्यात येताच सभ्य गृहस्थाप्रमाणे वागवून त्याची तपासणी करावी व त्याला जनावरांप्रमाणे बाहेर न घालविता उपचारासाठी दवाखान्यात पाठवावे. मेडिकल खात्यातील कोणा इसमाची असे करण्यास हरकत असेल तर त्याने हा हुकूम झाल्यापासून सहा आठवड्यांच्या आत आपला राजीनामा पाठवावा. अर्थात त्याला पेन्शन मिळणार नाही.
एखादा ऑफिसर काम करून कितीही थकला असो त्याने नवा रोगी येताच त्याची सोय केलीच पाहिजे. हा नियम मेडिकल खात्यातील अगदी वरिष्ठ अधिकारी व ड्रेसर किंवा नर्स या सर्वांना लागू आहे. मेडिकल खात्यात हल्ली नोकर असलेल्या व पुढे नोकर होणाऱ्या प्रत्येक इसमाला ह्या हुकूमाची नक्कल देण्यात यावी व नेहमीच्या उपयोगासाठी दवाखान्याच्या ऑफिसात एक नक्कल टांगून ठेवावी.
कोल्हापूर, २२ ऑगस्ट १९१९
सही,
शाहू छत्रपती
छत्रपती राजर्षी शाहू राजे यांनी वरील तीन जाहीरनाम्यांशिवाय सार्वजनिक ठिकाणे, इमारती, धर्मशाळा, विहिरी, , , पाणवठे इत्यादी ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास बंदी करणारा हुकूम काढला तो खालीलप्रमाणे –
(४) शाहू महाराजांचा अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा, सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता न पाळण्याचा हुकूम’
मुलकी खाते
जाहीरनामा
तारीख
८ ऑक्टोबर १९१९ इसवी
हुजूरून मु. ठराव नंबर ३५३ हा होऊन मु. जा. नंबर २६५, तारीख ६ माहे सप्टेंबर सन १९१९ ची आज्ञा झाली
आहे –
सर्व सार्वजनिक इमारती, धर्मशाळा, स्टेट हौसीस, सरकारी अन्नछत्रे वगैरे ठिकाणे व नदीचे पाणोथे, सार्वजनिक विहिरी येथे कोणत्याही मनुष्य प्राण्याचा विटाळ मानण्याचा नाही. ख्रिश्चन पब्लिक, बिल्डिंग रूममध्ये व सार्वजनिक विहिरीवर जसे अमेरिकन मिशनमधील डॉ. व्हेल व वानलेस हे सर्वांना एकसारखे समतेने वागवितात त्याप्रमाणे येथेही कोणाचा विटाळ न मानता वागविण्याचे आहे, तसे न झाल्यास गावकामगार पाटील-तलाठी यांना जोखीमदार धरले जाईल याप्रमाणे तजवीज व्हावी.
कोल्हापूर
सही,
शाहू छत्रपती
राजर्षीनी अस्पृश्यांसाठी शाळा काढल्या. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी अस्पृश्य व स्पृश्य मुले एकाच शाळेत बसतील अशी व्यवस्था केली. अस्पृश्य लोकांना सरकारी नोकरीत संधी दिली. त्याकरिता त्यांना ५० जागा आरक्षित 2 ठेवण्याचा जाहीरनामा २६ जुलै १९०२ रोजी काढला. अस्पृश्य लोकांना वकिलीच्या सनदा देऊन वकिली व्यवसाय करण्याची संधी दिली. अस्पृश्यांना शिक्षण, सरकारी नोकऱ्यातील संधीचा अधिकार, इतराप्रमाणे धंदा व्यवसाय करण्याचा अधिकार देऊन राजर्षीने त्यांच्या राज्यात समता प्रस्थापित करून मानवाधिकाराचे संरक्षण व संवर्धन केले.
Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?