२६सप्टेंबर१९७४
“त्यांनी चार डोळे फोडून काढले तेंव्हा..”
धाकली , अकोला येथील मन सुन करणारी घटना
सोळा सतरा वर्षाची, नेमकीच वयात आलेली , परिस्थितीने कंगाल पण रुपानं जणू मालामाल अशी ती त्याच्या नजरेत भरली! धनदांडग्या जमीनदाराचा तो मस्तवाल मुलगा अन ती मात्र गरीब बापाच्या संसाराला हातभार लागावा म्हणून हाती खुरपं घेऊन त्याच्या शेतात रोजंदारी करणारी बौद्ध कुटुंबातील मुलगी ! आपल्या श्रीमंतीच्या जाळ्यात सुखी संसाराच्या स्वप्नांचे दाणे टाकून त्यानं तिला अलगद जाळ्यात फसवले . मी तुझ्याशीच लग्न करणार या गुलाबी बोलण्याला तीही भुलली अन त्याला सर्वस्व देऊन बसली . निसर्गाला कुठे ठाऊक असते जाती पातीचं गणित? मग काय त्यानं तिला मनसोक्त भोगून पुढचे निसर्गाचे भोग भोगायला तिला अन तिच्या गर्भात वाढू लागलेल्या कोवळ्या कोंबाला वाऱ्यावर सोडून दिले. पुढे काय? हा भीषण प्रश्न तिच्या इतकाच तिच्या आई वडिलांसमोर आ वासून उभा होता . गावात तोंड कसं दाखवावं या विचाराने बाप हतबल झाला पण खचला नाही. लेकीला तिच्या आईसोबत मामाच्या गावी पाठवून सरळ पोलीस ठाण्यात तक्रार केली घाबरलेल्या पाटलानं माणूस पाठवून तिच्या बापाला अन चुलत्याला वाड्यावर बोलवून घेतलं. तुमच्या पोरीला सुन करून घ्यायला मी तयार आहे पण तुम्ही केस मागं घ्या तुम्ही वाड्यावर या बसून आपण मिटवामिटवी करू असा निरोप घेऊन गडी घरी आला .शेवटी काय बापाचा जीव तो ! काही का होईना आपल्या पोरीचं सुरळीत होईल या आशेने त्यानं डोक्यावर पटका बांधला , पायात वाहणा घातल्या . भावाला सोबत घेतलं अन दोघेही वाड्याच्या दिशेने निघाले . उंच , पुरे, गोरेप्पान धाडधिप्पाड भाऊ म्हणजे एखाद्या मराठी चित्रपटातले हिरो शोभावे असे देखणे अन रुबाबदार दिसत होते . समता सैनिक दलाच्या तालमीत वाढलेले ते दोन ढाणे वाघ एका वेळी दहा जणांना लोळवू शकतील अशी त्यांची ख्याती होती म्हणून कुणी सहजासहजी त्यांच्या नादाला लागत नसे . आपल्या पोरीशी लग्न करायला पाटलाचं पोरगं तयार झालं , समाजात आपल्या नावाची होणारी बदनामी थांबली या आनंदात दोघे भाऊ वाड्यावर गेले . अन थोड्याच वेळात सगळीकडे एकच कल्ला उठला. या घटनेची प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या प्रयागबाई म्हणजे त्या मुलीच्या काकू सांगत होत्या , “ हातातला सैपाक सोडून मी पयतच गेली ! पायते त माह्या जेठाच्या डोक्यावर मागून कोणी तरी बेसावध असताना असा घाव घातला का एवढा वाघावानी गडी खाली कोसळला ! ईस पंचवीस लोकं हातात काठ्या , कुऱ्हाडी , इळे , बैलाला टोचायच्या आऱ्या घेऊन माह्या जेठावर अन माह्या मालकावर तुटून पडले व्हते . एवढ्या बेफाम जमावपुढ ते दोघं निहत्ये काय करतीन तरी ? मी मह्या मालकाच्या अंगावर पडले त मला त्यायनी उचलून लांब फेकून दिलं . मी पाया पडत व्हते पण कोण मदतीला धावणा . शेवटी पाटील माह्या जेठाच्या छाताडावर बसला , चोघायनी त्यायचे हातपाय गप्पी धरून ठिवले अन एकानं ब्याटरीकीचा उजेड त्यायच्या डोळ्यावर धरला अन आरीन त्याचे दोन्ही डोळे भायेर काढून फेकले . माशाचे पोट फाडून त्यातले आतडे बोटांनी बाहेर काढावेत तितक्या सहजतेने त्यांनी माह्या जेठाच्या दोन्ही डोळ्यायचे बुबुळ भायेर काढले अन बाजूला फेकले त्यानंतर मह्या मालकाचेबी डोळे तशेच भायेर काढले अन फेकले, एकाच येळेला चार डोळे उपटले , त्या दोघ्याच्या आकांतान पत्थरालाबी पाझर फुटला असता पण त्या लोकायच्या मनाला पाझर नही फुटला . गावातला एक माणूस मदतीला पुढ आला नही . तडफडून तडफडून ते दोघं भाऊ रक्ताच्या थारुळ्यात निपचित पडले व्हते . मी गावाच्या पोलीस पाटलाकड गेले , सरपंचांकड गेले पण कोणीच मदत करीना . परत आले पाह्यलं त ते दोघंबी कण्हत व्हते . ते जीत्ते हाय म्हणताना म्या म्हणलं दवाखान्यात न्यावा पण कोणी बैलगाडी द्यायला तयार व्हईना . त्यात ते दोघे गडी एवढे धाडधिप्पाड का मला एकटीला त्याला उचलून घरात बी नेता येईना ! माही पुतणी रूपा अन लक्ष्मी या दोघीयच्या मदतीनं म्या त्या दोघायला उचलून घरात नेलं . कशीबशी रात काढली . आमच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता अन त्या दोघायचे डोळेच काढून फेकल्यामूळ त्यायचे डोळे लागायचा आता प्रश्नच उरला नव्हता. दिवस उजाडल्यावर कोणी ना कोणी मदतीला धावण या आशेन रात काढली पण त्या दिवसभरातबी कोणी गाडी दिली नाही . दुसरी रात्रही अशीच विव्हळत अन कण्हत गेली . शेवटी तिसऱ्या दिवशी सरपंचान बैलगाडी न्या म्हणून सांगीतलं , पण तुमची तुम्ही कशी न्यायची ते न्या असं म्हणला. काय करायचं ? शेवटी म्या सोता बैलगाडी जुपली . रूपा अन लक्ष्मीच्या मदतीनं दोघायला गाडीत घातलं अन पिंजर पोलीसठाण गाठलं पण पोलीस काही केस नोंदवून घेईना ! मंग दवाखान्यात नेलं , डाक्तरन मलमपट्टी केली अन आकोल्याला न्यायला सांगितलं . आकोल्याच्या दवाखान्यात भरती केलं , इलाज केला अन काही दिवसान सुट्टी भेटली . ज्यायनी माह्या मालकाच्या अन जेठाच्या जगण्यातून उजेड ओरबाडून घेत डोळ्याच्या खोबणीत अंधार भरला होता ते मात्र दिवसा उजेडी राजरोस उजळ माथ्यानं मोकाट फिरत होते. पोलीस ठेसनात किती चकरा मारल्या पण पोलीस आमची काही दादच लागू देईना . शेवटी ही बातमी दलित प्यांथरच्या कानावर गेली . नाना राहटे , डी.एन.खंदारे यायनी ह्या दोघायला बोंबाईला नेलं . तथी ज.वी.पवार अन राजा ढाले यायनी माह्या जेठाला अन मालकाला इंदिरा गांधी कड नेलं , सारी कहाणी त्यायला सांगातली ते ऐकून त्या मावलीच्या डोळ्यात पाणी आलं . आजवर आमची साधी तक्रार नोंदवायला पण नाही म्हणाणारं पोलीस खातं खडबडून जागी झालं अन कामाला लागलं, दुसऱ्याच दिवसापासून त्या गावगुंडायची धरपकड सुरु झाली . प्यांथरनी साऱ्या महारष्ट्रात रान उठवलं अन आम्हाला न्याय मिळाला . भीमाचा कायदा व्हता , कायद्याला मानणार सरकार व्हतं अन भारताचं संविधान व्हतं म्हणून आम्हाला हा न्याय मिळाला ! मालकाचे अन जेठाचे गेलेले डोळे जरी परत आले नाही तरी संविधाना शिवाय आपलं काय खर नाही हे साऱ्यायला उमजून त्यायचे डोळे मात्र उघडले .
हे सगळं ऐकून मी सुन्न झालो! तो दिवस होता २३ ऑगस्ट २०१८ अन निमित्त होतं निंबी या अकोला जिल्ह्यातील माझ्या जन्मगावी मी आयोजित केलेल्या संविधान सन्मान मेळाव्याचे !या मेळाव्याला नागपूरचे माजी न्यायधीश मा. गौतम शेगावकर आणि धाकलीचे बुद्धीष्ट इंटरन्याश्न्ल स्कूलचे राजेश गवई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . राजेश गवई यांच्या सोबत आलेल्या त्यांच्या आजी प्रयागबाई गवई यांनी कार्यक्रमाच्या स्थळी येताच समोर लावलेल्या साडेतीन फुटी संविधानाच्या प्रतिमेला डोळे बंद करून आदरभावाने वंदन केले . असे वंदन करण्याचे कारण काय? हे मी विचारताच त्यांनी मलाच प्रतीप्रश्न केला ,
“बाप्पा तुम्ही हे कायले इचारु रायले ” मी म्हणालो
“मावशी मी सुद्धा प्यांथरचा कार्यकर्ता आहे !” एक निश्वास टाकत त्या म्हणाल्या
“बाप्पा आता कुठ रायली प्यांथर? तो काळ काही वेगळाच होता . असू द्या काही का आसना पण तुम्ही याच्या पुढ संविधान जपा ! संविधानहे त आपुनहे ! बाप्पा भीमाचा हा कायदा व्हता म्हणून आम्हाला न्याय मिळाला जर नसता तर आजवर कधीच न्याय भेटला नसता . आपल्याला जर न्याय पाहिजे आसन त हे संविधान आपुन जपलं पाहीजील! अन हे संविधान जपायला प्यांथर सारखी जहांबाज संघटना पण पाहिजे !” गोपाळराव गवई आणि बब्रुवाहन गवई या दोन बंधूंच्या आयुष्यात कायमस्वरूपी अंधार करणारी ही घटना २६ सप्टेंबर १९७४ रोजी घडली , या घटनेला २६ सप्टेंबर २०१८ रोजी ४४ वर्ष पूर्ण होत असताना प्रयागबाई गवई यांचा हा प्रश्न माझ्या मनाला वेदना देऊन गेला . संविधानामुळे धाकली गावातल्या गवई बंधूंच्या गेलेल्या डोळ्यांना न्याय मिळाला या घटनेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना संविधान जपण्याचे आणि संविधानाकडे पाहण्याचे डोळे मिळावेत हीच सदिच्छा !
प्राचार्य डॉ. अमर पांडे, सांगली
संकलन
मनोजराव गवई