साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती (1 ऑगस्ट)

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती (1920):
तुकाराम भाऊराव ऊर्फ लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. अण्णांनी आपले उभे आयुष्य मुंबईतील घाटकोपर येथील चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली. आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते.
१६ ऑगष्ट १९४७ साली “#ये_आझादी_जुठी_हे_देश_कि_जनता_भुकी_हे” असा नारा शिवाजी पार्क वर दिला त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. असा हा लोकनायक केवळ भारतामध्येच प्रसिद्ध होता असे नव्हे तर देशाबाहेरही त्यांची ख्याती विलक्षण होती. रशियामधील सरकारने त्यांच्या उदात्त कार्याची दखल घेत एक स्फूर्तीदायक कलाकृती म्हणून त्यांचा पुतळासुद्धा उभारला आहे.
अशा या थोर व्यक्तीमत्वास जयंती निमित्त मानाचा मुजरा.