बाबासाहेबांच्या चळवळीत मुस्लिम बांधवांचं अमूल्य योगदान..

_मुस्लीम नेते मौला हसरत मोहानी यांच्यासमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरभारताच्या विभाजनानंतर मुस्लिमांना कुणीही वाली नव्हता. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच मुस्लिमांच्या पाठिराख्यांची भूमिका पार पाडली होती. अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी असताना बाबासाहेब एकदा मौलाना अब्दुल कलाम आझाद यांना म्हणाले, ”मौलानाजी दोन दिवसानंतर अल्पसंख्याक आयोगाची बैठक आहे. या बैठकीत आपण मुस्लिमांच्या आरक्षणाची मागणी करा. मी अध्यक्ष या नात्यानं सर्मथन करीन. ”मौलाना अब्दुल कलाम आझाद” यांनी ही बाब दोन दिवस पोटात न ठेवता ओठात आणून पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगितली. पंडित नेहरूंनी अशी काही व्यवस्था केली, की मौलाना अब्दुल कलाम आझाद त्या बैठकीलाच उपस्थित राहू शकले नाहीत. परिणामत: त्यामुळं मुस्लिमांना आरक्षण मिळू शकलं नाही. अशा तर्हेनं ओठात एक आणि पोटात एक ही नीतीमत्ता बाळगणार्या काँग्रेस पक्षाच्या दुटप्पी धोरणामुळंच एकेकाळची शासनकर्ती जमात असलेल्या मुस्लिमांचं जसं होत्याचं नव्हतं झालं तसंच अस्पृश्य समाजात शासनकर्ती जमात बनण्यासाठी अधिक जागृत होऊ नये, म्हणून काँग्रेसनं बाबासाहेबांना लोकसभेची दारं बंद केली होती; परंतु त्यावेळी देवदुतासारखं धावून आलेल्या पश्चिम बंगालमधील नमो शुद्राय या जमातीपेक्षा अधिक मात्रेनं असलेल्या मुस्लिम समाजानं जोगेंद्रनाथ मंडल व मुस्लिम लीगच्या नेतृत्त्वाखाली बाबासाहेबांना भरघोस मतांनी निवडून आणलं. बाबासाहेबांचा काँग्रेस पक्षानं केलेल्या अपमानाचा बदला घेतला._
_हैदराबादच्या निजामांनी एक कोटी रुपये देणगी देऊन ‘शेड्यूल कास्ट वेल्फेअर फंड’ नावाची संस्था स्थापन केली. इतकंच नाही, तर दलितांचा शैक्षणिक विकास घडून यावा, म्हणून त्यांनी औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेजसाठी दोनशे एकर जमीन दिली. मिलिंद कॉलेजची इमारत उभी करण्यासाठी १२ लाखांची देणगीही दिली. मुंबईतील सिद्धार्थ कॉलेज बांधण्यासाठी सेठ हुसैनजी भाई लालजी यांनी पन्नास हजारांची देणगी दिली. सर कावसजी जहांगीर यांनीसुद्धा सिद्धार्थ कॉलेज बांधण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं. एकदा पालघरला बाबासाहेबांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेचं ठिकाण रेल्वेस्टेशनपासून दूर होतं. म्हणून संयोजकांनी बाहेरून येणार्या कार्यकर्त्यांसाठी घोडागाडीची व्यवस्था केली होती; परंतु आगाऊ उचल घेऊनसुद्धा सवर्ण गाडीवान सभेच्या दिवशी रेल्वेस्टेशनकडे फिरकलेच नाहीत. त्यावेळी मुस्लिम घोडेगाडीवानांनी बाहेरून येणार्या कार्यकर्त्यांना कार्यक्रमस्थळी नेलं._
_महाडच्या पायथ्याशी चवदार तळ्याच्या आंदोलनासाठी मांडव टाकायचा होता. त्यासाठी जागेची आवश्यकता होती. फत्तेह खान यांनी स्वत:ची शेतजमीन दिली. आंदोलन उद्ध्वस्त करण्यासाठी मनुवाद्यांनी मंडपात शिजवलेल्या अन्नात माती कालवून अस्पृश्यांना बेदम मारहाण केली. त्यावेळी मुस्लिमांनी दलितांना आपल्या घरात आश्रय दिला. त्यांची सेवाश्रृषा करून त्यांना अन्न, पाणी दिलं. अनेक अस्पृश्य बांधवांचे प्राण वाचविले. नाशिक येथील काळाराम मंदिराच्या सत्याग्रहप्रसंगी बाबासाहेबांच्या जीविताला धोका पोहचू नये, म्हणून सेठ झकेरिया मणियार या मुस्लिम सद्गृहस्थानं छातीचा कोट करून बाबासाहेबांना आपल्या बंगल्यात सुरक्षित ठेवलं होतं._
_स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एकमतांनी भारतीय राष्ट्रध्वजाचा रंग ठरवला गेला. त्या ध्वजावर ‘चरखा’ हे चिन्ह असावं, याबाबत जवळ-जवळ सर्वांचं एकमत झालं होतं. त्यावेळी बाबासाहेबांनी अशोकचक्राची मागणी केली असती, तर महात्मा गांधीनी ती धुडकावून लावली असती, म्हणून चतुर बाबासाहेबांनी तिरकी चाल खेळली. अशोकचक्राबाबतचा विषय त्यांनी राज्यपाल फैजहसन बद्रुदीन तय्यबजी यांच्यासमोर ठेवला. बाबासाहेबांचा शब्द ते कधीच खाली पडू देत नसत. बाबासाहेबांना ते म्हणाले, ”बाबासाहेब, आता हा विषय माझा झाला आहे. तो मी माझ्या पद्धतीनं सोडवतो.” असं बोलून फैजबद्रुदीन तय्यबजी पत्नीसह महात्मा गांधींकडं गेले. ते गांधीजींना म्हणाले, ”भारताच्या राष्ट्रध्वजावर जर का अशोकचक्र लागलं, तर आपण अस्पृश्यांचे मसिहा ठराल. महात्माजी फैजहसन बद्रुद्दीन तय्यबजींच्या जाळ्यात अलगद अडकले. फैज हसन बद्रुदीन तय्यबजी या मुस्लिम सद्गृहस्थाच्या मध्यस्थीमुळेच भारताच्या राष्ट्रध्वजावर चित्रित असलेलं अशोकचक्र जगाला बुद्ध धम्माचा शांतीचा संदेश देत आहे. बाबासाहेबांच्या मोटारचालकाचं नाव मोहम्मद नजीर होतं. ते औरंगाबादला आहेत. बाबासाहेबांचं नाव काढताक्षणी त्यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागतात. सारं जगं बाबासाहेबांना जिव्हाळ्य़ानं ‘बाबा’ म्हणतात; परंतु अभिमानानं सांगावंसं वाटतं, की मुस्लिमांच्या अस्मितेचं प्रतिक म्हणून बाबासाहेब मोटारचालक मोहम्मद नजीरला ‘बाबा’ म्हणून पुकारत. एकदा बाबासाहेब औरंगाबादहून नागपूरला जात होते. अकोल्यातील नदीला आलेल्या पुरामुळं अर्धा पूल वाहून गेला होता. मोहम्मद नजीरनं चटकन ब्रेक मारून पुढचा अर्थ टाळला. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्धधम्माची दीक्षा घेण्यापूर्वी बाबासाहेबांनी विविध धर्मांचा खोलवर अभ्यास केला होता. विविध धर्मांचा अभ्यास करीत असताना ते इस्लाम धर्माच्या अगदी जवळ गेले होते. दिव्य कुराणातील प्रथम शब्द ‘इकरा’ या विज्ञानवादी शब्दाच्या प्रेमात कैद झालेल्या बाबासाहेबांनी इस्लामची ओळख दलितांना व्हावी, म्हणून बहिष्कृत भारत या वृत्तपत्रात एक विशेष कॉलम आरक्षित ठेवला होता. १५ मार्च १९२९ रोजी ईश्वराचं नाव घेण्यासाठी व्याकुळलेल्या भूमिपुत्रांना, ‘तुम्हाला जर का पर्यायी धर्म स्वीकारायचा असेल, तर इस्लाम धर्म स्वीकारावा,’ असा जाहीर सल्ला बाबासाहेबांनी ‘बहिष्कृत भारत’ मधून दिला. बाबासाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भुसावळ, जळगाव व भारतातील विविध प्रांतातील बहुसंख्य भूमिपुत्रांनी मोठय़ा प्रमाणात इस्लाम धर्म स्वीकारला. भारतात इस्लामचा झालेला प्रसार तलवारीच्या बळावर अथवा बळजबरीनं झालेला नसून इस्लामला आमंत्रित करणारं पोषक वातावरण विकृत मनुस्मृतिच्या कलंकित चातुर्वण्य व्यवस्थेनं निर्माण केल्यानंच इस्लामचा प्रसार भारतात मोठय़ा प्रमाणात झाला. पुढील काळात विविध धर्मांची चिकित्सा करीत असताना आजचे भूमिपुत्र पूर्वाश्रमीचे बौद्धच आहेत. ही स्थितप्रज्ञा प्राप्त झाल्यामुळं बाबासाहेबांनी नवीन धर्म न स्वीकारता पुनश्च एकदा बौद्ध धम्म स्वीकारला. भारतातील धर्म परिवर्तित बौद्ध व मुस्लिम हे एकाच मार्गदात्याचे दोन आविष्कार आहेत, म्हणूनच जितका आदर आणि अभिमान बौद्धांना बाबासाहेबांप्रती आहे, तेवढाच आदर आणि अभिमान बाबासाहेबांप्रती मुस्लिमांनाही आहे._
_बाबासाहेबांनी ऐश्वर्य, पद, प्रतिष्ठा आणि राजकारणातून प्राप्त होणारी संपत्ती पावलोपावली लाथेनं ठोकरली, म्हणूनच ते आज राष्ट्राची संपत्ती बनले आहेत. बाबासाहेब नेहमीच म्हणत, की काँग्रेस हे जळकं घर असून या घराला कधीही न विझणारी भ्रष्ट विचारांची आग लागली आहे. या आगीपासून दोन हात दूर राहा, असा सल्ला बाबासाहेबांनी सर्वधर्मीय भूमिपुत्रांना दिला होता. बाबासाहेबांचा सल्ला मान्य करून मुस्लिमांनी काँग्रेसकडं पाठ फिरविली. काँग्रेस काही वर्षांपूर्वी मुस्लिम समाजाची दयनीय अवस्था व्यक्त करणारा सच्चर समितीचा अहवाल प्रसिद्ध केला. सच्चर समितीच्या या अहवालात मुस्लिमांची अवस्था दीन, दलितांपेक्षा दयनीय झाली आहे, असं नमूद करण्यात आलं आहे. मुस्लिम मनाला वेदना देणारा सच्चर समितीचा अहवाल प्रसिद्ध करण्यापूर्वी असाच मुस्लिम मनाला कुरवळणारा गोपालसिंग आयोगाचा अहवाल काँग्रेसनं १९८0 मध्ये इंदिरा गांधीच्या काळात प्रसिद्ध केला होता. गोपालसिंग आयोगाच्या अहवालात मुस्लिमांची अवस्था दीन, दलितांपेक्षा बेहत्तर आहे, असं नमूद करण्यात आलं होतं. मुस्लिम समाजाला हिरवेगार कुरण दाखविणारा गोपालसिंग आयोगाचा अहवाल प्रसिद्ध झाल्याबरोबर देशात इतक्या जाती-उपजाती असताना काँग्रेस पक्ष केवळ मुस्लिमांचीच दखल घेत आहे, हे पाहून कल्पनेचे मनोरे रचणार्या मुस्लिम समाजानं स्वत:चा असा गैरसमज करून घेतला, की भविष्यात काँग्रेसच्या राज्यात मुस्लिमांचा आणखी विकास घडून येणार. या स्वप्नाळू अंधविश्वासामुळं मुस्लिमांनी काँग्रेसला आपला खरा सखा मानून स्वत:हून स्वत:ला काँग्रेसच्या दावणीला बांधून घेल्यामुळंच अपवाद वगळता काँग्रेस पक्ष सतत सत्ता उपभोगत राहिला. मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांच्या बळावर काँग्रेस पक्ष सतत सत्ता उपभोगत आहे, हे पाहून सत्तेपासून दूर असलेल्या भाजपनं एक तर्क तथ्य विषारी प्रचार केला, की काँग्रेसच्या राज्यात मुस्लिमांचे विशेष हीत जपलं जात आहे. भाजपच्या प्रचाराला बळी पडून कट्टर हिंदुत्त्ववादी ‘व्होट बँक’ काँग्रेसपासून दूर गेल्यानंच अल्प बहुमतात आलेल्या काँग्रेसनं सहकारी तत्त्वावर विविध पक्षांचा कुबड्यांचा आधार घेऊन आणखी पाच वर्षे सत्ता उपभोगली._
_पुढील काळात लोकसभेच्या निवडणुका तोंडासमोर असताना आपल्यापासून दूर गेलेल्या मुस्लिम व कट्टर हिंदुत्त्ववादी ‘व्होट बँके’ला पुन्हा आपल्याकडं वळविण्याकरिता सच्चर समितीचा अहवाल प्रसिद्ध करून काँग्रेसनं एका दगडात दोन पक्षी मारले होते; परंतु त्या आयोगाची अंमलबजावणी न करता केवळ दखल घेतली तरी मुस्लिम स्वत:ला स्वत:हून काँग्रेसच्या दावणीला बांधून घेतो. म्हणूनच मुस्लिमांना पुन्हा एकदा मूर्ख करण्याकरिता काँग्रेसनं सच्चर समितीचा अहवाल प्रसिद्ध करून काँग्रेसनं हे आपल्या विचार कर्म आणि कृतिद्वारे हे दाखवून दिलं, की भाजपनं मुस्लिमांच्या केवळ धार्मिक भावना दुखावल्या असतील._
_आम्ही तर मुस्लिमांच्याच मतांच्या बळावर अपवाद वगळता सतत सत्तेत राहून एकेकाळची शासनकर्ती जमात असलेल्या मुस्लिमांचंअस्तित्त्व मिटवून त्यांना सच्चर समितीच्या अहवालाच्या रूपात दयनीय अवस्थेत आणून सोडलं आहे. भाजप, शिवसेना व काँग्रेस हे एकाच माळेचे मणी असून बापानं मारलं, सापानं चावलं अथवा पावसानं झोडपलं, तर सर्वसामान्य मुस्लिमांनी न्याय मागायचा कोणाकडं?_
संकलन – जावेद पाशा
सन्दर्भ- ताहीरभाई शेख, पुणे
Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?