गुलामाला गुलामीची जाणीव
झाली नसती
चातुर्वर्णाची चौकट
कुणीचं झुगारली नसती.
मुंगीसारखा समाज
चिरडला असता
अत्याचाराला भलताच
ऊत आला असता.
मनुवादयांच्या मनावर
खीळ बसली नसती
मानव मुक्तीची पहाट
कधीचं दिसली नसती.
बाबा तुम्ही नसता तर…..?
झोपडयांचे वणवे
पेटलेचं असते
अब्रुंचे धिंडवडे
निघालेचं असते.
जगण्याची ऊर्मी ही
मनात राहिली नसती
मेलेली गुरेढोरे
आज ही वाहिली असती.
माणुसकीला गहिवर
फुटलाचं नसता
सुखसम्रुध्दीने महारवाडा
नटलाचं नसता.
बाबा तुम्ही नसता तर….?
वाघिणीचं दुध
कुणी पाजलचं नसतं
आमचं खणखणीत नाणं
कधी वाजलचं नसतं.
हा बंगला ही नसता
ही शेतीवाडी ही नसती
हा सुटबुट नसता
दारात गाडी ही नसती.
हे एेश्वर्य हे वैभव
कधीचं आलं नसतं
गुलामगिरीतचं सारं
आयुष्य गेलं असतं
बाबा तुम्ही नसता तर….?
तळागाळातील माणुस
जागलाचं नसता
स्वातंत्र्याचा सुर्य कधी
निघलाचं नसता.
विकासाची दिशा कुणी
दावली ही नसती
बोधीव्रुक्षाची डोक्यावर
शीतल सावली नसती.
धम्माच्या ओंजळीत
कुणी टाकलचं नसतं
सन्मानाचं जिवन हे
लाभलचं नसतं.
बाबा तुम्ही नसता तर….?
जिवनाचं चित्र
विचित्र असतं
जातीयवादयांच्या हाती
सारं सुत्र असतं.
आज ही पाण्यासाठी
भटकलो असतो
वेशीच्या बाहेर
लटकलो असतो.
माझ्या अंगावर कापड
बायकोला लुगडं नसतं
दहाबारा वर्षाचं प्वॉर बी
उघडं नागडं असतं.
आज ही जनावरांच्या
वळत्याचं केल्या असत्या
शेणझाडलोटीच्या बदल्यात
शिळ्या भाकरी आल्या
असत्या.
प्रस्थापितांच्या दावणीतचं
मरुन गेलो असतो
अस्तित्वाच्या वादळात
विरुन गेलो असतो.
आज ही इथला माणुस
गुलामीत असता
दारिद्रयानं पिचलेला
हालाखीत असता.
हा मान हा सन्मान
सारं तुमची देण आहे
या मानवजातीवर न फिटणारं
हे तुमचचं ऋण आहे.
पण…..
बाबा खरचं तुम्ही नसता तर…………..?????????


