अधिशील शिक्षा

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_अधिशील शिक्षा_*

*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

_बौद्ध समाजातील पुरुषांचे गृहस्थ, उपासक, श्रामणेर आणि भिक्षु असे चार वर्ग आहेत. त्याचप्रमाणे गृहिणी, उपासिका, श्रामणेरी आणि भिक्षुणी असे स्त्रियांचे चार वर्ग केले आहेत. पैकी भिक्षुणींचा आणि श्रामणेरींचा वर्ग यांचे भारतातील आजचे अस्तित्त्व खूप कमी आहे. बाकी सहा वर्ग ब्रह्मदेश, सिलोन वगैरे बौद्ध देशांत आढळतात. आपण या लेखात पुरुष व महिलांना बुद्धांनी सांगितलेल्या शिलांबाबत चर्चा करणार आहोत. भिक्खू आणि भिक्षुणी यांनी पाळावयाचे नियम हे विनय पिटकात आहेत त्यांचा स्वतंत्र असा अभ्यास आहे. *शील, समाधी आणि प्रज्ञा या धम्ममार्गातील तीन प्रमुख पायऱ्या आहेत.* यांनाच अनुक्रमे पुढीलप्रमाणे म्हणतात :-_

१. अधिशील शिक्षा

२. अधिचित्त शिक्षा

३. अधिप्रज्ञा शिक्षा

_आर्य अष्टांगिक मार्गाच्या आठही अंगांचा या तीन शिक्षातच समावेश होतो._

१. *सम्यक वाचा, सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीव या तीन अंगांचा अधिशीलशिक्षेत समावेश होतो;* 

२. *सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या तीन अंगांचा अधिचित्तशिक्षेत समावेश होतो;* 

३. *सम्यक दृष्टी व सम्यक् संकल्प या दोन अंगांचा अधिप्रज्ञाशिक्षेत समावेश होतो.*

_*गृहस्थ आणि गृहिणी यांना लागू पडणाऱ्या शीलाचे इतर वर्गांना लागू पडणाऱ्या शीलाप्रमाणेच विहितशील (चारित्तसील) आणि निषिद्धशील (वारित्तसील) असे दोन भेद आहेत. बुद्धांनी करण्यास सांगितलेल्या गोष्टी करणे हे विहितशील; व वर्ज्य करण्यास सांगितलेल्या गोष्टी वर्ज्य करणे हे निषिद्धशील होय.*_

_महामंगलसुत्त, सिगालसुत्त इत्यादि सुत्तांतून गृहस्थांनी आणि गृहिणींनी आचरण करण्यासाठी भगवंतांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यापैकी, विहितशीलाची नीट कल्पना व्हावी म्हणून महा अभ्यासावे, महामंगलसुत्ता मद्ये विहितशीलाचा बराच मोठा भाग आला आहे. महामंगलसुत्तात सांगितलेल्या कित्येक मंगलांचा सम्राट अशोक यांनी आपल्या शिलालेखात धम्म या सदराखाली उल्लेख केला आहे. ९ व्या शिलालेखात ते म्हणतात :-_

*_आवाहविवाहेसु वा पुत्रलाभेसु वा प्रवासम्हि वा एतम्हि च अञ्जह्मि च जनो उचावचं मंगलं करोते। निरर्थ च मंगलं करोते। अपफलं तु खो, एतारिसं मंगलं। अयं तु महाफले मंगले, व धंममंगले। तत दासभतकम्हि सम्यप्रतिपती, गुरूनं अपचिति साधु, पाणेसु संयमो साधु, ब्राह्मणसमणेसु साधु दानं।_*

_*लग्नकार्यांमध्ये, पुत्रलाभ झाला असता, प्रवासास निघण्याच्या वेळी, व अशाच त-हेच्या अन्य प्रसंगी, लोक मोठ्या समारंभाने मंगल करीत असतात, पण ते निरर्थक होय. तशा प्रकारचे मंगल अल्पफलदायक आहे; परंतु महत्फळ देणारे मंगल म्हटले म्हणजे धर्ममंगल होय. (ते कोणते?) दास आणि भृत्य यांना चांगल्या रीतीने वागविणे; गुरुजनांची सेवा करणे हे चांगले; प्राणिहिंसेविषयी मनाचा संयम करणे हे चांगले; ब्राह्मणाला आणि श्रमणाला दानधर्म करणे हे चांगले.*_

_पति आणि पत्नी, मातापिता आणि पुत्र, गुरु आणि शिष्य, धनी आणि नोकर इत्यादिकांची परस्परासंबंधी काय कर्तव्ये आहेत, याचे वर्णन सिगालसुत्तांत केले आहे._

*_निषिद्धशीलात प्रथमारंभी गृहस्थांनी आणि गृहिणींनी नित्य पाळावयाचे ५ नियम येतात._*

(१) प्राणघात न करणे;

(२) चोरी न करणे;

(३) व्यभिचार न करणे;

(४) खोटे न बोलणे; व

(५) दारू वगैरे मादक पदार्थांचे सेवन न करणे,

*_या पाच गोष्टी बौद्ध म्हणविणाऱ्याने वर्ज्य केल्या पाहिजेत. दोन्ही अष्टमी, पौर्णिमा व कृष्ण चतुर्दशी या चार दिवसास उपोसथ दिवस असे म्हणतात. या दिवशी जे गृहस्थ आणि गृहिणी धर्मचिंतनात काल घालवितात, त्यांना अनुक्रमे उपासक आणि उपासिका असे म्हणतात. उपासकांना आणि उपासिकांना या दिवशी पाळण्यासाठी बुद्धांनी आठ नियम घालून दिले आहेत, त्यांचाहि निषिद्धशीलात अंतर्भाव होतो.* ते नियम येणेप्रमाणे :-_

(१) प्राणघात न करणे;

(२) चोरी न करणे;

(३) अब्रह्मचर्य न करणे (म्हणजे ब्रम्हचारी राहणे);

(४) खोटे न बोलणे;

(५) दारू वगैर मादक पदार्थांचे सेवन न करणे;

(६) मध्याह्नानंतर न जेवणे;

(७) नृत्य, गीत वगैरे कामविकार उद्दीपित करणाऱ्या गोष्टी न पहाणे व मालागंधादि (चैनीच्या) पदार्थांचे धारण न करणे;

(८) उंच आणि मोठ्या बिछान्यावर न निजणे.

_(पंचशिलातील ३ ऱ्या नियमात व्यभिचार करू नये अशी आज्ञा आहे; पण येथील ३ ऱ्या नियमाप्रमाणे उपोसथाच्या दिवशी ब्रह्मचारीच राहिले पाहिजे.) वर सांगितलेल्या चार दिवशी उपोसथ पाळण्यास सवड नसेल तर तो गृहस्थांनी आणि गृहिणींनी वाटेल त्या दिवशी पाळण्यास हरकत नाही. ब्रह्मदेशात आजकाल ज्या गृहस्थांना ऑफिसच्या वगैरे कामामुळे वर सांगितलेल्या चार दिवशी उपोसथ पाळण्याची सवड होत नाही ते रविवारी उपोसथ पाळीत असतात._

*_काया-वाचा-मनाने दहा पापांचा त्याग करणे, ही निषिद्धशीलामधिल मुख्य गोष्ट आहे. या दहा पापांना पाली भाषेत “दस अकुसलकम्मपथ” असे म्हणतात.* ती ही-_

*_अ) कायिक पापे_*

(१) प्राणघात

(२) अदत्तादान

(३) व्यभिचार

*_ब) वाचिक पापे_*

(१) असत्य भाषण

(२) चहाडी

(३) कठोर भाषण व

(४) व्यर्थ बडबड

*_क) मानसिक पापे_*

(१) परद्रव्यासक्ति

(२) क्रोध व

(३) नास्तिकता,

_*येथे नास्तिकता म्हणजे परोपकार करण्यात काही अर्थ नाही, शील पालन करण्यात अर्थ नाही, समाधिपासून काही लाभ नाही इत्यादि विचार.* बाकी अर्थ स्पष्टच आहे. ज्याला आपले शील पूर्णत्वाला न्यावयाचे असेल त्याने या दहा पापांचा त्याग अवश्य केला पाहिजे. *या दहा पापांच्या त्यागाला पालिभाषेत मनुष्यधर्म असे म्हटले आहे.* प्राचीन काली या देशात या दहा पापांचा त्याग सर्वसंमत झाला होता. *या सर्व शीलाचे-विहित आणि निषिद्ध शीलाचे पुनः हीन, मध्यम आणि उत्तम असे तीन भेद केले आहेत.*_

_*कीर्तीच्या आशेने पाळलेले शील हीन, पुण्यफळाच्या आशेने पाळलेले मध्यम व हे माझे कर्तव्यच आहे अशा भावनेने पाळलेले उत्तम समजावे. ‘मी मोठा शीलवान्, हे दुसरे लोक दुःशील आहेत, हे पापी आहेत,’ अशा प्रकारे ज्या शीलाचा आत्मस्तुति आणि परनिंदा करण्यात उपयोग होतो, ते हीन शील, ज्याचा असा उपयोग होत नाही परंतु जे ज्ञानयुक्त नाही, ते मध्यम, व प्रज्ञापूर्ण शील उत्तम जाणावे. आपणास दुसऱ्या जन्मी सुख मिळावे म्हणून पाळलेले शील ते हीन, आपणाला मोक्ष मिळावा या हेतूने पाळलेले मध्यम, व सर्व प्राणिमात्राच्या हितासाठी पाळलेले शील उत्तम होय.*_

_*टीप :- महामंगल सूत्त व सिगाल सुत्त यांचे मराठीत भाषांतर माझ्या ब्लॉगवर उपलब्ध असल्याने हिते दिले नाही आहे*_

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- १८/०६/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) महामङ्गल सुत्त_*

*_२) सिगाल सुत्त_*

*_३) बुद्ध धर्मावरील चार निबंध_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼