अत्रे जेव्हा भाषणास उभे राहिले त्यावेळी लाखो लोकांच्या हृदयाचा बांध फुटला व ते मोठमोठ्याने हुंदके देऊ लागले. तिथे उपस्थित असलेले पोलिस अधिकारही आपला शोकावेग आवरू शकले नाहीत . आचार्य अत्रे म्हणाले.”मराठी पत्रकार व लेखक यांच्या वतीने भारतातील एका महान विभूतीला मी आदरांजली अर्पण करण्यास उभा आहे. या महान नेत्याच्या मृत्यूने मृत्यूला मृत्यूचीच कीव वाटू लागली आहे. मरणानेच आज आपले हसू करून घेतले आहे. मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत? मग त्याने इतिहास निर्माण करणाऱ्या इतिहासाच्या या पर्वावरच का झडप घातली ?
महापुरुषांचे जीवन पाहू नये असे म्हणतात. पण त्यांचे मरण आपण पाहत आहोत. भारतात असा युगपुरुष शतकाशतकांत तरी होणार नाही .झंझावाताला मागे सारणारा, महासागराच्या लांटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता. असा शूरवीर, बहाद्दर पुरुष आज मृत्यूच्या चिरनिद्रेच्या मांडीवर कायमचा विसावा घेत आहे. त्यांचे वर्णन करण्यास शब्द नाहीत. अशी एकही गोष्ट नाही की, त्याविरुद्ध ‘बाबा’नि बंड पुकारले नाही. अन्याय जुलूम ,जबरदस्ती, विषमता जेथे दिसली तेथे त्या विराने आपली गदा उगारली . बाबासाहेब अंतःकरणाने किती मृदु होते याचे वर्णन करताना अत्रे म्हणाले, महात्मा गांधीना वाचविण्यासाठी आपल्या लाखो अस्पृश्य बांधवांचे कायमचे नुकसान करूनही ,त्यांनी पुणे करारावर सही केली. ते कच्चा गुरुचे चेले नव्हते . बुद्ध, कबीर, फुले हे त्यांचे गुरू होते. अस्पृश्यता जाळा असे म्हणणारा हा पुरुष स्वतंत्र भारताच्या घटनेचा शिल्पकार बनला .त्यांना आम्ही छळले—-सरकारने छळले. (यावेळी सारा जनसमुदाय ओक्साबोक्शी रडू लागला) अशा परिस्थितीत मी हिंदू म्हणून जन्मलो तरी मरतांना हिंदू म्हणून मरणार नाही .हे त्यांनी खरे करून दाखविले. कारण आपल्याला ठाऊकच आहे की बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला होता. शोक करणे त्यांना आवडणार नाही .आज त्यांचा प्राण त्यांच्या कुडीतून बाहेर पडून सात कोटींच्या शरीरात शिरला आहे. त्यांचे चारित्र्य, निर्भयपणा व दुसरे गुण अंगी बाणवून आपण त्यांचे कार्य पूर्ण केले पाहिजे. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
महामानवास त्रिवार अभिवादन . . . ! ! !
!जयभीम! !!जयभारत!! !!!नमो बुद्धाय !!!


