“मी आपल्या समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून कसोशीने व प्रामाणिकपणे काम करणार आहे. त्यासाठी मी एवढा विद्याभ्यास केलेला आहे. मी मिळविलेल्या ज्ञानशक्तीचा उपयोग केवळ माझे कुटुंब व जात यांच्यासाठी करणार नाही. मी सर्व अस्पृश्य समाजाच्या चळवळीसाठी तिचा उपयोग करणार आहे. त्यासाठी मी अनेक योजना आखलेल्या आहेत. त्या सफल झाल्या तर अस्पृश्य समाज व स्पृश्य समाज यांचा फायदा होईल. अस्पृश्यांचे प्रश्न फार बिकट आहेत. ते सर्व मी सोडवू शकणार नाही याची मला जाणीव आहे. परंतु ते सर्व प्रश्न जगाच्या चव्हाट्यावर मांडून मी त्याकडे सर्व जगाचे लक्ष वेधू शकेन, एवढा मला आत्मविश्वास आहे. अस्पृश्यांची समस्या म्हणजे प्रचंड हिमालय आहे. या हिमालयाशी टकरा मारून मी माझे डोके फोडून घेणार आहे. हिमालय कोसळला नाही तरी माझे रक्तबंबाळ डोके पाहून सात कोटी अस्पृश्य लोक तो हिमालय जमीनदोस्त करण्यास एका पायावर तयार होतील व त्यासाठी प्राणार्पण करतील, हे तुम्ही पक्के ध्यानात ठेवा.”
~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(१९२४, मुंबई. बहिष्कृत हितकारिणी सभेच्या सक्रिय सभासदांना उद्देशून. आपापसात तेढ निर्माण होऊ देऊ नका, हे सांगताना…)


